Home » फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर.. – सामनातून टीका

फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर.. – सामनातून टीका

by Correspondent
0 comment
Share

पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर आणि दत्ता एकबोटे यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शिवसेनेनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरोग्यविषयक काम केलं असतं तर आतासारखी जम्बो सेंटर्स उभारण्याचं काम कमी झालं असतं अशी टीका सेनेनं केली आहे. विशेष म्हणजे, मागील सरकारमध्ये पाचही वर्षं हे खातं शिवसेनेकडे होतं.

शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मागील सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही’ अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली.

‘आरोग्यविषयक आणीबाणीच्या स्थितीत दुर्दैवाने अनेक गोष्टी काही काळ नियंत्रणाबाहेर जातात, पण परिस्थितीवर नियंत्रण आणून पुन्हा सगळे स्थिरस्थावर करणे हाच राज्यकर्त्यांचा पुरुषार्थ ठरतो. पुण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे व सरकार किंवा महानगरपालिका अपयशी ठरत आहे असे रोज बोंबलण्याने काही पक्षांना राजकीय प्रसिद्धी मिळेल, पण अशाने कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या यंत्रणांचे खच्चीकरण होत असते. पुण्यातील महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरात भाजपचे आमदार, खासदार आहेत. या सगळ्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी एकदिलाने काम केले तरच कोरोनाशी नीट लढता येईल’ असंही सेनेनं आपल्या लेखात म्हटलं आहे.

‘राज्य सरकार, पी.एम.आर.डी.ए., महापालिका यांच्यात समन्वय असायला हवा. मुंबई-ठाण्यात हा समन्वय आहे व त्याचा फायदा झाला. पुण्यात राज्य सरकारतर्फे जम्बो कोविड सेंटर उभे केले. त्यात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होण्याआधीच ते सुरू केले, असा आरोप पहिल्या दिवसापासून सुरू आहे. सेंटरचे उद्घाटन घाईघाईने करून घेतल्याची टीका निरर्थक आहे. यापेक्षा मोठी कोविड सेंटर्स मुंबई-ठाण्यात चांगल्या पद्धतीने चालविली जात आहेत. पुण्यातही ती चालविणे हे सगळय़ांचेच कर्तव्य आहे. जे कोरोनाला न घाबरता उपचार करीत आहेत असे डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्ग हे राजकीय टीका, संताप यातून निर्माण झालेल्या दहशतीने सेंटरमध्ये थांबायला तयार नाहीत’ असा आरोपही शिवसेनेनं भाजपवर केला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.