मराठी माणसाला उद्योग धंदा करता येत नाही असे आपण कित्येकदा ऐकले आहे. मराठी माणसाने फक्त दुसऱ्याची चाकरी करावी किंवा शेती करावी. असे बोलून अनेकदा मराठी माणसांचा अपमान देखील करण्यात आलेला आहे.
मात्र या सर्वाला छेद देत मराठी माणुस एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे आपल्याला एका व्यक्तीने एकोणिसाव्या शतकामध्ये दाखवून दिले होते. हा मराठी माणूस म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर (Laxmanrao Kirloskar) होय.
याच मराठी माणसाने मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हा मराठी माणसावर लागलेला कलंक पुसून काढला होता. आज त्यांची जयंती त्यानिमित्त हा खास लेख. चला तर मग जाणून घेऊयात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी मराठी उद्योग क्षेत्रात कशी यशाला गवसणी घातली होती.
बेळगाव जिल्ह्यातील गुर्लेहोसूर नावाच्या एका छोट्याशा खेड्यात दि. २० जून १८६९ साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव लक्ष्मण काशिनाथराव किर्लोस्कर असे होते.
धारवाड आणि कलादगी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला आणि यंत्रसामग्री या दोन गोष्टी प्रचंड आवडायच्या. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन मोठ्या भावाच्या मदतीने १८८५ साली मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतली.
मात्र इथे सर्वात मोठी अडचण अशी आली की, किर्लोस्करांना शिक्षण घेत असताना पुढच्या दोन वर्षातच स्वतःच्यात रंगअंधत्व आढळुन आले. त्यामुळे त्यांचा एक आवडीचा छंद तिथेच सुटला. परिणामी त्यांना शिक्षण मध्येच थांबावावे लागले.
पण किर्लोस्कर इथेच न थांबता, त्यांनी पुढे मॅकेनिकल ड्रॉफ्ट्समन शिकायला सुरुवात केली. त्यांच्या या क्षेत्रातील आवड आणि अभ्यास बघता, व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटने (VJTI) त्यांना सहप्राध्यापक म्हणून पंचेचाळीस रुपये महिना पगारावर नोकरीवर ठेऊन घेतले. पुढे लवकरच ते प्रोफेसर किर्लोस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.
पण इथे नोकरी करत असताना ते मशीन कसे हाताळावे, दुरुस्ती कशी करावी, नव्याने मशीन तयार कसे करावे या अशा वेगवेळ्या गोष्टींचा अभ्यास ते करू लागले. त्यानंतर त्यांना अमेरिकन मेकॅनिकल इंडस्ट्रीविषयी वाचनाची आवड लागली.
नोकरी करत त्यांनी आपले मोठे बंधू रामन्ना किर्लोस्कर यांना त्यांच्या बेळगावातील सायकल व्यवसायला हातभार लावायला सुरूवात केली. १८८७ पासून त्यांनी नोकरी करत मुंबईहून सायकली विक्रीसाठी बेळगावला पाठवायला सुरुवात केली.
पुढे त्यांचे नोकरीत मन रमत नसल्याने, त्यांनी प्रोफेसरची नोकरी सोडून आपल्या भावाला व्यवसायात मदत करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी १८८८ साली नोकरी सोबत मुंबईही सोडली आणि थेट ते गावी येऊन सायकल व्यवसाय करू लागले.
इथे त्यांनी फक्त सायकल विक्री केली नाही तर ज्या व्यक्तीला सायकल येत नाही त्या व्यक्तीकडून १५ रुपये घेऊन त्यांना सायकल सुद्धा शिकवली! सायकल धंद्यातली त्यांची वाढती कामगिरी बघता, या दोघा भावंडांनी थेट इंग्लंडच्या कंपनीशी करार केला. आणि स्वतःची ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ नावाने सायकल एजन्सी चालू केली.
पुढे आजून एक जोडव्यवसाय म्हणून किर्लोस्करांनी सॅमसन कंपनीची डिलरशीप घेऊन पवनचक्कीची विक्री करण्यास सुरुवात केली. पण त्यात त्यांना तोटा झाला. त्यामुळे त्यांनी वेळीच शहाणपण शिकत तिथून काढतापाय घेतला.
पुढे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी अमेरिकेतील एका मासिकात कापणी यंत्र पाहिले. आणि आपणही असेच यंत्र बनवायचे असे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी मुंबईहून यंत्रसामग्री आणली आणि १९०१ मध्ये त्यांनी स्वतःचे पाहिले उत्पादन बनवले. पण किर्लोस्करांनचे हेही उत्पादन फेल गेले. पण त्यांनी इथेच हार मानली नाही.
भारतात शेतकरी वर्ग जास्त आहे. त्यामुळे त्यांनी शेती उपयोगी यंत्र बनवण्याचे ठरवले. मग हे यंत्र काय बनवले? तर हे यंत्र होते नांगर. त्याकाळच्या लाकडी नांगराला टक्कर देण्यासाठी किर्लोस्करांनी लोखंडी नांगर बनवला.
पण यात आजून एक अडचण होती ती म्हणजे नांगराच्या किंमतीची, कारण त्याकाळी सामान्य नांगर ६ रुपयाला होता. तर किर्लोस्करांच्या नांगराची किंमत ही ४० रुपये होती. पण येणारे पिक जोम धरल्यास हा खर्च शेतकऱ्यांना सहज परवडेल असा किर्लोस्करांना ठाम विश्वास होता. आणि झालेही तसेच.
काही शेतकऱ्यांनी किर्लोस्करांना नांगर बनवण्याच्या ऑर्डर दिल्या. त्यानंतर हळूहळू किर्लोस्करांचा नांगर प्रसिद्ध होऊ लागला. वाढती प्रसिद्धी बघता १० मार्च १९१० मध्ये लक्ष्मणरावांनी एका माळरानावर “किर्लोस्कर ब्रदर्स” या नावाने कारखाना उभारला. या कारखान्यात शेतीव्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले.
पुढे १९२० मध्ये कारखान्याचे रूपांतर कंपनीत झाले. आणि या कंपनीत ऊसाचा रस काढण्याच्या यंत्रापासून ते शेतीच्या औषध फवारणी हातपंपा पर्यंत जवळपास लहान मोठी चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली. यात आजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे लक्ष्मणरावांना औंध संस्थांनचे दिवाण म्हणून १९३५ मध्ये नेमण्यात आले होते.
किर्लोस्करांची इंग्लंडच्या ऑइल कंपनीबरोबर करार करणारी किर्लोस्कर ब्रदर्स ही पहिली भारतीय कंपनी होती. यशाची अशी शिखरे सर करत सध्या किर्लोस्कर ग्रुपच्या जवळपास २६ कंपन्या आहेत. तसेच या कंपन्या जवळपास ७० देशात योगदान देत आहे.
त्याचे स्वप्न होते की कर्मचार्यांसाठी स्वत: चा उद्योग आणि समुदाय तयार करावा; आणि १९१० साली जिथे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड हा कारखाना सुरू केला तिथेच त्यांनी किर्लोस्करवाडी नावाने एक नगर बसवून हे स्वप्न साकार केले.
अशा या भारतीय उद्योग क्षेत्रात मराठी माणसाची मान उंचावणाऱ्या लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा मृत्यू २६ सप्टेंबर १९५६ रोजी झाला. लक्ष्मणरावांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन, भारत सरकारने त्यांच्या 100व्या जयंतीला म्हणजेच 20 जून १९६९ मध्ये त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले.
– निवास उद्धव गायकवाड