सध्या मोठ्या जल्लोषामध्ये आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव सुरु आहे. या गणेशोत्सवामध्ये सर्वच भक्तगण विविध प्रसिद्ध आणि मोठ्या गणेश मंदिरांना आणि मंडळांना भेट देताना दिसत असतात. गणेशाचा महिमा आणि त्याचे भक्त यांबद्दल तर सर्वांना माहीतच आहे. या काळात सर्वच गणेश मंदिरांमध्ये आणि मंडळांमध्ये एकच तोबा गर्दी पाहायला मिळते. गणेशाचे या गणेशोत्सवादरम्यान दर्शन घेत त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात.
आता मुंबईतील एक अतिशय जगप्रसिद्ध गणपती आहे. त्याची कीर्ती आणि त्याचा महिमा सर्वदूर पसरला आहे. त्यामुळेच या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून, जगभरातून भाविक येथे येतात. यात सामान्य लोकांसोबतच कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा देखील यात समावेश असतो. येथे येणाऱ्या लोकांची संख्या देखील खूपच असते. अनेक तास उभे राहून मग बाप्पाचे दर्शन भक्तांना मिळते.
अशातच बाप्पाच्या दर्शनासाठी व्हीआयपी रांग, नवसाची रांग, मुख दर्शन रांग अशा विविध रांग असतात. जेणेकरून दर्शन घेणे सर्वांना सोयीस्कर होईल. सोबतच तिथे अनेक स्वयंसेवक आणि बॉडीगार्ड्स देखील असतात. सध्या सोशल मीडियावर देखील अशा मोठमोठ्या गणपती मंडळांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मंडळांमध्ये आम आणि खास लोकांमध्ये केल्या जाणाऱ्या फरकाचे दर्शन या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
View this post on Instagram
नुकतेच बाप्पाच्या दर्शनासाठी हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री पोहचली. मात्र तिच्यासोबत तेथील मंडळाच्या लोकांनी गैरवर्तन केले. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. यावर अनेक लोकांनी आणि कलाकारांनी त्यांचे मत मांडले. यातच मराठी टीव्ही विश्वातील अभिनेत्री शर्मिला शिंदेने देखील तिचे मत व्यक्त केले आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दुर्गा जहागीरदार ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदेने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. शर्मिलाने देव सर्वत्र आहे त्यामुळे घरी बसून बाप्पाची पूजा करा असे आवाहान भाविकांना तिच्या पोस्टमधून केले आहे.
शर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतींचं दर्शन घडवायची. गर्दीत चेंगरत चेंगरतच दर्शन घ्यायचो आम्ही सुद्धा… पण, आता मी एक कलाकार आहे. मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते. इतरांनी ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळा. देव सर्वत्र आहे. घरी बसून नमस्कार करा.
आपला माणुसकीचा कोटा (Quota) high ठेवा. आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. त्यांची म्हातारपणी सेवा करा. माणसांसाठी आणि इतर प्राणिमात्रांसाठी मनात दया-माया असुद्या. दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा. बास! यापेक्षा मोठी भक्ती काय असेल. गणपती बाप्पा मोरया!
PS : जी मंडळं भाविकांना नीट वागवतात तिथे भाविकांनी सुद्धा सहकार्य करावे.”
दरम्यान शर्मिलाची ही पोस्ट सध्या कमालीची गाजत असून, नेटकऱ्यांनी देखील तिच्या मताला योग्य म्हणत तिला पाठिंबा दिला आहे. तिच्या पोस्टवर अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी ‘अगदी बरोबर आहे ताई तुमचे’ अशा कमेंट्स केल्या आहे.