– श्रीकांत नारायण
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच मुंबईतील सेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात जो ‘राडा’ झाला तो म्हणजे शिवसेना-भाजपमधील संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर आल्याची पावती होती. मुंबईनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथेही नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पेट्रोलपंपावर असाच शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहावयास मिळाला.
या दोन्ही घटना, आगामी काळात राज्यात शिवसेना – भाजपमधील संघर्ष अधिक व्यापक होण्याची नांदीच म्हणावी लागेल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती केलेली असतानाही निवडणूक निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर भाजपशी असलेली युती तोडली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
महाराष्ट्रासारख्या एका महत्वाच्या प्रगत राज्यातून भाजपची एक तर सत्ता गेली शिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या रूपाने शिवसेनेला राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. या ‘दुहेरी’ पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजपने ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे आघाडीचे सरकार कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपली सुटका करून घेतली. त्यामुळे भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. उलट हे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार ‘कोरोना’ काळातही वरचेवर मजबूत होत जात असल्याचे चित्र दिसून आले.
श्री उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्रीपद राहणार असल्याबाबत आघाडीत सध्या तरी एकमत असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्षे राज्य करते की काय अशी भीती भाजपाला वाटत असावी त्यामुळेच भाजपने (BJP) या सरकारविरुद्ध अधिकाधिक आक्रमक होण्याचे धोरण अवलंबिले असावे असे दिसते.
त्याचीच एक झलक मुंबईत सेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाच्या निमित्ताने पाहावयास मिळाली. त्यापाठोपाठ कुडाळ येथेही सेना – भाजपमधील असाच संघर्ष पाहावयास मिळाला. थोडक्यात शिवसेना – भाजपमधील मतभेद आता टोकाला गेल्याने त्यांचा संघर्ष आता रस्त्यावर पहायला मिळणार असे सध्याचे चित्र आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही प्रारंभापासूनच आक्रमक होती. आणि स्वतः बाळासाहेबही आपल्या आक्रमक शैलीत भाषणे करताना त्याचे बेधडक समर्थन करायचे. बाळासाहेब शिवसेनाप्रमुख असताना त्यांनी मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर ‘लुंगी’वाल्यांशी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर ‘दाढी’वाल्यांशी ‘सामना’ करताना आक्रमक धोरणच स्वीकारले होते. त्यामुळे एकेकाळी ‘शिवसेना म्हणजे गुंडांची संघटना’ असेही विरोधक बोलायचे.
परंतु उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची (Shivsena) सूत्रे हाती घेतल्यापासून शिवसेनेच्या मूळ रूपात बराच बदल झाला. तसे पाहता उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिमत्वच मुळी मवाळ आहे. त्यामुळे त्यांनी कितीही ‘आक्रमक’ भाषा बोलली तरी तिचा फारसा प्रभाव जाणवत नाही. (याउलट मनसेचे नेते राज ठाकरे यांचे आहे. त्यांनी कितीही ‘मवाळ ‘ भाषा बोलली तरीही ते आक्रमकच वाटतात.) त्यामुळे जेंव्हा उद्धवजींची तुलना बाळासाहेबांच्या नेतृत्वाशी केली जाते तेंव्हा ते साहजिकच कमी पडतात. परंतु पक्ष संघटनेचा विचार करता अनेकदा व्यावहारिक पातळीवर न बोलता महत्वाचे निर्णय घेऊन त्यांनी आपला परिपक्वपणा दाखविला आहे.
भाजपचे राष्ट्रवादाचे धोरण लक्षात घेता त्या पक्षाला हळूहळू प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणायचे आहे हे जेंव्हा त्यांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनी भाजपबरोबर फरफटत न जाण्याचा निर्णय घेतला. आणि महाराष्ट्रात गेली तीस-पस्तीस वर्षे असलेली भाजपबरोबरची युती तोडली. एवढेच नव्हे तर भाजपच्या नाकावर टिच्चून स्वतः मुख्यमंत्री होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटून गेले. या दरम्यान हे सरकार फार काळ टिकू नये म्हणून भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आघाडी सरकारमधील कुरबुरी वाढत जाऊन हे सरकार कोसळेल असे भाकीत राज्यातील अनेक भाजप नेत्यांनी या काळात व्यक्त केले. मात्र त्यांचे भाकीत खरे होण्याची तूर्तास तरी शक्यता नाही.
आघाडी सरकारमध्ये सर्व महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे असल्यामुळे या सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे वरून भासत असले तरी शेवटी मुख्यमंत्री या नात्याने आपले वजन कायम राखण्यात उद्धवजींना यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, यापुढे कोणाची पालखी उचलणार नाही तर स्वतःच्या अटी व शर्तीवर राजकारण करेल असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपलाही सूचक इशारा दिला आहे.
तसेच स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसलाही स्वबळ महाराष्ट्राच्या हितासाठी नसेल तर लोक जोड्यांनी मारतील असे स्पष्ट सांगून फटकारले आहे. ही उद्धव-नीतीच शिवसेनेच्या स्वतंत्र बाण्याची प्रचिती देते.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे राज्याच्या राजकारणात नव्याने खळबळ निर्माण झाली आहे. या पत्रात सरनाईक यांनी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची केलेली युती तोडावी आणि पुन्हा भाजपशी युती करून नवे सरकार स्थापन करावे अशी उघडपणे मागणी केली आहे.
सरनाईक यांच्यामागे सध्या ईडीचा आणि सीबीआयचा ससेमिरा मागे लागला असल्यामुळे त्यातून वाचण्यासाठी त्यांनी अशी मागणी केली असावी हे उघडच आहे. सरनाईक यांच्या या मागणीमुळे भाजपचे काही नेते मात्र खुश आहेत कारण त्यांना पुन्हा एकदा सेना -भाजप ची युती होण्याची शक्यता वाटत आहे.
(आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे सातत्याचे प्रयत्न पाहता कदाचित हा भाजपचाही ‘प्लॅन’ असू शकतो किंवा दुसरा विचार केल्यास ती ‘उद्धव-नीतीची ‘खेळी ‘ही असू शकते ) मात्र सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’ मुळे आघाडी सरकारला लगेच धोका निर्माण होईल असे वाटत नाही. मात्र हा ‘लेटरबॉम्ब’ फुसकाच निघाला तर मात्र नजीकच्या काळात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होईल हे मात्र निश्चित.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.