उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील जागेश्वर धाम या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. 2500 वर्षे जुनी असलेल्या या मंदिरामध्ये भगवान शंकराचे स्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान शंकराचे भक्त आहेत. त्यांनी पूजा केलेले हे भोलेबाबांचे स्थान नेमके कसे आहे, याची उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. जागेश्वर धाम येथूनच भगवान शिवाच्या लिंगस्वरूपाची पूजा सुरू झाली. जागेश्वर धाम मंदिर हे भारतातील ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. याशिवाय याच जागेश्वर धाम मध्ये प्रत्य़क्ष महादेव आणि सप्तऋषींनी तपश्चर्या केली आहे. शिवलिंगाची पूजा करण्याची परंपरा सुरू ज्या स्थानापासून सुरु झाली त्या जोगेश्वर धाम परिसराचा आता मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच संदर्भात माहिती दिली. (Dham)
उत्तराखंडचा उल्लेख देवभूमी असा केला जातो. त्याच उत्तराखंडामधील अल्मोडा येथील प्रसिद्ध जागेश्वर धाम मंदिरे ही भगवान शिवाचे आदी स्थान म्हणून प्रसिद्ध आहेत. जागेश्वर धाम मंदिरांचा हा मोठा समुहच आहे. या मंदिरांना ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. सुमारे 2500 वर्षांचा पौराणिक वारसा या जागेश्वर धामला आहे. शिवपुराण, लिंग पुराण, स्कंद पुराणामधील कथांमध्ये देखील मंदिराचा उल्लेख आहे. 2500 वर्षापूर्वी उभारलेल्या या मंदिरांचे वास्तुशास्त्र आजही भक्तांना आश्चर्यचकीत करीत आहे. हजारो वर्षापासून भक्कमपणे उभ्या असलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी फक्त दगडाचा वापर करण्यात आला आहे. दगडामध्ये खाचे तयार करुन मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे वास्तुशास्त्र आणि त्यातील कलाकुसर आजच्या प्रगत युगातही अशक्य वाटेल अशीच आहे. जागेश्वर धाम, मंदिरामध्ये शिलालेख, कोरीव काम आणि शिल्प यांचा खजिना आहे. जातगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या मंदिरात स्थापत्य आणि इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक पुराणवास्तु शास्त्रज्ञ या मंदिराचा अभ्यास करण्यासाठीही मंदिर परिसरात जातात. (Dham)
जागेश्वर धाम (Dham) मंदिराबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. मान्यतेनुसार भगवान शिव आणि सप्तऋषींनी येथे तपश्चर्या केली होती. त्यानंतर या स्थानापासून शिवलिंगाची पूजा करण्यात येऊ लागली. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, याची रचना हुबेहूब केदारनाथ मंदिरासारखी आहे. या मंदिराच्या आतही अशी जवळपास 250 छोटी मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरांना जागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते. जागेश्वर धाममध्ये प्रामुख्याने शिव, विष्णू, शक्ती आणि सूर्य देवांची पूजा केली जाते. या जागेश्वर धाममध्ये दांडेश्वर मंदिर, चंडी माता मंदिर, जागेश्वर मंदिर, कुबेर मंदिर, मृत्युंजय मंदिर, नंदा देवी मंदिर, नवग्रह मंदिर, सूर्य मंदिर, भैरव देव मंदिर आहे. सुमारे 6200 फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममधील सर्वच छोटी मोठी मंदिरे दगडाची आहेत. येथील 250 मंदिरांपैकी 224 लहान-मोठी मंदिरे एकाच ठिकाणी आहेत.
या सर्व मंदिरांची उभारणी कोणी आणि का केली हा प्रश्न भक्तांना पडतो. या मंदिरांची उभारणी कोणी केली याची माहिती या मंदिराचे पुजारी देतात. उत्तर भारतातील गुप्त साम्राज्याच्या काळात हिमालयाच्या पर्वतरांगांच्या कुमाऊं प्रदेशात कात्युरी राजे होते. जागेश्वर मंदिरेही याच राजांच्या काळात बांधली गेली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार या मंदिरांच्या बांधकामाचा कालावधी तीन कालखंडात विभागला गेला आहे. कात्युरी काळ, उत्तर कात्युरी काळ आणि चंद्राचा काळ. या तीनही कालकंखाचा प्रभाव मंदिराच्या स्थापत्यशास्त्रावर आहे. कुमाऊँच्या राजांनी जागेश्वर धामसह संपूर्ण अल्मोडा जिल्ह्यात चारशेहून अधिक मंदिरे बांधली आहेत. या 400 पैकी 250 मंदिरे जागेश्वरमध्येच आहेत. या मंदिरांच्या उभारणीत लाकडाचाही वापर नाही. फक्त दगडाचाच वापर असलेली ही मंदिरे जगभरातील शिवभक्तांसाठी वंदनीय आहेत. या प्रत्येक मंदिराच्या दरवाजाच्या चौकटी देवी-देवतांच्या मूर्तींनी सजवलेल्या आहेत. जागेश्वर धामचा उल्लेख पुराणात हटकेश्वर आणि पत्ती पारुणा या नावांनीही करण्यात आला आहे. (Dham)
============
हे देखील वाचा : नवसपूर्तीसाठी ‘या’ देवीला अर्पण करतात घोडे…
===========
जागेश्वर धाम येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. पण वर्षभरही या मंदिरात भाविक मोठ्या संख्येनं जातात. या मंदिराच्या आसपास भाविकांच्या रहाण्याची सोय आहे. मात्र या भागाचा विकास आता नव्यानं होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन याच नव्या विकास योजनांची माहिती दिली आहे.
सई बने