Home » सरगमनं जिंकला मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा पुरस्कार…

सरगमनं जिंकला मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा पुरस्कार…

by Team Gajawaja
0 comment
Sargam Kaushal
Share

काश्मिर गर्ल, सरगम कौशलनं भारताला एक अनोखा ताज मिळवून दिला आहे.  तब्बल 21 वर्षानंतर सरगमनं (Sargam Kaushal) आपल्या सौंदर्याच्या आणि बुद्धीच्या जोरावर मिसेस वर्ल्डच्या मुकुटावर आपले नाव कोरलं आहे.  या काश्मिरच्या सुंदरीनं तब्बल 63 देशांच्या सुंदरींना हरवून देशाला हे उज्ज्वल यश दिले आहे.  अमेरिकेच्या लास वेगास येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेत गुलाबी गाऊन घातलेली सरगम अतिशय सुंदर दिसत होती.  तिच्या या काश्मिरी सौदर्यानं जागतिक स्पर्धेत यश संपादन केले.  

भारताकडे 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्डचा मुकुट आला आहे.  या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील सौदर्यवतींनी भाग घेतला होता.  त्यांच्यावर सरगम कौशलनं बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेल्या सरगम ​​या व्यवसायाने शिक्षिका आहेत.  सरगम यांनी 2018 मध्ये नौदलाच्या अधिका-याबरोबर लग्न केले आहे.  उच्च विद्या विभुषीत असलेली सरगम (Sargam Kaushal) यांना या विजयानंतरही आपल्या यशाबद्दल विश्वास बसत नाही.  या जागतिक स्पर्धैत विजयी झाल्यावर सरगमने आपल्या यशाचे श्रेय तिचे वडील आणि पती यांना दिले आहे.  मिसेस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर सरगमच्या यशाची बातमी शेअर करण्यात आली आहे.  सोबत सरगमनं आपला अत्यंत भावूक झालेला फोटो आणि माझं माझ्या देशावर प्रेम आहे, असं वाक्य शेअर केलं आहे.  यासोबत मुकुटाच्या क्षणाची एक झलक शेअर करताना सरगमनं, अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे.  मिसेस सौदर्यवतीचा मुकुट 21 वर्षांनंतर परत आपल्या देशात आला आहे असा मेसेजही दिला आहे.  

सरगमपूर्वी (Sargam Kaushal) 2001 मध्ये डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी हा किताब जिंकला होता.   आता या पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अदिती गोवित्रीकर सह अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन आदी उपस्थित होते.  32 वर्षीय सरगमने हे यश कसे संपादीत केले हे नक्की जाणण्यासारखे आहे.  सरगम कौशल ही जम्मू काश्मिरची आहे, आणि तिचं जम्मू काश्मिरवर प्रचंड प्रेम आहे.  शिक्षिका असलेली सरमग काश्मिरी हस्तकलेची कायम प्रशंसक राहिली आहे.  एवढंच काय सरगमनं मिसेस वर्ल्ड 2022 च्या कार्यक्रमात काश्मिरी महिलांनी बनवलेला खास पोशाख परिधान केला होता.  या स्पर्धेची सुरुवात सरगमनं 15 जून 2022 रोजी मिळवलेल्या यशानंतर झाली होती.  या दिवशी सरगमनं मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर सरगमनं (Sargam Kaushal) मेहनत घेतली.  खास डायट आणि व्यायामावर लक्ष दिले.  त्याचाच परिणाम म्हणजे हे यश असल्याचे सरगम सांगते.  

========

हे देखील वाचा : फुटबॉलचा जादूगार- लियोनेल मेस्सी

=======

सरगम ​​कौशलने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  त्यानंतर सरगमने विशाखापट्टणममध्ये शिक्षिका म्हणूनही काम केले. सरगमने 2018 मध्ये नौदल अधिकारी आदित्य मनोहर शर्मा यांच्याबरोबर लग्न केले.  पती आदित्य मनोहर यांच्या पाठिंब्यानेच सरगम मॉडेलिंगकडे वळली आणि या पेशात रमली.  त्याचाच पुढचा भाग म्हणून तिनं सौदर्यस्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.  लग्नानंतरही सरगम ​​कौशल मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय राहिली. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. सरगम कौशलच्या (Sargam Kaushal) सासरच्या मंडळींनीही सरगमला प्रोत्साहन दिले आणि तिच्या निर्णयाचा आदर केला.  आता मिसेस वर्ल्ड झाल्यावर सरगमचा हा निर्णय किती योग्य होता याची कल्पना येते.  स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी, सरगमनं भावना राव यांनी डिझाइन केलेला गुलाबी स्लिट गाऊन परिधान केला होता.  याशिवाय हिरे जडलेले मोठे कानातले परिधान  केले होते.  या लूकसाठी सरगमला मॉडेल अॅलेसिया राऊत यांनी मार्गदर्शन केले होते.

21 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब आदिती गोवित्रीकर यांनी जिंकला.  हा ताज जिंकणारी अदिती पहिली भारतीय महिला ठरली.  त्यानंतर अदितीनं अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि चांगलं यश मिळावलं.  आदितीने भेजा फ्राय, दे दना दान, स्माईल प्लीज सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.  मिसेस वर्ल्डची सुरुवात 1984 पासून सुरु झाली आहे.  विवाहित महिलांसाठी असलेली ही स्पर्धा सुरुवातीपासून चर्चेत राहिली. या स्पर्धेचे नाव मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड असे होते. 1988 मध्ये या स्पर्धेला मिसेस वर्ल्ड असे नाव देण्यात आले. आता या विजयानंतर सरगम पुढे काय करणार याची उत्सुकता आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.