अखेर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक महत्त्वाची घडामोड समोर आली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी , त्यांची कोणतीही पाठराखण केली जाऊ नये यासाठी अक्ख्या मस्साजोग गावाने अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही घडामोड समोर आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड याच्याभोवतीचा फासही अजूनच आवळला जाणार आहे. या सगळ्यामागचं कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे, ज्यामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं आहे ? इथून पुढे या प्रकरणाची दिशा काय असू शकते ? संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना खरंच न्याय मिळू शकतो का? जाणून घेऊ.
तर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तपास करून केजच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण 1400 पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र केजच्या न्यायालयात दाखल केलं आहे. या आरोपपत्रात तीन गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हत्या, खंडणी आणि अॅट्रॉसिटी अशा तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित उल्लेख यात केला गेला आहे. थोडक्यात देशमुख यांचा खून हा खंडणीतूनच झाला असल्याचं या आरोपपत्रात म्हणण्यात आलंय आणि हाच आरोप वाल्मिक कराडवर सुरवातीपासूनच केला जात होता.(Political News)
हे संपूर्ण आरोप पत्र दाखल करण्यात पाच गोपनीय साक्षीदारांची मदत झाल्याचं कळतंय. कारण न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार या प्रकरणात एकूण पाच गोपनीय साक्षीदार आहेत. याच साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या मदतीने वाल्मिक कराड याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपपत्रात पूर्ण घटनाक्रमही पोलिसांनी उघडला आहे. त्यानुसार सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची भेट झाली होती. या भेटीवेळी पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. याच भेटीत विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा आदेश सांगितला होता. साक्षीदारानुसार संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असं फर्मानच वाल्मिक कराडने काढलं होतं. थोडक्यात संतोष देशमुख याच्या हत्येची सुपारी वाल्मिक कराडनेच दिली होती असं आरोपपत्रात आता स्पष्ट झालं आहे. (Santosh Deshmukh)
संतोष देशमुखांची अशी हत्या करण्यास वाल्मिक कराडने का सांगितलं ? यांचं कारणंही समोर आलं आहे, आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असे या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. या खंडणी मागण्याचा संतोष देशमुख यांनी विरोध केला होता त्यामुळेच मग त्यांचा काटा वाल्मिक कराड आणि टोळीने केला. हा संपूर्ण तपास सीआयडी ने केला आहे. ज्यामध्ये सीआयडीच्या हातात महत्त्वाचा व्हिडीओ सापडला आहे. ज्यामध्ये आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना एक व्हिडीओ कॉल चालू होता. (Marathi News)
या व्हिडीओ कॉलची क्लिप आरोपी जयराम चाटे याने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला होता. हाच डिजिटल पुरावा सीआयडीने महत्त्वाचा मानला आहे. याच डिजिटल पुराव्याची मदत घेऊन संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी होती, हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवर मोक्क्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामुळे वाल्मिक कराड आणि कंपनीचा पाय अजूनच खोलात गेला आहे. या आरोपत्रातील आरोपींच्या क्रमांकांची चर्चाही होत आहे. कारण प्रत्येक आरोपीला आरोपी क्रमांक देण्यात आला आहे.
महत्वाचं म्हणजे या प्रकरणात वाल्मिक कराड याचा आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. एका प्रकारे तोच या हत्येत मास्टरमाईंड असल्याचे आरोपत्रात म्हणण्यात आलं आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. त्यानंतर सुदर्शन घुले हा तीन नंबर, प्रतीक घुले हा चार नंबर ,सुधीर सांगळे हा पाच नंबर, महेश केदार हा सहा नंबर, जयराम चाटे हा सात नंबर असा आरोपींचा क्रमांक आहे. महत्वाचं म्हणजे फरार कृष्णा आंधळे याला आठ नंबरचा आरोपी करण्यात आलं आहे. (Santosh Deshmukh)
आता या फरार कृष्णा आंधळेला अटक करण हे पोलिसांपुढील मोठं आव्हान असणार आहे. कारण आता मस्साजोगचे गावकरी, आमदार सुरेश धस यांनी त्यांचा मोर्चा आता कृष्णा आंधळेकडेही वळवला आहे. कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले आहेत. त्याच्या घरी गरीबी आहे. पत्र्याचं घर आहे. त्याला फारसं काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्कविना राहतो असा त्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वैगरे अशा ठिकाणी गेला आहे का? याचा तपास सुरु आहे. ५० दिवस झाले आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे. अशी माहिती सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
==============
हे देखील वाचा : Marathi Kannada Matter : कन्नड-मराठी हा वाद पुन्हा पुन्हा का उफाळतो ?
==============
या प्रकरणाची अजून एक महत्वाची उपडेट म्हणेजच नुकतीच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या सात मागण्यांपैकी उज्जवल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे उज्जवल निकम यांच्या नियुक्तीच, हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे. उज्ज्वल निकम यांनी १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे आणि पाथर्डी अत्याचारासारखे खटले यशस्वीरित्या लढवले आहेत. त्यामुळे या ही प्रकरणात त्यांचा फायदा होईल असा गावकऱ्यांचा कयास आहे. महत्वाचं म्हणजे त्यानंतर हे अन्नत्याग आंदोलनहि स्थगित करण्यात आलं होतं.
थोडक्यात राजकीय हस्तक्षेपात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळणार का ? अशा चर्चा असतानाच केस ही अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. महत्वाचं म्हणजे यामुळे वाल्मिक कराडला राइट हॅन्ड म्हणून वापरणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढील अडचणीही वाढणार आहे. पण यात संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची शक्यता अजूनच वाढली आहे एवढं नक्की.