– श्रीकांत नारायण
“काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था उत्तर प्रदेशातील बड्या जमीनदारासारखी झाली आहे” असे भाष्य महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. ‘इंडिया टुडे’ च्या ‘मुंबई तक’ या डिजिटल वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीप्रसंगी त्यांनी आपले हे मत व्यक्त केले.
“उत्तर प्रदेशात (तसेच महाराष्ट्रातही) कोणे एके काळी बडे जमीनदार होते. त्यांच्या मालकीच्या खूप मोठ्या जमिनी होत्या आणि त्याच्या जोरावर या जमीनदारांनी ‘बड्या हवेल्या’ बांधल्या होत्या. मात्र नंतर कुळकायदा आला आणि अशा जमीनदारांच्या जमिनी हातातून कायमच्या गेल्या. उरल्या फक्त हवेल्या. मात्र आता त्या ‘हवेल्या’ चालविणे जमीनदारांना अवघड झाले आहे” असा पवार यांच्या म्हणण्याचा मथितार्थ होता.
थोडक्यात सोनिया गांधी /राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष चालविणे अवघड झाले आहे असे त्यांना प्रत्यक्षात म्हणावयाचे आहे त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाची बड्या ‘जमीनदारा’ बरोबर तुलना केली.
वास्तविक, शरद पवार आणि ‘जमिनीचा’ फार निकटचा संबंध आहे. ‘जमीनदारी’ही त्यांना चांगली माहित आहे त्यामुळे त्यांचे हे “विश्लेषण” अगदी योग्य आहे असे म्हणावे लागेल. कोणे एकेकाळी म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यापासून ‘काश्मीरपासून कन्याकुमारी’ पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. अगदी ओसाड माळरानावरही काँग्रेसचा (Congress) ‘दगड’ निवडून येण्यासारखी परिस्थिती होती.
याचे एकच मुख्य कारण होते ते म्हणजे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सुरू केलेल्या स्वातंत्र्यमुक्ती चळवळीला जनतेचा पाठिंबा मिळून देश स्वतंत्र झाला होता आणि जनतेच्या मनात हीच भावना कायम घर करून राहिली होती. त्यातच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच महात्मा गांधी यांची हत्या झाली त्यामुळे जनत्तेच्या मनात काँग्रेसबद्दल आपोआपच सहानभूती निर्माण झाली आणि देशात सर्वत्र काँग्रेसचे ‘पीक’ जोरात आले.
त्यावेळी विरोधी पक्ष नावालाच होते. ज्यांच्यामुळे जनमानसात काँग्रेसला तीव्र विरोध होण्याची शक्यता होती अशा विरोधी नेत्यांनाच नंतर काँग्रेसने ‘पावन’ करून घेण्यास सुरुवात केली त्यामुळे काँग्रेसला सर्वत्र रान मोकळे मिळाले. परंतु नंतर नंतर याच परिस्थितीचा फायदा काँग्रेसच्या नेत्यांनी घ्यायला सुरुवात केली. अनेक राज्यात ‘प्रादेशिक सुभेदार’ निर्माण होऊ लागले. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचे स्वयंभू नेते निर्माण झाले.
पक्षात आपलाच शब्द अंतिम करण्यासाठी तसेच आपापले गट बळकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आणि त्यामध्ये अनेक नेते यशस्वी पण झाले. निवडणुकीत आपल्या आवडत्या उमेदवारालाच तिकीट मिळावे यासाठी खास प्रयत्न सुरु झाले आणि प्रसंगी आपल्या नावडत्या उमेदवाराला उमेदवारी दिलीच तर पक्षाचे आदेश धाब्यावर बसवून त्याला पाडण्याचे ‘उद्योग’ही सुरू झाले. त्यामधून काँग्रेस पक्ष खिळखिळा होण्यास सुरुवात झाली मात्र या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नव्हते कारण त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा खूप वेगाने वाढत होत्या.
महाराष्ट्रात तर सर्वप्रथम शरद पवार यांनीच १९७८ साली काँग्रेस पक्षाला सुरुंग लावला. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस फोडून ‘पुलोद’ चा प्रयोग केला. तो यशस्वी झाल्यामुळे अनेक नेत्यांमध्ये फुटीची भावना प्रबळ झाली. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनीच आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याचे प्रयत्न केले.
काँग्रेसच्या ‘मशागत केलेल्या जमिनी’ अशा नेत्यांनीच बळकावल्या आणि त्यामुळे काँग्रेस हळूहळू ‘ओसाड’ होऊ लागली. थोडक्यात सुरुवातीच्या काँग्रेसच्या मजबूत ‘हवेली’च्या आधारावर काही नेत्यांनी आपल्या ‘हवेल्या’ मजबूत केल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्याचे ठळक उदाहरण आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन शरद पवार यांनी आपली ‘राष्ट्रवादीची हवेली’ काही काळ का होईना मजबूत केली आहे हे मात्र नि:संशय.
आता आहे त्या अवस्थेत काँग्रेसची हवेली शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसचे कसेबसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गतवैभव मिळविण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व पक्षात काही बदल करण्यासाठी उत्सुक नाही असेही शरद पवार यांना वाटते. तसे त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट म्हटलेही आहे.
त्यांचा रोष साहजिकच सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर आहे. उभयतांनी नेतृत्वबदलाबत काही धाडसी निर्णय घेतला तरच काँग्रेसच्या हवेलीला भरभराटीचे जुने दिवस येतील असे पवारांचे म्हणणे असावे. म्हणजे त्याच्या आधारे आपलेही पंतप्रधानपदाचे स्वप्न साकार झाले तर उत्तमच असाही त्यामागचा मुख्य हेतू असावा. त्यादृष्टीने शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाची ‘जमीनदार आणि हवेली’ अशी केलेली तुलना सार्थच म्हटली पाहिजे.
त्यांचे हे राजकीय भाष्य म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात त्याप्रमाणे ‘करेक्ट विश्लेषण’ आहे. मात्र शरद पवार यांच्या या ‘करेक्ट विश्लेषणाचा’ काँग्रेसचे विद्यमान नेतृत्व कसा अर्थ लावते त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंवून राहणार आहेत. कारण आजही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना (…. आणि काही प्रमाणात जनतेलाही) काँग्रेसच्या हवेलीचा मालक हा गांधी घराण्यातीलच असावा आणि तोच काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देईल असा दृढ विश्वास वाटतो हे शरद पवार यांच्यासारख्या ‘जाणत्या राजाला’ माहित नसेल असे मुळीच वाटत नाही.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.