Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात काही ना काही नवे खुलासे होत असल्याचे समोर येते. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान याचा जबाब नोंदवला आहे. या घटनेनंतर लॉरेंन्स बिश्नोईला साबरमती तुरुंगातून ताब्यात घेण्याची तयारी केली जात आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून कागदोपत्री कामकाज पूर्ण केले जात आहे. गोळीबारानंतर गुन्हे शाखेचे पथक सलमानचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या घरी आले होते. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरीच होता. या प्रकरणाला जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे.
4 जूनला दुपारी 12 वाजता गुन्हे शाखेचे चार अधिकारी सलमान खानचा जबाब नोंदवण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सलमानचा जबाब नोंदवण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागला. याशिवाय अरबाज खानचा जबाब नोंदवण्यासाठी दोन तास लागले. संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी गुन्हे शाखेचे पथक सलमानच्या घरातून 9 पानी जबाब घेऊन बाहेर पडले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका पथकाने सलमान खान आणि अरबाज खानला 150 प्रश्न विचारले. (Salman Khan House Firing Case)
दरम्यान, गोळीबार होण्याच्या आधी रात्री सलमान खानच्या घरी पार्टी झाली होती. पार्टी संपल्यानंतर रात्री उशिरा सलमान खान झोपला होता. पण सकाळी 5 वाजता गोळीबार झाला तेव्हा सलमान उठला. सलमानच्या मते, गोळीबाराची घटना अत्यंत गंभीर होती. याशिवाय गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचेही सलमान खानने कौतुक केले होते.