Home » संजय मोनेंची अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ केलेली पोस्ट व्हायरल

संजय मोनेंची अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ केलेली पोस्ट व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sanjay Mone
Share

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. लवकरच विधानपरिषदेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये संपन्न होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आणि नेते मंडळींनी कंबर खोचली आहे. विविध पक्षांच्या सभा, प्रचार सतत कानावर पडत आहे. या निवडणुकीमध्ये अनेक प्रतिष्ठित नेत्याचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची समजली जात आहे.

विधानपरिषद निवडणूक २०२४ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मुंबईच्या दादर माहीम भागातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे यांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे. सामान्य लोकांच्या पाठिंब्यासोबतच अमित यांना मराठी कलाकारांकडून देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे. अमित ठाकरे यांच्या समर्थनात नुकतीच अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

संजय मोने हे देखील दादर माहीम याच परिसरात राहत आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांना पाठिंबा देताना त्यांनी अमित यांना मत का द्यावी याचे १० मुद्दे त्यांच्या पोस्टमधून मांडले आहेत. सोबतच एक मुद्दा अमित यांना मत का देऊ नये याचा देखील समोर ठेवला आहे. सोबतच संजय यांनी त्यांच्या पोस्टमधून कलाकरांना एक सल्ला देखील दिला आहे. संजय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले,

““माझी सर्व कलाकारांना विनंती आहे,
तुमचे विचार समाज ऐकतो, तुमची वाह वाह करतो. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही म्हणाल ते सगळे लोक ऐकतील. आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो. तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा; तुम्ही फक्त काही क्षणांचं, त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता. कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते.

तेव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करून आपण परिस्थिती बदलू शकतो या भ्रमात राहू नका. आपला आत्मसन्मान विकू नका. कारण- निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला कोणीही हिंग लावून विचारणार नाही. (हिंग लावून विचारणं ही एक म्हण झाली. प्रत्यक्षात हिंग महाग असतो) तेेव्हा या वेळी पक्ष नाही, तर व्यक्तीला मतदान करा.

आता माझ्या माहीम मतदारसंघाबद्दल.इथे बरेच उमेदवार आहेत. त्यातले बरेच जण विविध पक्षांची सफर करून आले आहेत. त्यांना स्वतःला तरी त्यांचा मूळ पक्ष आठवत असेल का?निशाणी म्हणजे पक्ष नाही.
माझ्या मतदारसंघात श्री. अमित ठाकरे उमेदवार आहेत. त्यांना मत का द्यायचं? याची कारणं मला सांगावीशी वाटतात.

१) ते आधीपासून त्याच पक्षाशी निगडित आहेत.
२) त्यांचा या मतदारसंघाशी जन्मापासून संबंध आहे.
३) ते तरुण आहेत. त्यामुळे नव्या पिढीचे जे काही प्रश्न किंवा ज्या काही समस्या आहेत, त्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.
४) निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेव्हा समोर आलेला प्रश्न मराठी, हिंदी (ही लादली गेलेली भाषा आहे) किंवा इंग्रजी (ही आल्या तथाकथित मराठी समाजाने लादून घेतलेली भाषा आहे)या तीनही भाषांत आला, तर त्याचा निदान अर्थ समजण्याइतकी त्यांची कुवत आहे.
५) त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे (मा. श्री. स्वरराज ठाकरे) त्यांना पूर्णपणे अवगत आहेत
६) आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहण्याआधी कुठेही त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेत भीती वा धाकदपटशा, अशी भावना नाही.
७) वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही.
८) एक कलाकार म्हणून मला सांगावेसे वाटते की, त्यांच्या पक्षाने कायम मला मानाचीच वागणूक दिली आहे.
९) त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न ते त्यांच्या पक्षाच्या मदतीने सोडवत आले आहेत.
१०) शिवाजी पार्कला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल, तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती, जिथे या वर्षी काही हजार तरुण-तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते. आणि लोक पार ११-१२ वाजेपर्यंत निर्धास्तपणे वावरत होते.
आता श्री. अमित ठाकरे यांना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करून मुद्दा सुचेना; पण तरीही शोधला-
१) श्री. अमित ठाकरे अनुभवी नाहीत; पण ‘तो’ आपणच त्यांना निवडून दिलं, तर सहज मिळू शकेल.”

संजय मोने यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या असून, सर्वच नेटकऱ्यांनी संजय यांना पाठिंबा देत ‘आता एकदा मनसे ला संधी द्यायला हरकत नाही’ असे म्हटले आहे. सोबतच अनेकांनी संजय यांचे सर्वच मुद्दे अगदी मान्य असल्याचे देखील लिहिले आहे. दरम्यान संजय यांची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत असून, त्यावर आता अजून कोण काय काय लिहिले आणि बोलते हे पाहावे लागेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.