पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये हा आठवडा लॉकडाऊन सारखी परिस्थिती रहाणार आहे. इस्लामाबादमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद 15-16 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निमित्त पाकिस्तानमध्ये भारत, चीन, रशियामधील मान्यवर नेते आणि शिष्टमंडळ उपस्थित रहाणार आहे. आधीच पाकिस्तानची जगभर असलेली प्रतिमा आणि त्यात गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील वाढलेला हिंसाचार पहाता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इस्लामाबादचा ताबा लष्कराकडे दिला आहे. तसेच विशेष सुरक्षा दलही यावेळी तैनात रहाणार असून यादरम्यान इस्लामाबादमध्ये कुठलाही मोर्चा, आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या 23 व्या शिखर परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकरही उपस्थितीत रहाणार असून त्यांच्या सुरक्षतेचा भारताकडूनही आढावा घेण्यात येत आहे. (Shanghai Cooperation Organization)
पाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन 15-16 ऑक्टोबर रोजी होणार असून यावेळी अन्य देशातून येणारे मंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ यांच्या सुरक्षतेसाठी पाकिस्तान सरकार प्रचंड तणावाखाली आहे. परिषदेच्या सुरक्षेबाबत पाकिस्तान सरकारचा स्थानिक पोलिस आणि रेंजर्सवरही विश्वास नसल्याचे स्प्ष्ट झाले आहे. कारण सध्या इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या प्रत्येक कोपऱ्यात पाकिस्तानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. या लष्कराने इस्लामाबाद आणि रावळपिंडीमधील सर्व सार्वजनिक स्थळे, विवाह हॉल, कॅफे, रेस्टॉरंट आणि स्नूकर क्लब बंद केली आहेत. स्थानिक पोलिसांनी रावळपिंडी आणि इस्लामाबादमधील व्यापारी, हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना नोटिसा पाठवून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. (International News)
याशिवाय कुठल्याही मोर्चाला बंदी घातली आहे. गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ, सातत्यानं स्कुल करीत आहे. शिवाय शिखर परिषदेदरम्यान अशीच आंदोलने करुन भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनाही या आंदोलनात सहभागी करुन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अशी आंदोलने झाल्यास जगभरात पाकिस्तानची प्रतिमा अधिक मलीन होईल, याची काळजी शरीफ सरकारला वाटत आहे. या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग, रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. त्यांच्या सुरक्षतेसाठी पाकिस्तानी लष्कराचे १० हजार सैनिक आणि कमांडो तैनात करण्यात आले आहेत. (Shanghai Cooperation Organization)
पाकिस्तानमध्ये नुकतीच पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी जी आंदोलने केली, त्यानंतर इस्लामाबाद तीन दिवस बंद ठेवण्यात आले होते. मोबाईल नेटवर्क बंद करण्याबरोबरच शहराबाहेर जाणारे रस्तेही बंद करण्यात आले. तुरुंगात असलेल्या इम्रान खानला सोडण्यासाठी आता ही आंदोलने शिखर परिषदेच्या स्थळी करण्याचा पीटीआय कार्यकर्त्यांचा इरादा आहे. यासर्वात पाकिस्तानमध्ये हिंसक घटनाही वाढल्या आहेत. 6 ऑक्टोबरला कराची विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्यात दोन चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला आहे. 11 ऑक्टोबर रोजी बलुचिस्तान प्रांतातील एका खाजगी कोळसा खाणीत झालेल्या हल्ल्यामुळे 20 मजूरांचा मृत्यू झाला. या सर्वात आधुनिक हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे 15-16 रोजी होणा-या शिखर परिषदेच्या सुरक्षतेची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये 14 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक सुट्टीच जाहीर करण्यात आली आहे. (International News)
======
हे देखील वाचा : झाकीर नाईकची घेतली पाकिस्तानी नागरिकांना शाळा
======
या शिखर परिषदेत भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश. आशिया खंडातील व्यापार वाढवणे आणि परस्पर सामंज्यसं करणे हे या शिखर परिषदेचे प्रमुख उद्दीष्ट आहे. अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यावरण, सामाजिक-सांस्कृतिक संबंध या क्षेत्रात सुरू असलेल्या सहकार्यावर चर्चा केली जाणार आहे. शिवाय संघटनेच्या बजेटलाही मंजुरी देण्यात येणार आहे. त्यासाठी पाकिस्तानमध्ये परदेशी शिष्टमंडळे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. रशियाचे 76 सदस्यीय शिष्टमंडळ, चीनचे 15 सदस्यीय शिष्टमंडळ, भारताचे चार सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळ, किर्गिस्तानचे चार सदस्यीय शिष्टमंडळ आणि इराणचे दोन सदस्यीय शिष्टमंडळ इस्लामाबादला पोहोचले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकरही काही तासातच पाकिस्तानला दाखल होणार असून त्यांच्या सुरक्षतेसाठी पाकिस्तानवर मोठा दबाव आला आहे. शिवाय चीन मधील शिष्टमंडळही दाखल झाले आहे. चिनी अभियंत्यांवर वाढलेल्या हल्ल्यामुळे या शिष्टमंडळाचीही सुरक्षाही कडक करण्यात आली आहे. (Shanghai Cooperation Organization)
सई बने