उत्तरप्रदेशच्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर साकारले जात आहे. या मंदिरात पुढच्या वर्षी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधत प्रभू रामचंद्राचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. मंदिराचे कार्य जोरात सुरु असतांनाच प्रभू रामचंद्र आणि सीतामातेच्या मुर्तींसाठी अयोध्येत थेट नेपाळच्या पवित्र काली गंडकी नदीतून शालिग्राम (Shaligrama) दगड दाखल झाले आहेत. हे शालिग्राम मोठ्या मिरवणुकीतून अयोध्येत आले आहेत. त्यामुळे शालिग्राम म्हणजे काय याची उत्सुकता जागी झाली आहे.अयोध्येला पोहोचलेल्या शालिग्राम (Shaligrama) शिलेचे धार्मिक महत्त्व काय, ते नेपाळमधूनच का आणले, याबाबतही उत्सुकता आहे. नेपाळच्या पवित्र काली गंडकी नदीतून शालिग्राम दगड काढले जातात. भगवान विष्णूचे रूप मानल्या जाणाऱ्या या खडकांचा रामनगरीत भव्य सत्कार करण्यात आला. हे खडक सुमारे सहा कोटी वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. दोन्ही खडक 40 टनाचे आहेत. एका दगडाचे वजन 26 टन आहे तर दुसऱ्या दगडाचे वजन 14 टन आहे. गंडकी नदीजवळ शालाग्राम (Shaligrama) नावाचे मोठे स्थान आहे. येथील दगडांना शालाग्राम शिला म्हणतात. हिंदू परंपरेनुसार या खडकांमध्ये ‘वज्र-कीत’ नावाचा छोटा कीटक राहतो. कीटकाला हिऱ्याचा दात असतो जो शालिग्राम दगड चावतो आणि त्याच्या आत राहतो. आता अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे सहा कोटी वर्षे जुने असलेल्या या शालिग्रामाचा (Shaligrama) वापर भगवान श्रीरामाच्या बालस्वरूपाची मूर्ती आणि माता सीतेची मूर्ती बनवण्यासाठी केला जाणार आहे.
अयोध्येत दाखल झालेले शालिग्राम नेपाळच्या पवित्र काली गंडकी नदीतून काढण्यात आले आहेत. तेथे अभिषेक आणि विधीवत पूजा केल्यानंतर 26 जानेवारीला शिला रस्त्याने अयोध्येला रवाना करण्यात आली. हे खडक बुधवारी अयोध्येत पोहोचले. वैज्ञानिक संशोधनानुसार शालिग्राम हा एक प्रकारचा जीवाश्म दगड आहे. शालिग्राम खडक नेपाळमधील पवित्र गंडकी नदीच्या काठावर आढळतो. वैष्णवांनी पूजलेला हा सर्वात पवित्र खडक आहे. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्या धार्मिक महत्त्वामुळेच या शालिग्रामचा वापरही मोठ्याप्रमाणात होतो. त्यामुळे आज शालिग्राम (Shaligrama) नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे खडक आता गंडकी नदीतून जवळजवळ नामशेष झाले आहेत, गंडकी नदीपासून 173 किमी अंतरावर असलेल्या दामोदर कुंडात फक्त काही शालिग्राम आढळतात. शालिग्रामवरील खुणांनी त्याचे महत्त्व आणि गुण जाणले जातात. या खुणा बहुतेक वेळा भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्रासारखे असतात. शालिग्राम लाल, निळा, पिवळा, काळा, हिरवा अशा विविध रंगात आढळतात. सर्व रंग अत्यंत पवित्र मानले जातात. तरीही पिवळ्या आणि सोनेरी रंगाचे शालिग्राम (Shaligrama) सर्वात शुभ मानले जातात. यांच्या वापरानं भक्ताला अपार संपत्ती आणि समृद्धी देतात असे मानले जाते. शालिग्रामची अनेक रूपे आहेत, काही अंडाकृती आहेत, काही छिद्रे असलेले आहेत तर काहींवर शंख, चक्र, गदा किंवा पद्म आदी चिन्ह असतात. शालिग्राम बहुतेक वेळा भगवान विष्णूच्या विविध अवतारांशी संबंधित असतात, त्यामुळेच त्यांचे महत्त्व अधिक आहे.
