म्हणता म्हणता सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्याला आता आठ वर्षं होत आली. पण क्रिकेटप्रेमींच्या मनातली त्याची जादू अजूनही ओसरलेली नाही. जगभरात चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. आज सचिनचा वाढदिवस त्याच्या उपस्थितीत मुंबई इंडियन्स टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये साजरा होणार आहे. पण प्रत्येक सचिनप्रेमी आज त्याची आठवण काढून त्याचा वाढदिवस अप्रत्यक्षरीत्या साजरा करणार हे नक्की. जाणून घेऊयात त्याच्या क्रिकेट विश्वातील प्रवासाची सुरुवात ……
सचिनची विनोद कांबळीबरोबरची (Vinod Kambli) 662 रन्सची विक्रमी भागीदारी कुणाला माहीत नाही? एकीकडे ती मॅच सुरू होती तेव्हाच मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात या दोन मुलांची चर्चा सुरू झालेली होती. दिलिप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) तेव्हा मुंबई रणजी टीमचे कॅप्टन होते. माजी कॅप्टन वासू परांजपे त्यांना आझाद मैदानावर ती मॅच बघायला घेऊन गेले. वेंगसरकर यांची जिमखाना मॅच सुरू होती. पण परांजपे यांनी ती मॅच सोडून त्यांना सचिनची बॅटिंग बघण्याची गळ घातली. आधी दोन दिवस बॅटिंग, मग फास्ट आणि स्पिन मिळून 40 ओव्हर्सची बॉलिंग. आणि मॅचच्या पूर्वी आणि नंतर आचरेकर सरांच्या शिस्तीप्रमाणे नेट्स, असा 14 वर्षांच्या सचिनचा त्या टेस्ट दरम्यानचा कार्यक्रम होता.
कांबळीसोबतच्या रेकॉर्डमुळे अजरामर झालेल्या या मॅचनंतर काही दिवसांनी वासू परांजपे यांनी दिलिप वेंगसरकर यांना आणखी एक आग्रह केला – 15 वर्षांच्या सचिनला भारतीय राष्ट्रीय टीमच्या नेट्समध्ये सराव करू देण्याचा. टीम मुंबईतच होती. कपिल देव आणि चेतन शर्मासमोर सचिनच्या हातात बॅट देण्याचं वेंगसरकर यांच्या जिवावर आलं होतं. पण परांजपे त्यांचे जुने कॅप्टन. म्हणून ते नाकारू शकले नाहीत. शेवटी ब्रेबॉर्न स्टेडिअमवर भारतीय नेट्समध्ये खेळण्याची सचिनला संधी मिळाली. सचिनने आपली छाप पाडली, हे वेगळं सांगायला नको.
हे देखील वाचा: २०० धावांचा पहिला मानकरी !
छापही अशी पाडली की भारतीय टीममध्ये निवडीसाठी 15व्या वर्षीच त्याच्या नावाची चर्चा झाली. तेव्हा निवड समितीचे प्रमुख असलेले नरेन ताम्हणे या बैठकीत म्हणाले, ‘सचिनला या वयात कुठे बॉल लागला तर खूप टीका होईल आणि मीडियाचं ऐकून घ्यावं लागेल.’ म्हणून मग सचिनला आधी रणजीत खेळवण्यावर एकमत झालं. आणि इथून पुढे सुरू झाली सचिनची घोडदौड……
शब्दांकन – शामल भंडारे.