वयाच्या सतराव्या वर्षी तिला असाध्य रोगानं घेरलं. अनेक डॉक्टर झाले. पण फायदा झाला नाही. मग ती भारतात आली. योग आणि आयुर्वेदाची शक्ती तिला कळली. नियमीत योग केल्यानं तिनं आपल्या रोगावर मात केली. या योगाला मग तिनं आपलं अवघं आयुष्य वाहून घेतलं. भारतान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविलेली नौफ मरवाई (Nouf Marwai) ही सौदी अरेबियामधली पहिली योग शिक्षिका आहे. सौदीच्या प्रिन्स सलमान यांच्या सांगण्यावरून अरब देशांमध्ये योगाचा प्रसार करणारी नौफ मरवाई सध्या चर्चेचा विषय आहे. सौदी अरेबियाच्या क्रीडा मंत्रालयाने जेद्दाहमध्ये योग शिबिराचे आयोजन केले आहे. 30 डिसेंबरपर्यंत चालणा-या या योग शिबिरात 11 अरब देश सहभागी होत आहेत. या शिबिराची सर्व जबाबदारी नौफ मरवाईवर आहे. अरब देशात योगाचा प्रचार करणा-या नौफचा जीवन प्रवास प्रेरणादाई आहे.
योगाची ताकद कोरोना काळामध्ये जगानं जाणली आहे. आता तर अरब राष्ट्रांमध्येही योगाबाबत जागरुकता वाढत आहे. सौदी अरेबियामध्येही योगाचे महत्त्व वाढत आहे. केवळ सौदी अरेबियातच नव्हे तर अरब देशांमध्येही योगाचा प्रसार झपाट्यानं आहे. यामागे नौफ मरवाई (Nouf Marwai) यांचे नाव प्रामुख्यानं घेण्यात येते. सौदी अरेबियातील पहिल्या महिला योग शिक्षिका म्हणून नौफ मरवाई यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. त्यांना अरब जगतात योगाचे महत्त्व पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सौदीचे राजकुमार सलमान यांनी योगाच्या प्रचारासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे सौदी अरेबिया आता अरब देशांमध्येही योगाचा प्रचार करत आहे. यासाठी सौदी अरेबियाने नौफ मरवाई (Nouf Marwai) यांच्याकडे योग प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे. सौदी अरेबियातील नौफ मरवाई यांना भारतातील मानाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नौफ यांचा योगाच्या जवळ जाण्याचा प्रवासही जाणण्यासारखा आहे. नौफ यांची जन्मापासूनच प्रतिकारशक्ती कमी होती. त्यांना ल्युपस हा संधिवातासारखा रोग होता. यावर उपचार करणाऱ्यां डॉक्टरांनी हात वर केले. वयाच्या सतराव्या वर्षी या रोगानं त्रस्त झालेल्या नौफ (Nouf Marwai) भारतात उपचारासाठी आल्या. योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी या आजारावर विजय मिळवला. त्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. पूर्णपणे बरी झाल्यानंतर नौफ यांनी सौदी अरेबियात योगाचे वर्ग सुरू केले. योगाच्या शिक्षिका म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. सद्यस्थितीत सौदीमध्ये 60 टक्के तरुणवर्ग योगाकडे आकर्षित झाला आहे. तसेच सूर्यनमस्काराचे महत्त्वही त्यांनी जाणले आहे.
सौदी अरेबियामध्ये यागोबाबत असणारी ही जागरुकता बघता सौदी अरेबियाच्या क्रीडा मंत्रालयाने जेद्दाहमध्ये योग शिबिराचे आयोजन केले आहे. 30 डिसेंबरपर्यंत होणा-या या शिबिरात ‘अरब युथ एम्पॉवरमेंट प्रोग्राम’ या बॅनरखाली योग कार्यशाळा होत आहेत. ज्यामध्ये 11 अरब देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या अरब देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती, ओमान, येमेन, पॅलेस्टाईन, इजिप्त, लिबिया, अलेग्रिया, मोरोक्को, ट्युनिशिया आणि मॉरिटानिया यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मानवी जीवनात योगाचे महत्त्व, अरब देशांमधील क्रीडा, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या विकासाला चालना देणे आणि अरब युवा शिष्टमंडळांना या क्षेत्रांमध्ये जागरूक करणे हा आहे.
========
हे देखील वाचा : सौंदर्य-आलिशान लाइफस्टाइल असूनही ‘या’ कारणांमुळे ट्रोल होतात हे स्टार किड्स
========
सौदी अरेबियातील रहिवासी असलेल्या नौफ मरवाई या सौदी अरेबिया योग समितीच्या अध्यक्ष देखील आहेत. योगाबाबत त्या भरभरून बोलतात, आजच्या जीवनात, जागतिक आव्हानांमध्ये योगाची गरज आहे, योग आणि जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि नैराश्याशी लढा देण्यासाठी समाजात योगाभ्यासाचे फायदे समजून घेण्यासाठी, आम्ही योग आणि जीवनाचा दर्जा आणि नैराश्याबद्दलच्या वैज्ञानिक अभ्यासातून निष्कर्षांचा समावेश केला आहे. प्रत्येकानं जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी योगाला आपल्या आयुष्यात स्थान द्यावे असे आवाहनही नौफ करीत आहेत.
सौदी अरेबियामध्ये योग समितीची , मे 2021 मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून राज्यात आरोग्य आणि कल्याणासाठी योगास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले गेले. या महिन्याच्या सुरुवातीला जेद्दाह येथे पहिला सौदी योग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजीने देखील या कार्यक्रमात भाग घेतला. यात योगामध्ये पारंगत असलेल्या 112 हून अधिक नोंदणीकृत डॉक्टरांनी सहभाग घेतला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे योग कार्यक्रमातील 95 लोकांपैकी बहुतांश मुली होत्या. यासोबतच जेद्दाह येथे योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते, जी अरब जगतातील पहिली चॅम्पियनशिप ठरली.
सई बने