एपस्टाईन फाईल्सचा धमाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता याच एपस्टाईनमुळे ब्रिटनमधील स्टारमर सरकारही धोक्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्या विशेष चीफ ऑफ स्टाफचे आणि ब्रिटनच्या एका राजदूताचे नाव आणि एपस्टाईनसोबतची अश्लिल छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या ब्रिटनच्या राजकारणात भूकंप आल्यासारखी परिस्थिती आहे. विशेष चीफ ऑफ स्टाफने राजीनामा दिला असून लेबर पार्टीच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्वात स्टारमर यांनी राजीनामा द्यावा म्हणून दबाव वाढत असताना सत्ताधारी पक्षात पंतप्रधान पदासाठी नवीन नावाची चर्चाही सुरु झाली आहे. यामध्ये गृहसचिव शबाना महमूद यांचे नाव सर्वाधिक पसंतीस आहे. पाकिस्तानी वंशाच्या शबाना महमूद या ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या तर अनेक राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आधीच ब्रिटनमध्ये मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याची ओरड होत आहे. असे असतांना पाकिस्तानी वंशीय मुस्लिम महिला या ख्रिश्चन बहुसंख्य देशाची पंतप्रधान झाल्यास ब्रिटनची स्थलांतरितांसंबंधातील ध्येयधोरणे बदलण्याची शक्यता आहे. ( Shabana Mahmood )

कुख्यात अमेरिकन लैंगिक गुन्हेगारांच्या जेफ्री एपस्टाईन फाइल्सशी संबंधित नवीन खुलाशांनंतर, ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांचे चीफ ऑफ स्टाफ, मॉर्गन मॅकस्विनी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मॅकस्विनी यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान स्टारमर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. मॅकस्विनी आणि स्टारमर हे चांगले मित्र म्हणूनही परिचित आहेत. ब्रिटनमध्ये २००८ मध्ये आलेल्या बॅंकिंग संकटाबाबतही मॅकस्विनी आणि एपस्टाईन यांच्यात चर्चा झाल्याचे ईमेल जाहीर झाले असून त्यांची चौकशी सुरु आहे. मॅकस्विनी हे लेबर पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचेच नाव एपस्टाईनमध्ये आल्यावर पक्षातील अन्य सदस्यांचीही नावे एपस्टाईन फाईलमध्ये असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच या सर्वांची चौकशी होईपर्यंत स्टारमर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. दरम्यान या सगळ्यात स्टारमर यांच्या जागी ज्या नावाची पंतप्रधान म्हणून चर्चा चालू आहे, त्यामुळेही ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. सत्ताधारी लेबर पक्षात ज्या नावांची चर्चा सुरू आहे त्यात गृहसचिव शबाना महमूद यांच्या नावाचा समावेश आहे. जर शबाना पंतप्रधान पदावर पोहोचल्या तर त्या युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला मुस्लिम पंतप्रधान असतील.
शबाना महमूद व्यवसायाने वकील आहेत आणि पंतप्रधान स्टारमर यांच्या विश्वासू साथीदार म्हणून ओळखल्या जातात. शबाना या ४५ वर्षांच्या आहेत. प्रभावी वक्ता आणि पक्षाच्या उजव्या विचारसरणीच्या गटाशी संबंधित राजकारणी म्हणूनही त्या ओळखल्या जातात. शबाना यांचा जन्म १९८० मध्ये बर्मिंगहॅम येथे झाला आणि ती तिथेच त्यांचे बालपण त्यांच्या जुळ्या भावासोबत गेले. शबानाचे वडील पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर येथील आहेत. शबाना महमूद यांनी ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले असून २००२ मध्ये पदवी प्राप्त केली आहे. शबाना महमूद २०१० मध्ये पहिल्यांदा ब्रिटिश संसदेत निवडून आल्या. लेबर पक्षाच्या तिकिटावर खासदारकी जिंकणाऱ्या त्या काही मुस्लिम महिलांपैकी एक ठरल्या. २०२५ मध्ये लेबर सरकार स्थापन झाल्यानंतर, त्यांनी सीमा नियंत्रण, इमिग्रेशन धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित उच्च-प्रोफाइल बाबींसाठी जबाबदार खात्याचा कारभार सांभाळला आहे. त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी स्थलांतरावर कठोर भूमिका स्वीकारली असली तरी त्यांच्या अनेक योजनांबाबत लेबर पक्षातही मतभेद आहेत. ( Shabana Mahmood )
=======
हे देखील वाचा : Epstein Files: एपस्टाईन फाईलमध्ये चक्क करीनाचे नाव
=======
केअर स्टारमर यांनी राजीनामा दिल्यास शबाना यांना लेबर पक्षातील किमान ८१ लेबर खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. शबाना यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी आरोग्यमंत्री वेस्ट स्ट्रीटिंग आणि माजी उपपंतप्रधान अँजेला रेनर यांचीही नावं चर्चेत आहेत. मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम यांचे नावही चर्चेत असले तरी अँडी यांचा मार्ग कठीण मानला जातो कारण ते संसद सदस्य नाहीत. माजी कामगार नेते एड मिलिबँड हेही चर्चेत आहेत. मिलिबॅंड हे अनुभवी आहेत, परंतु त्यांनी अद्याप सर्वोच्च पदासाठी कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. पंतप्रधान स्टारमर यांनी या सर्व चर्चेदरम्यान आपण राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले असले तरी बहुतेक लेबर पार्टीचे खासदार त्यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. स्टारमर यांच्यामुळे लेबर पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याची त्यांची भावना आहे. ब्रिटनमध्ये लेबर पार्टी सत्तेत असून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांना ६५० पैकी ४०४ जागा आहेत. या सगळ्यात आता स्टारमर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास ब्रिटनच्या राजकारणातील सगळं चित्र बदलणार आहे. ( Shabana Mahmood )
सई बने
