Home » Donald Trump : अमेरिकेत घुसखोरी करणा-यांवर गोळीबार !

Donald Trump : अमेरिकेत घुसखोरी करणा-यांवर गोळीबार !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथसमारंभाला 90 दिवस होत आहेत. 20 एप्रिल रोजी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाला 90 दिवस पूर्ण होणार असून या दिवशी ट्रम्प काही धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे. आधीच ट्रम्प यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यांनी अमेरिका आणि जगभरात खळबळ उडाली आहे. आता 90 दिवस पूर्ण झाल्यावर ट्रम्प अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर आणीबाणी लादण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संबंधीच्या आदेशावर ट्रम्प यांनी आधीच स्वाक्षरी केली आहे. ही आणीबाणी लागू झाल्यावर अमेरिकेत येणारे सर्व बेकायदेशीर प्रवेश पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. या आदेशावर आधीच सही झाली होती, त्यानुसार आदेशाच्या पुनरावलोकनासाठी 90 दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली होती. (Donald Trump)

20 एप्रिल रोजी ही मुदत पूर्ण झाल्यावर आणीबाणी लागणार असून या सीमेवर लष्कर तैनात करण्याची तयारी सुरु झाली आहे. याशिवाय याच दिवशी अमेरिकेत देशद्रोहाबाबत अधिक कडक नियम लागू होण्याचीही शक्यता आहे. या सर्वांमुळे अमेरिकेत बेकायदेशीर रहात असलेल्या नागरिकांमध्ये अधिक घबराट पसरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधाली 20 एप्रिल रोजी 90 दिवस पूर्ण होत आहेत. आता याच दिवशी ट्रम्प त्यांच्या पहिल्या कार्यकारी आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी करत आहेत. या आदेशानुसार दक्षिण सीमेवर आणीबाणी लागू केली जाणार आहे. अमेरिकन लष्कराला येथे तैनात करण्यात येणार आहे. या आदेशानुसार 90 दिवसांच्या आत, संरक्षण सचिव आणि गृह सुरक्षा सचिव हे अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरील परिस्थितीबद्दल राष्ट्रपतींना अहवाल सादर करणार आहेत. (International News)

त्यानंतर राष्ट्राध्यक्ष 1807 चा राजद्रोह कायदा देशात लागू करतील. या कायद्यातील तरतुदी ज्यांना माहित आहेत, त्यांना मात्र धडकी भरली आहे. कारण आत्तापर्यंत हमास किंवा अन्य दहशतवादी संघटनेला समर्थन करणा-या सोशल मिडियावरील मेसेजवर लक्ष ठेवले जात होते. आता याबाबत अधिक कडक नियम लागू होतील. वेळप्रसंगी देशद्रोहाचा गुन्हाही नोंदवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या या नव्या आदेशाची दहशत काहींवर आहे. या सर्वांचेच लक्ष 20 एप्रिलवर लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रत्यक्षात 20 एप्रिल रोजी बंडखोरी कायदा लागू करतील आणि दक्षिणेकडील सीमेवर लष्कराला तैनात करतील, हे स्पष्ट आहे. यासाठी आवश्यक असलेला संरक्षण सचिव आणि गृह सुरक्षा सचिवांचा अंतिम अहवाल ट्रम्प यांच्यापुढे अद्याप सादर झालेला नाही. यामुळे, दक्षिणेकडील सीमेवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी लवकरच जुना कायदा लागू केला होईल, असेही काहींना वाटत आहे. (Donald Trump)

या सर्वात 1807 चा राजद्रोह कायदा मात्र देशात लागू करण्याचे नक्की केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 1807 च्या अमेरिकन राजद्रोह कायद्यानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, विशिष्ट परिस्थितीत कायदा लागू करण्यासाठी सैन्य आणि अमेरिकन नॅशनल गार्ड तैनात करू शकतात. यामुळे सैन्याला कोणतेही बंड, उठाव किंवा हिंसाचार किंवा प्रतिकाराच्या कोणत्याही कृतीला दडपण्याचे अधिकार संपूर्ण अधिकार मिळतात. शिवाय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना, अमेरिकन सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ यांना अमेरिकन सैन्य कधी, कुठे आणि केव्हा तैनात करायचे हे ठरवण्याचे संपूर्ण अधिकार प्राप्त होतात. हा आदेश लागू झाला तर अमेरिकेत होणारे सर्व बेकायदेशीर प्रवेश पूर्णपणे बंद होणार आहेत. आदेशानुसार अमेरिका आता दक्षिण सीमेवर बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य पाठवणार आहे. या सैन्याला घुसखोरांना रोखण्यासाठी सर्व अधिकार मिळणार आहेत. (International News)

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

प्रसंगी जबरदस्तीनं अमेरिकेत घुसखोरी करणा-यांवर गोळीबार कऱण्याचा अधिकारी त्यात समाविष्ट असेल. यामुळे अमेरिकेतील सोशल मिडियावर आता अमेरिकेत मार्शल लॉ सारखी परिस्थिती असणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे लष्कराला अमर्य़ाद अधिकार मिळणार आहेत. आधीच अमेरिकेत रहात असलेल्या स्थलांतरितांना 24 तास त्यांची आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा असे सांगण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशांला विरोधही होत आहे. मात्र 20 एप्रिलनंतर अमेरिकेत जर मार्शल लॉ जाहीर झाला आणि लष्कराला सर्वाधिकार मिळतील. त्यानंतर विरोधकांना अटक करण्याचे किंवा त्यांना देशातून हद्दपार करण्याचे सर्वाधिकार लष्कराकडे जाणार आहेत. यात अमेरिकेचा व्हिसा मिळाला, म्हणजे अमेरिकेत कायमचे रहाण्याचे अधिकार नाहीत, हे आधीच ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अमेरिकेत रहात असलेल्या स्थलातरितांमध्ये अधिक दहशतीचे वातावरण पसरले आहे. (Donald Trump)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.