रात्रीची वेळ… फ्लोरिडाच्या सुनसान हायवेवर उभ राहून ती येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांकडे लिफ्ट मागत होती. समोरून येणारी एक गाडी तिला पाहून थांबली. ती गाडीत बसली. त्या गाडीत होता रिचर्ड मालरी. जो तिला पाहून आधीच तिच्यावर फिदा झाला होता. त्या दोघांच्याही छान गप्पा सुरू झाल्या. तीने गोड बोलून त्या रिचर्डचं मन जिंकलं. रिचर्डला वाटलं आता आपली लॉटरीच लागली पण तेवढ्यात अचानक तीने पर्समधील बंदूक काढून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ही होती तिची पहिली शिकार ! आता सिरियल किलर म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो एखादा क्रूर पुरुषी चेहरा. पण आजची गोष्ट अशा एका स्त्रीची आहे, जिने हा समज मुळापासून हादरवून टाकला. ती हायवेवर लिफ्ट मागायची, गोड बोलायची आणि मग.. कोण होती ती? तिचं थरकाप उडवणारं सत्य काय आहे? चला जाणून घेऊया… (Aileen Wuornos)

Aileen Wuornos
ही गोष्ट आहे एलीन वुर्नोसची. १९५६ मध्ये अमेरिकेतील मिशिगनमध्ये जन्मलेल्या एलीनचं आयुष्य म्हणजे दुःखाचा एक न संपणारा डोंगर होता. वडील गुन्हेगार आणि मानसिक रुग्ण, तर आईने लहानपणीच पोरकं करून सोडून दिलेलं. नशिबाने तिला आजी-आजोबांच्या छताखाली धाडलं, पण तिथेही नरकच मिळाला. कारण तिथे तिच्या आजोबांनीच तिच्यावर वाईट नजर टाकली. तिचं त्यांनी वारंवार लैंगिक शोषण केलं. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ती गर्भवती राहिली. या सर्व मानसिक व शारीरिक त्रासामुळे तिने शाळा सोडून दिली. पदरी आलेलं हे जगणं इतकं विदारक होतं की, पोट भरण्यासाठी तिला फ्लोरिडाच्या रस्त्यावर देहविक्रीचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यानंतर सततच शोषण, अत्याचार याचा तिला मानसिक त्रास होतच होता त्यात लोकांमधील क्रूरता पाहून एलीन अजूनच खचली. पण म्हणतात ना, अन्यायाची परिसीमा झाली की माणसाचा संयम सुटतो. ३३ वर्षांच्या आयुष्यात ३० पेक्षा जास्त वेळा लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या एलीनच्या मनात जगाबद्दल टोकाचा द्वेष निर्माण झाला. ज्या समाजाने तिला ओरबाडलं, त्याच समाजाचा सूड घ्यायचं तिने ठरवलं. ती आता ‘शिकार’ राहिली नव्हती, ती स्वतः एक ‘शिकारी’ बनली होती! ते म्हणतात ना villans are not born they are made!
