शारदीय नवरात्रोत्सवाची जल्लोषात सुरुवात झाली आहे. प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसांमध्ये आदिमायेच्या विविध नऊ अशा रुपांचे पूजन केले जाते. आज ४ ऑक्टोबर रोजी नवरात्राची दुसरी माळ असून, ही दुसरी माळ दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची महती, मंत्र, महत्त्व यांविषयी माहिती घेऊया.
ब्रह्मचारिणी माता ही ध्यान, ज्ञान आणि त्याग यांची प्रमुख देवता आहे. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते. ब्रह्मचारिणी देवीची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या कमंडलातून झाली असे मानले जाते, म्हणूनच तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. जाणून घेऊया माता ब्रह्मचारिणीच्या पूजेची सर्वोत्तम वेळ, पूजा पद्धत, आवडता रंग, फुले, आजचा रंग आणि नैवेद्य.
‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ ‘तपस्या’ आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. “वेदस्तत्वं तपो ब्रम्ह” म्हणजे वेद, तत्व आणि ताप हे ब्रम्ह शब्दाचे अर्थ आहेत. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप ज्योतिर्मयी, तेजस्वी आणि अत्यंत भव्य असून, देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि हातामध्ये कमंडलू आहे. मुखमंडल तेजोमय असून, हातात मनगटांना आणि बाजुबंदाना कमळाच्या फुलांनी सुशोभित केले आहेत.
ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
ब्रह्मचारिणी माता साध्या स्वभावाची असून दुष्टांना मार्गदर्शन करते. हवनात धूप, कापूर, लवंगा, सुका मेवा, साखर मिठाई आणि देशी तूप अर्पण करून ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी देवीचे आवडते पदार्थ – फळे, पांढरी मिठाई, गोड मिठाई, खीर आदी आहेत.
ब्रह्मचारिणी देवीची पूजा पद्धत :
सकाळी उठून स्नान करून देवघरात यावे. देवीला गंगाजलाने अभिषेक करा. देवीला अक्षत, लाल चंदन, वस्त्र आणि लाल फुले अर्पण करा. सर्व देवी-देवतांचा जलाभिषेक करून फळे, फुले आणि गंध लावावा. प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा. घराच्या मंदिरात अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावावा. दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करा. सुपारीच्या पानांवर कापूर आणि लवंग ठेवा आणि माता ब्रह्मचारिणीची आरती करा.
ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
ह्रीं श्री अम्बिकायै नम:
दधाना काभ्याम् क्षमा कमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा
देवी ब्रह्मचारिणी कथा
तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.
एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे एक नाव पडले.
अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी ‘उमा’ अगं! नको ग नको! अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे ‘उमा’ हे एक नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले.
शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की ‘हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.’ असा वर त्यांनी दिला.
=======
हे देखील वाचा : मुंबईची ग्रामदेवता – मुंबा देवीचा इतिहास
=======
ब्रह्मचारिणी देवीची आरती
जय अंबे ब्रह्माचारिणी माता।
जय चतुरानन प्रिय सुख दाता।
ब्रह्मा जी के मन भाती हो।
ज्ञान सभी को सिखलाती हो।
ब्रह्मा मंत्र है जाप तुम्हारा।
जिसको जपे सकल संसारा।
जय गायत्री वेद की माता।
जो मन निस दिन तुम्हें ध्याता।
कमी कोई रहने न पाए।
कोई भी दुख सहने न पाए।
उसकी विरति रहे ठिकाने।
जो तेरी महिमा को जाने।
रुद्राक्ष की माला ले कर।
जपे जो मंत्र श्रद्धा दे कर।
आलस छोड़ करे गुणगाना।
मां तुम उसको सुख पहुंचाना।
ब्रह्माचारिणी तेरो नाम।
पूर्ण करो सब मेरे काम।
भक्त तेरे चरणों का पुजारी।
रखना लाज मेरी महतारी।