पाकिस्तानहून आलेल्या या कलाकाराने बॉलिवूडला वेड लावलं होत! आजही त्यांच्या गाण्यावर भली-भली लोक ठेका धरतात
प्रत्येकालाच बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेची भुरळ पडत असते. काहींनी या बॉलिवूडमध्ये आपलं करियर केले असते, तर कित्येकांना बॉलिवूडच्या या चंदेरी दुनियेत करियर करायचे असते.
मात्र आपल्या अंगात असणाऱ्या कलेमुळेच या बॉलिवूडमध्ये आपले स्थान कायम करता येत, हे अनेकांच्या लक्षात आले असेल. आज आपण अशाच एका कालाकाराविषयी बोलणार आहोत की ज्यांनी आपल्या करियरची सुरुवात वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षांपासून केली होती.
महत्वाचे म्हणजे ही कलाकारा चक्क पाकिस्तानची असूनही, तिने बॉलिवूडला आणि भारतीयांना आपल्या कलेच्या जोरावर ताल धरायला लावले होते. ती कधीही पडद्यासमोर आली नव्हती पण तरीही ती सर्वांना परिचित होती.
ही कलाकार म्हणजे तेजाब चित्रपटातील एक दो तीन गाण्यावर सर्वांना नाचायला लावणारी, कोरिओग्राफर सरोज खान! आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त हा खास लेख. चला तर मग जाणून घेऊयात सरोज खान यांचा बॉलिवूड मधील जीवन प्रवास
सरोज खान (Saroj Khan) यांचा जन्म पाकिस्तान मध्ये दि. २२ नोव्हेंबर १९४८ ला झाला होता. पण फाळणीनंतर त्यांचे संपूर्ण कुटूंब भारतात आले होते. त्यांचे पूर्ण नाव निर्मला किशनचंद्र संधू सिंह नागपाल असे होते.
सरोज खान यांची घरची परिस्थिती हालाकीची होती. त्यामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षांपासून काम करायला सुरुवात केली होती. तर त्यांचे वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी डान्स मास्टर सोहनलाल यांच्याशी लग्न लावून देण्यात आले होते.
पण डान्स मास्टर सोहनलाल यांचे हे दुसरे लग्न होते. त्यामुळे सरोज खान यांना लग्नानंतर मोठा धक्का बसला होता. कारण सोहनलाल यांच्या पहील्या लग्नाबद्दल सरोज खान यांना काहीही माहीती नव्हती.
पुढे सरोज खान यांना एक मुलगा झाला. त्याला राजू असे नाव देण्यात आले. पण त्यावेळी सोहनलालने या मुलाला स्वीकारले नाही. त्यामुळे त्यांनी या मुलाला स्वतःचे नाव देण्यास नकार दिला. पुढे या कारणाने सरोज खान आणि सोहनलाल दोघेही वेगळे झाले. आणि नंतर मग सरोज खानने सरदार रोशनसोबत लग्न केले.
त्यांनी आपल्या करियरची सुरुवात ‘नजराना’ या चित्रपटातील अभिनयाने केली होती. यानंतर त्यांनी ‘आहोश’, ‘कितना बदल गया इंसान’ आणि ‘हावडा ब्रिज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये बॅक डान्सर म्हणून काम केले.
पुढे ‘दिल ही तो है’ या चित्रपटात त्यांनी सर्वात पाहिल्यांदा नृत्य दिग्दर्शन केले. यानंतर त्यांनी ‘गीता मेरा नाम’, ‘दोस्त’, ‘मौसम’, ‘प्रेम योगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘हिरो’ या चित्रपटापासूनच.
त्या ‘हिरो’ हा चित्रपटासोबतच सुपरहिट बनल्या. या चित्रपटापासून त्यांनी मागे वळून न पाहता आयुष्यात तब्बल २००० पेक्षा अधिक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले.
सरोज खान यांनी साधना, वैजैंतीमाला, हेलन, शर्मिला, माला सिन्हा, रेखा यांच्यपासून थेट माधूरी, श्रीदेवी, एश्वर्या राय, जुही चावला, एवढेच नाहीतर त्यांनी सनी लिओनीला देखील डान्स शिकवला. त्यांच्या चित्रपटात कोरिओग्राफी देखील केली.
त्यांचे एक वैशिष्ट्य होत. ते वैशिष्ट्य म्हणजे त्या काळासोबत बदलत होत्या. लोकांना काय आवडत हे त्यांना चांगलं समजत होत. त्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये भरघोस यश मिळाले होते.
‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्यासाठी त्यांना पहील्यांदा फिल्मफेअर आवॉर्ड मिळाला होता. तर पुढे ‘देवदास’ या चित्रपटातील त्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
पण त्या इथेच थांबल्या नाहीत, पुढे त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ८ फिल्मफेअर आवॉर्ड मिळाले होते.
अशा या बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली वेगळीच छाप उमटवणाऱ्या सरोज खान यांचा दि. ३ जुलै २०२० रोजी मृत्यू झाला.
आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त टीम क-फॅक्टस तर्फे विनम्र अभिवादन…!
– निवास उद्धव गायकवाड