तिची शिकार करण्याची पद्धत एखाद्या थ्रिलर सिनेमासारखी होती. ती हायवेवर उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना लिफ्ट मागायची. गाडीत बसल्यावर ड्रायव्हरशी अगदी गोड बोलून त्याचं मन जिंकायची आणि समोरच्याला संशय येण्यापूर्वीच आपल्या पर्समधील बंदूक काढून त्यांच्यावर गोळ्या झाडायची. रिचर्ड मालरी हा तिचा पहिला बळी ठरला. या पहिल्या खुनानंतर तिचा आत्मविश्वास असा काही वाढला की, पुढच्या वर्षभरात तिने फ्लोरिडा हायवेवर रक्ताचा सडा टाकत ६ जणांचा बळी घेतला. (Aileen Wuornos)
पोलीस चक्रावून गेले होते. ज्या क्रूर पद्धतीने या हत्या होत होत्या, त्यावरून तपास यंत्रणांना खात्री होती की हे काम एखाद्या ताकदवान पुरुषाचंच असणार. दरम्यान, एलीन मृतांच्या गाड्या आणि मौल्यवान वस्तू विकून आरामात जगत होती. याच काळात तिच्या आयुष्यात टायरॉन मुरहेड नावाची स्त्री आली. दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. पण एलीनला माहीत नव्हतं की, ज्या प्रेमासाठी ती आसुसली होती, तेच प्रेम तिला फासापर्यंत घेऊन जाणार होतं. एलीनला पकडण्यासाठी पोलिसांनी ‘प्रोफायलिंग’ आणि ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन्सचा वापर केला. तपासादरम्यान पोलिसांना रिचर्ड मालरीची—गाडी बेवारस अवस्थेत सापडली होती. या गाडीच्या आत आणि दरवाजावर पोलिसांना काही अस्पष्ट बोटांचे ठसे मिळाले. त्यावेळी एलीनने एका ‘पॉन शॉप’मध्ये काही चोरीच्या वस्तू विकल्या होत्या, जिथे तिने तिचं खरं नाव न वापरता टोपणनाव वापरलं होतं. मात्र, त्या वस्तूंच्या व्यवहारावर तिने स्वतःच्या हाताचे ठसे उमटवले होते. जेव्हा पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणच्या ठशांची तुलना पॉन शॉपमधील ठशांशी केली, तेव्हा त्यांना खात्री पटली की ही व्यक्ती एक महिलाच आहे. या मुळे पोलिसांना कळालं की हे मर्डर्स एलीननेच केले आहेत.

Aileen Wuornos
पण एलिन त्यांना काही केल्या सापडत नव्हती, तेव्हा त्यांनी तिच्या प्रेयसीला टायरॉनला गाठलं आणि तिला एक ऑफर दिली—”जर तू एलीनच्या विरोधात साक्ष दिलीस, तर तुला सोडून देऊ, अन्यथा तुलाही तुरुंगात सडावं लागेल.” टायरॉनने स्वतःला वाचवण्यासाठी एलीनचा विश्वासघात केला. पोलिसांच्या सांगण्यावरून टायरॉनने एलीनला फोन करून एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि १९९१ मध्ये एका बारमधून एलीनला बेड्या ठोकण्यात आल्या. जेव्हा एलीन कोर्टात उभी राहिली, तेव्हा संपूर्ण अमेरिका तिचा अवतार पाहून हादरलं. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तिने गर्जना करत सातही खुनांची कबुली दिली. ती ओरडून सांगत होती, “मी मारलेला एकही माणूस निरापराध नव्हता. त्या प्रत्येकाने माझ्यावर बलात्कार करण्याचा किंवा मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मी जे केलं ते आत्मसंरक्षणासाठी केलं! पण कायद्याच्या चौकटीत तिचे हे दावे सिद्ध झाले नाहीत आणि तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. (Aileen Wuornos)
=======
हे देखील वाचा : Jimmy Lai : या पत्रकारानं फोडलाय चीनला घाम
=======
९ ऑक्टोबर २००२. वयाच्या ४६ व्या वर्षी एलीनला विषारी इंजेक्शन देऊन फाशी देण्यात आली. मृत्यूला सामोरं जातानाही तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं. ३३ वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले…अवघ्या १३ व्या वर्षी ती गर्भवती राहिली…आणि तिथून सुरू झालेला एक भयानक खेळ अखेर संपला. पण शेवटीही तिने हसून निरोप दिला “मी पुन्हा येईन!” एलीन उर्नोसचं आयुष्य हे गुन्हेगारीच्या इतिहासातील एक काळं पान असलं, तरी ते एक भीषण प्रश्नचिन्ह उभं करतं एक साधी मुलगी कशी क्रूर खुनी बनते? तिच्यावर आधारित ‘मॉन्स्टर’ सारखे चित्रपट आजही पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणतात.
– श्रेया अरूण.
