सौदी अरेबिया म्हटलं की समोर वाळवंटी भाग येतो. सौदी अरेबियामध्ये बहुतांशी महिने हे उष्णच असतात. सौदीतही थंडीचा मौसम असतो, पण अगदी कडाक्याची थंडी मात्र या भागात पडत नाही. असे असतांना याच सौदीमध्ये बर्फाचे वादळ झाले तर आणि असे वादळ होऊन येथील सर्व वाळवंटावर बर्फाची चादर पसरली गेली तर ही जर तरची बातमीच खरी झाली आहे. वाळवंटी भाग असलेल्या सौदीमध्ये चक्क जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. असा बर्फ सौदीमध्ये पहिल्यांदाच पडल्याचे येथील जेष्ठ नागरिक सांगत आहेत. गेल्या काही वर्षापासून सौदीमधील वातावरणात प्रचंड बदल होत आहेत. येथील वाळवंटात आता पाण्याचे तलाव तयार झाले आहेत. या तलावांच्या काठावर हिरवीगार झाडेही दिसू लागली आहेत. हा सौदीमधील बदल होतो नो होतो तोच या भागात जोरदार झालेल्या बर्फवृष्टीनं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सौदीच्या काही भागात तर जोरदार पाऊसही झाला. (Saudi Arabia)
यामुळे पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण झाली. सौदीसारख्या देशात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प आहे. असे असतांना आता पाऊस आणि बर्फ या भागात पडू लागल्यानं हवामान तज्ञांपुढेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. जगभरातील अनेक हवामान अभ्यासक सौदीमध्ये अचानक बदलत असलेल्या या हवामानाच्या अभ्यासासाठी दाखल झाले आहेत. सौदी अरेबियाच्या अल-जौफच्या वाळवंटातील काही भागात जोरदार पाऊस पडला. हा पाऊस पडल्यानंतर या भागात मोठी तारांबळ उडाली. मात्र त्यानंतर थोड्याच वेळात जोरदार बर्फवृष्टी होऊ लागली. हा बर्फ एवढा पडला की या भागात बर्फाची पांढरी चादरच तयार झाली. गारांच्या रुपात पडलेल्या या बर्फामुळे या अल-जौफ वाळवंटाचे तापमानच बदलून गेले. बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी या भागात पडली. जिथे वा-याची एक थंड झुळूक येत नाही, अशा भागात कडाक्याची थंडी पडल्यानं या भागातील नागरिकांची मात्र धावपळ उडाली. या भागात रहाणा-या नागरिकांच्या सांगण्यानुसार या भागात कधीही फार पाऊस पडत नाही. मात्र आता येथे चक्क जोरदार पाऊस आणि गारा पडल्यामुळे हे मोठे आक्रीत असल्याचे रहिवाश्यांचे सांगणे आहे. (International News)
येथील वृद्धांनीही आपल्या आयुष्यात कधीही गारा पाहिल्या नसल्याचे सांगितले. त्यामुळेच या हवामान बदलाचे आणि थंडीचे स्वागत होत असले तरी स्थानिकांमध्ये मात्र मोठा संभ्रम वाढला आहे. मुसळधार पाऊस आणि मोठ्या गारपिटीमुळे अल-जौफ परिसरातील काही भागात पूरही आला. सौदीच्या उत्तरेकडील सीमेवरील रियाध आणि मक्काच्या काही भागातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अल-जौफच्या पर्वतीय भागात बर्फवृष्टी एवढी झाली की, दूरुनही बर्फामुळे पांढरे झालेले हे पर्वत दिसत होते. या बर्फाचा फोटो काढण्यासाठी आणि बर्फाला हात लावण्यासाठी मग या भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली. या बर्फवृष्टीचे फोटो सोशल मिडियावर शेअर होऊ लागल्यानं या भागात बर्फ बघायला येणा-या नागरिकांच्या संख्येत इतकी वाढ झाली की सुरक्षा रक्षक ठेवावे लागले. अल-जौफच्या पर्वतीय भागात एवढा पाऊस आणि गारा पडल्या की त्यामुळे तेथे धबधबे तयार झाले. (Saudi Arabia)
======
हे देखील वाचा : सूरमयी शाम आणि शेतक-याचा लढा !
====
हे दृष्य या भागात दुर्मिळ समजले जाते. त्याचे फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी होत होती. हवामान खात्यान यापुढेही अल-जौफच्या काही भागात अशाच स्वरुपाचा पाऊस आणि गारा पडण्याचा इशारा दिला आहे. असे असले तरी स्थानिकांनी या बदलत्या हवामानाचा अभ्यास व्हावा अशी मागणी केली आहे. या पावसानं या सर्वच भागातील तापमानही घसरले आहे. शिवाय दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे. जोरदार पावसानं येथील घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या भागात मुख्यतः मातीची घरे आहेत. ही मातीची घरे या जोरदार पावसानं जमिनदोस्त झाली आहेत. आता यापुढेही अशीच वादळे येणार असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अरबी समुद्रापासून ओमानपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे ही असामान्य गारपीट झाल्याचे येथील राष्ट्रीय हवामान केंद्राने सांगितले आहे. या सौदीतील बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सरकारनं जगभरातील मान्यवर हवामान तज्ञांना आपल्या देशात आमंत्रित केले आहे. (International News)
सई बने