सचिन रमेश तेंडुलकर… क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा हा अवलिया! आजपर्यंत अनेक विक्रम त्याच्या नावावर नोंदवले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणाऱ्या या खेळाडूसाठी त्याच्या कारकिर्दीतील २२वे शतक मात्र कधीही न विसरता येण्याजोगे असे आहे. आजच्याच दिवशी म्हणजे २३ मे १९९९ रोजी सचिनने आपल्या वनडे करिअरमधील २२वे शतक झळकावले होते.
१९९९ हे वर्ष सचिनसाठी कसोटीचे ठरले होते. चेन्नईमध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १३६ धावांच्या शानदार खेळीनंतर त्याच्या पाठीचे दुखणे मात्र चांगलेच बळावले होते. अत्यंत वेदना होत असूनदेखील तो विश्वचषक सामन्यांसाठी इंग्लडमध्ये दाखल झाला होता. आपल्या ‘प्लेइंग इट माय वे’ या पुस्तकात त्याने याविषयी उल्लेख केला आहे. “काहीही झाले तरी वर्ल्डकप चुकवून चालणार नव्हते. त्यामुळे फिटनेससाठी आवश्यक ती ट्रेनिंग सुरु होती. पाठदुखी व्हायला नको म्हणून मी जमिनीवर झोपत असे”. असे सचिनने लिहले आहे.
वर्ल्डकपचा संग्राम सुरु झाला आणि पहिल्याच सामन्यात भारताला अपयशाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या सामन्यात जॅक कॅलिसच्या धुवांधार खेळीमुळे भारताचा पराभव झाला होता. त्यांनतर झिम्बाब्वेविरुद्ध असलेला दुसरा सामना भारत सहज जिंकणार असे सर्वांना वाटत होते. सगळ्यांच्या आशा सचिनवर टिकून होत्या. सामन्याच्या आदल्या दिवशी, लेस्टर येथे सचिन त्याचा मित्र अतुल रानडेसोबत आपल्या रूमवर आराम करत असतांनाच दारावरची बेल वाजली. सचिनने दरवाजा उघडला, दरवाज्यात सचिनची बायको अंजली उभी होती. अंजलीसोबतच अजय जडेजा आणि रॉबिन सिंग हे देखील होते. एक अत्यंत दुःखद बातमी घेऊन ते आले होते. सचिनचे वडील म्हणजेच साहित्यिक, प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. अचानक आलेल्या या बातमीने सचिन पुरता हादरून गेला आणि त्याने लागलीच मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतला.
१९ मे १९९९ रोजी भारतीय संघ झिम्बाब्वेला सामोरे जाण्यास तयार होत असतांनाच, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपल्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी मायदेशी परतत होता. त्यावेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेल्या ब्रिजेश पटेल यांच्याकडून माहिती देण्यात आली, “अत्यंत दुःखद अशा या घटनेमुळे सचिनला धक्का बसलेला आहे. तो वडिलांच्या अगदी जवळचा होता. काही दिवसांपासून ते आजारी असले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. सचिन आज सकाळीच मुंबईत रवाना झाला आहे. रविवारी केनिया विरुद्धच्या सामन्यासाठी तो उपस्थित राहू शकेल किंवा पुढच्या बुधवारी होणाऱ्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात तो खेळेल अशी आशा आहे.”
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातदेखील भारताला हार पत्करावी लागल्याने वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता वाढली होती. पुढचा सामना होता केनियाविरुद्ध. अगोदरचे दोन्ही सामने गमावल्याने या सामन्यातील हार भारतीय संघाला परतीचा मार्ग खुला करून देण्यास कारणीभूत ठरणार होती. सचिन खेळणार कि नाही यावर अजूनही प्रश्नचिन्हच होते. स्वभावतः अतिशय भावुक असणारा सचिन या कठीण परिस्थितीत मात्र स्थितप्रज्ञ राहिला. आणि वडीलांना अग्नी देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल होण्याचा त्याने निर्णय घेतला.
२३ मे १९९९ रोजी केनिया विरूद्ध होणाऱ्या या निर्णायक सामन्यासाठी सचिन उपस्थित राहिला आणि त्याने दणदणीत शतक देखील झळकावले. त्या सामन्यात सचिनने १०१ चेंडूत नाबाद १४० धावा काढत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला व सुपर सिक्स साठी भारताच्या आशा पल्लवित केल्या. एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनचे ते २२वे शतक होते. त्या शतकानंतर सचिनने साश्रुनयनांनी बॅट उंचावत आभाळाकडे पहिल्यांनंतर त्याच्यासोबतच जगभरातील अनेक क्रिकेटरसिकांना देखील आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते.
या प्रसंगाविषयी बोलतांना सचिनने एका मुलाखतीत सांगितले होते, “केनियाविरुद्धच्या त्या सामन्यात शतक झळकवण्यात मी यशस्वी जरी ठरलो असलो, तरी माझे लक्ष मात्र पूर्णतः खेळाकडे नव्हते. ती संपूर्ण खेळी, ते शतक मी माझ्या वडिलांना समर्पित करतो.” उत्तम खेळी केल्यानंतर बॅट उंचावुन आकाशाकडे पाहण्याची जी सवय सचिनला आहे. ते पाहणं म्हणजे बाबांची आठवण करणं असतं एव्हाना सर्वज्ञात आहे.
शब्दांकन- धनश्री गंधे