रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं थोडंफार अस्तित्व असलेल्या भागातच राजकीय भूकंप झाला आहे. पनवेलमधील नगरसेवक हरीश केणी यांच्यासह पाच नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पाच नगरसेवक तथा कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रसंगी रामशेठजी ठाकूर, आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार महेशजी बालदी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
पनवेल महापालिकेत शेकापचे 23 नगरसेवक आहेत. यातील चौघा जणांनी आधीच शेकापला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.
हरीश केणी यांनी पक्ष सोडताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली. शेकापमध्ये पैसेवाल्यांनाच पदे दिली जात असून फक्त काँट्रॅक्टरांनाच न्याय दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक हरीश केणी यांनी केला.