वैष्णवांच्या मते शालिग्राम हे भगवान विष्णूचे निवासस्थान आहे. ज्यांच्याकडे शालिग्राम आहे, त्यांच्यासाठी कठोर नियम आहेत, आणि ते पाळावे अशी अपेक्षा असते. त्यामध्ये शालिग्रामची रोज पूजा करणे, आंघोळ केल्याशिवाय शालिग्रामला स्पर्श न करणे, शालिग्राम कधीही जमिनीवर ठेवू नये, सात्विक आहार करणे असे नियम शालिग्राम असणा-यांना पाळावे लागतात. भगवान श्रीकृष्णानेच महाभारतात युधिष्ठिराला शालिग्रामचे गुण सांगितल्याचे दाखले आहेत. देवूठाणी एकादशीच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. एका पौराणिक कथेनुसार, तुळशीने भगवान विष्णूला दगड होण्याचा शाप दिला होता, त्यामुळे भगवान विष्णूला शालिग्राम (Shaligrama) व्हावे लागले आणि या रूपात त्यांनी लक्ष्मीचे रूप मानल्या जाणार्या माता तुळशीबरोबर विवाह केला. शालिग्राम आणि भगवती स्वरूप तुळशीशी विवाह केल्याने सर्व दु:ख, रोग दूर होतात, असे सांगण्यात येतात. मान्यतेनुसार ज्या घरात रोज शालिग्रामची पूजा केली जाते, त्या घरातील सर्व दोष दूर होतात. याशिवाय या घरात विष्णूजी आणि महालक्ष्मी यांची कृपा रहाते. शालिग्राम हा स्वयंभू मानला जातो, म्हणून कोणीही त्यांची घरी किंवा मंदिरात प्रतिष्ठापना करून पूजा करू शकतो.
यासर्वांमुळेच शालिग्रामचे (Shaligrama) महत्त्व वाढले आहे. अयोध्येत श्रीरामांच्या मुर्तीसाठी आलेले हे शालिग्राम म्हणूनच रामभक्तांसाठी पूजनीय ठरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून यातील तज्ञ नेपाळमध्ये या शालिग्रामची पहाणी करत होते. ते सापडल्यावर नेपाळ सरकारनं अत्यंत मुल्यवान असलेल्या या शालिग्रामला राममंदिरासाठी मोफत भारत सरकारच्या ताब्यात दिले आहे. नेपाळहून आणलेल्या शालिग्राम दगडांची अयोध्येत पूजा करण्यात आली. 373 किलोमीटर आणि 7 दिवसांच्या प्रवासानंतर हे दोन विशाल शालिग्राम खडक अयोध्येत पोहोचले आहेत. 60 दशलक्ष वर्ष जुन्या शालिग्राम दगडापासून भगवान राम आणि सीतेची मूर्ती बनवली जाणार आहे. यासाठी 40 खडकांची पहाणी करण्यात आली. त्यातील तज्ञांच्या निरीक्षणानंतर राममंदिरी ट्रस्ट बरोबर पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये करार झाला. बुधवारी रात्री अयोध्येत पोहोचल्यावर या शिलाग्रामवर शरयू नदीच्या पुलावर पुष्पवृष्टी आणि ढोल वाजवून रथाचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शिला रथसोबत नेपाळमधील 100 जणांचे पथकही अयोध्येला पोहोचले आहे.
=========
हे देखील वाचा : भारतातील ‘या’ मंदिरात नामकरणासाठी मुलं नव्हे तर पाळीव कुत्र्यांना आणले जाते
=========
यासंदर्भात रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, ‘राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट भगवान श्रीरामाच्या मंदिरात कोणत्या पद्धतीने मूर्ती बनवायची आणि ही मूर्ती कोणत्या खडकांपासून बनवायची याचा विचार करत आहे. त्यासाठी देशभरातील मूर्तिकारांना बोलवून त्यांची मते जाणून घेतली आहेत. देवाच्या मूर्तीचे हावभाव काय असावेत, याचाही सखोल विचार केला जात आहे. ओडिशा आणि कर्नाटकातूनही खडक आणण्यात आले आहेत, मात्र त्यांच्या आगमनाची वेळ अद्याप ठरलेली नाही. सर्व खडक गोळा केल्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गर्भगृहातील मूर्ती कोणत्या दगडापासून बनवायची याचा निर्णय घेतला जाईल. सर्व खडकांची तपासणी केल्यानंतर त्यातील एका खडकाचा वापर श्रीरामाची मूर्ती बनवण्यासाठी केला जाणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तीही याच खडकांपासून बनवल्या जाणार आहेत. हे दगड 1000 वर्षे सुरक्षित राहणार आहेत. 1000 वर्षे प्रतिकूल वातावरणातही श्रीराम मंदिर सुरक्षित राहील, असा दावाही ट्रस्टने केला आहे. आता प्रभू रामच्या भक्तांना पुढच्या वर्षीच्या मकर संक्रांतीची प्रतीक्षा आहे. यादिवशी प्रभू रामचंद्र आणि माता सिता यांची मुर्ती आसनस्थ होणार आहे. या दिवसापासून लाखो भक्तांचा मेळा भरेल अशी अपेक्षा आहे.
सई बने