सध्या नवरात्राची सगळीकडेच धूम पाहायला मिळत आहे. मंडळांमध्ये देवीची स्थापना तर झाली सोबतच घरोघरी देखील घटांची स्थापना झाली आहे. आदिशक्तीने नऊ वेगवेगळ्या रुपात अवतार घेऊन या नवदुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे नवरात्र साजरे केले जाते आणि दुर्गेच्या या नऊ अवतारांची पूजा केली जाते. देवीचा पहिला अवतार शैलपुत्री हा होता, तसेच देवीने दुसरा अवतार ब्रह्मचारिणीचा धारण केला होता. त्याचप्रमाणे देवीने तिसरा अवतार चंद्रघंटा हा धारण केला. आज नवरात्राची तिसरी माळ. आज देवीचा चंद्रघंटा अवतार आहे. जाणून घेऊया या अवताराबद्दल आणि देवीच्या पूजेबद्दल.
नवरात्रीत दुर्गामातेचे तृतीय रूप आहे ‘चंद्रघंटा’ आहे. या रूपात देवीची आराधना केल्यामुळे आपले मन शांत होते आणि आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवता येते. यासोबतच खंबीरपणा वाढीस लागतो. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते. ‘चंद्रघंटा’ नावाप्रमाणेच शांतचित्त आणि आत्मबळ प्रदान करणारी देवी आहे.
दुर्गा देवीचे हे तिसरे ‘चंद्रघंटा’ स्वरूप शांती देणारे आणि कल्याणकारी आहे. देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून या रुपाला ‘चंद्रघंटा’ असे म्हणतात. देवीच्या कृपेमुळे भक्तांची सर्व संकटं दूर होतात. या देवीच्या पुजेने आपल्या अंगी आत्मविश्वास येतो, भीती नाहीशी होते आणि विनम्रता येते.
तुम्हाला माहित आहे का या देवीला चंद्रघंटा देवी असे का म्हणतात? चला जाणून घेऊया. तिच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात. तिला एकूण दहा हात असून, त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ, गदा, धनुष्य, बाण, कमळ, तलवार, घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणारी अभय मुद्रामध्ये आहे. दशभुजा हे दशदिशांचे प्रतिक आहे. देवी आपल्या हातातील घंटा नादाने सर्वांना भयमुक्त करून निर्भय बनवते. भक्तांना नवजीवन, नवउत्साह, नवचैतन्य देऊन उत्साहित करते. ती वाघावर स्वार आहे. चंद्रघंटा हे शांतता, शांतता आणि शुद्धतेशी संबंधित आहे.
पारंपारिक विधींमध्ये कलशात माँ चंद्रघंटाला चमेलीची फुले, तांदूळ आणि चंदन अर्पण करणे, त्यानंतर दूध, दही आणि मधाने अभिषेक करणे समाविष्ट आहे. नवरात्रीमध्ये भक्त देवीसाठी खास साखरभोग तयार करतात. असे मानले जाते की ती पापींना क्षमा करण्यास, दुःख दूर करण्यास आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास सक्षम आहे. तसेच या देवीला चंडिका, रणचंडी आणि शक्ती असेही म्हणतात.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप असलेल्या चंद्रघंटा देवीची आज पूजा केली जाते. ॐ देवी चंद्रघंटाय नमः या जपाने मातेची पूजा केली जाते. चंद्रघंटा मातेला सिंदूर, अक्षत, अगरबत्ती, धूप आणि फुले अर्पण करतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नित्यक्रमानुसार दुर्गासप्तषतीचे पठण करावे आणि देवीची आरती करावी तसेच नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करावा.
चंद्रघंटा देवीला नैवेद्य
चंद्रघंटा देवीला केशर रंगाची खीर अर्पण करा. यासोबतच लवंग, वेलची, पंचमेवा आणि दुधापासून बनवलेल्या इतर मिठाईचा वापर करु शकता. तसेच देवीला नैवेद्यात साखरेची मिठाई ठेवा आणि पेढेही अर्पण करु शकता.
चंद्रघंटा देवी मंत्र:
पिण्डज प्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते महयं चन्द्रघण्टेति विश्रुता।।
वन्दे वांछित लाभाय चन्द्रार्धकृत शेखरम्।
सिंहारूढा चंद्रघंटा यशस्वनीम्॥
मणिपुर स्थितां तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्।
रंग, गदा, त्रिशूल,चापचर,पदम् कमण्डलु माला वराभीतकराम्॥
चंद्रघंटा देवीची उत्पत्ती
हिंदू धर्मग्रंथांनुसार, जेव्हा देव आणि असूर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते, तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला. इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले. तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायु आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले.
देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे. मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिव शंकर खूप क्रोधित झाले. त्याच वेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली. देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या उर्जेमध्ये मिसळली.
ही ऊर्जा दहा दिशांना पसरु लागली. मग तिथे एका मुलीचा जन्म झाला. भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला. भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले. त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिले. इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला.
सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला. मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली. तिचे विशाल रुप पाहून महिषासुर भीतीने थरथर कापत होता. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशाप्रकारे, देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या.
=======
हे देखील वाचा : खान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा इतिहास
=======
देवी चंद्रघंटाची आरती
जय मां चंद्रघंटा सुख धाम। पूर्ण कीजो मेरे सभी काम। चंद्र समान तुम शीतल दाती।चंद्र तेज किरणों में समाती। क्रोध को शांत करने वाली। मीठे बोल सिखाने वाली। मन की मालक मन भाती हो। चंद्र घंटा तुम वरदाती हो। सुंदर भाव को लाने वाली। हर संकट मे बचाने वाली। हर बुधवार जो तुझे ध्याये। श्रद्धा सहित जो विनय सुनाएं। मूर्ति चंद्र आकार बनाएं। सन्मुख घी की ज्योति जलाएं। शीश झुका कहे मन की बाता। पूर्ण आस करो जगदाता। कांचीपुर स्थान तुम्हारा। करनाटिका में मान तुम्हारा। नाम तेरा रटूं महारानी। भक्त की रक्षा करो भवानी।