ज्या देशाची जनता गरीबीत जगण्यासाठी संघर्ष करीत असून तेथील राजकारणी मात्र आपल्या नवाबी थाटानं जगाचं लक्ष वेधून घेत आहेत, असा देश कोणता, हा प्रश्न विचारला, तर एकच उत्तर आहे, ते म्हणजे, पाकिस्तान. पाकिस्तानमधील सत्ताधारी असो वा विरोधक असो, या सर्वांच्या नवाबी थाटाच्या रहाण्यावर अनेकवेळा पाकिस्तानमधील सामान्य जनता टीका करत असते. आता अशीच टीका पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराण्यावर सुरु आहे. त्याला निमित्त झाले आहे, नवाज शरीफ यांचे नातू आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचे पुत्र जुनैद सफदर आणि ज्येष्ठ राजकारणी शेख रोहेल असगर यांची नात, शांझे अली रोहेल यांचे लग्न. लाहोरमध्ये झालेल्या या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (Nawaz Sharif)
जुनैद सफदर याचा हा दुसरा विवाह आहे. मरीयम नवाज यांच्या एखाद्या राजवाड्यासारख्या घरामध्येच हा विवाह झाला. या विवाहाचे जे शुट करण्यात आले, त्यातून विवाहावर करोडो रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय वधू-वरांसह अन्य कुटुंबानीही भारतातील प्रसिद्ध ब्रँडचे आणि ड्रेस डिझायनरचे कपडे वापरल्याचे स्पष्ट झाले. वधू शांझे अली रोहोल, हिने घालतेला लेहंगा तर लाखोंचा असल्याची माहिती मिळाल्यावर पाकिस्तानमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. जेथील जनतेला, एकवेळ उपाशी रहावे लागत आहे, तेथील राजकारणी आपल्या नवाबी थाटासाठी लाखो रुपये फक्त कपड्यांवर खर्च करीत आहेत, हा कुठला न्याय हा प्रश्नही विचारला जात आहे.

junaid safdar wedding
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबात झालेल्या एका लग्नामुळे पाकिस्तानमध्ये वाद सुरु झाला आहे. नवाज शरीफ यांचे नातू जुनैद सफदरच्या लग्नात झालेला अवाजवी खर्च हा सध्या टीकेचे लक्ष झाला आहे. लाहोरमधील शरीफ कुटुंबाच्या जती उमरा येथील निवासस्थानी झालेल्या मेहंदी समारंभात, वधू शांझे अली रोहेलने प्रसिद्ध भारतीय डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेला हिरवा लेहंगा घातला होता. लेहंग्यात सब्यसाचीचे सिग्नेचर हेरिटेज, गोल्डन जरदोजी काम होते. या पन्ना लेहग्यांची किंमत ५० लाखांच्या वर असल्याची माहिती आहे. यावर असलेल्या अस्सल सोन्याच्या कामासोबतच यावर जडलेले हिरेही मौल्यवान आहेत. फक्त एवढेच नाही तर वधू शांझे अली रोहेल हिने आपल्या मुख्य लग्न समारंभासाठीही भारतीय ड्रेस डिझायनरला पसंती दिली. तिने या समारंभात तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केलेली लाल साडी परिधान केली होती. या साडीवरही सोन्याच्या जरीचे काम केले आहे, आणि या साडीची किंमतही काही लाखात आहे. (Nawaz Sharif)
एकीकडे पाकिस्तानी अर्थव्यवस्था डबघाईला जात असतांना त्याला सावरण्यासाठी पाकिस्तानमध्ये मेड इन पाकिस्तानचा नारा लावण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानचे राजकारणी भारतीय वस्तूंना पसंती देत असल्याचे या लग्नावरुन स्पष्ट झाल्यामुळे येथील सोशल मिडियावर नवाज कुटुंबावर मोठी टीका सुरु झाली आहे. पाकिस्तानमध्ये एचएसवाय, नोमी अन्सारी, खादीजा शाह, झारा शाहजहान, फैजा सकलेन, बंटो काझमी, फराज मनन, सायरा शकीरा, मारिया बी., सानिया मस्कतिया आणि एरम खान सारखे ड्रेस डिझायनर असतांना भारतीय डिझायनरची गरज का भासावी हा प्रश्न विचारला जात आहे.
=============
हे देखील वाचा : UK Poverty Crisis : राजाचा देश गरीब होतोय
=============
फक्त वधू आणि वरानी घातलेल्या कपड्यांवर टीका होत आहे, असे नाही तर वराची आई आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यासुद्धा टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. मरियम नवाज यांनीही लाखो रुपये किंमतीचा लेहंगा घातला होता. शिवाय लग्नात मरियमने घेतलेल्या हिरवी बॅगेची किमंत 281,000 रुपयांपेक्षा जास्त असल्याची चर्चा सुरु आहे. यासोबत मरियमनं लग्नात घातलेले पन्न्याचे दागिनेही करोडो रुपयांचे होते. त्यामुळे जनतेला साधेपणानं रहा, असा सल्ला देणारी मरियम स्वतः केव्हा साधेपणानं रहाणार असा प्रश्न सोशल मिडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्येही मरियम यांनी त्यांचा पुतण्या झैद हुसेन नवाज शरीफ याच्या लग्नात सब्यसाचीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता, तेव्हाही तिच्यावर टीका झाली होती, पण यातून मरियमनं काहीही धडा घेतलेला नाही, हे आता उघड झाले आहे. (Nawaz Sharif)
सई बने.
