जिओ स्टुडिओज आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) ह्यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘उनाड’ (Unnad) हा चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival), युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित या चित्रपटात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, “महत्त्वाच्या आणि संबंधित युवा वर्गात ‘उनाड’ ची निवड होणे ही चित्रपटासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही कोळी समाजातील सध्याच्या तरुणांचा वास्तववादी विचार करण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटात तीन तरुणांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या महोत्सवात ‘उनाड’ची निवड होणे ही आमच्या टीमच्या प्रवासाची पावती आहे. आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहात आहोत विशेषतः या महोत्सवाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची.”
====
हे देखील वाचा: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनी, अंकुश चौधरी झळकणार मुख्य भूमिकेत
====
‘उनाड’ ही महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या हर्णे येथील तीन तरुण मुलांची कथा आहे. शुभ्या, बंड्या आणि जमील हे तीन मित्र आहेत जे आपला वेळ गावात हुंदडण्यात घालवतात. त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नाही. स्थानिक त्यांना गावातील उनाड मुले समजत असल्याने, तिन्ही मुले अडचणीत येतात. त्यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची ही कहाणी आहे, जी त्यांना कायमची बदलते.

====
हे देखील वाचा: सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या गुण वर्णनाचे गीत प्रदर्शित
====
झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा महोत्सव आहे. हा एक अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम आहे, जो मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधींची ओळख करून देतो. मागील महोत्सवात सुमारे एक्याऐंशी हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अकरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवाला जगातील ५२ देशांतील ३१० चित्रपटांचा समावेश होता.