नव्या वर्षाची चाहूल लागली की चालू वर्षातील विशेष गोष्टी काय आहेत, याची पुन्हा उजळणी सुरु होते. प्रत्येक क्षेत्रातील वैशिष्टपूर्ण घटना आठवल्या जातात. राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रासोबतच विज्ञानातील या विशेष घटनांची आठवण काढत या वर्षाला निरोप देत, नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येते. आत्ताही नवे वर्ष सुरु होण्यासाठी काही तासांचा अवघी शिल्लक आहे, अशातच या वर्षातील सर्वात चमत्कारी गोष्ट कुठली आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात चमत्काराला जागा नाही, मात्र अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात घडलेल्या एका घटनेचा उघडपणे विज्ञानाच्या जगातील एक चमत्कार म्हणून उल्लेख करण्यात आला. ही घटना म्हणजे, कॅलिफोर्नियातील एका महिलेनं बाळाला जन्म दिला. वरवर ही निसर्ग नियमामधील घटना वाटत असली तरी, या बाळाचा जन्म कसा झाला, हे जाणण्यासारखे आहे. कॅलिफोर्नियामध्ये ऑगस्ट महिन्यात जन्माला आलेले हे बाळ नऊ महिने आईच्या पोटात होते, मात्र गर्भाशयात हे बाळ मोठे झाले नाही, तर हे बाळ गर्भाशयाच्या बाहेर वाढले. या नऊ महिन्यात बाळाच्या आईलाही त्याच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती. पोटात दुखायला लागल्यामुळे ही आई रुग्णालयात दाखल झाली. यावेळी झालेल्या तपासणीमध्ये या बाळाला जन्म देण्यात आला. तब्बल तीस डॉक्टरांनी मिळून ही अवघड शस्त्रक्रिया केली. ऑगस्ट महिन्यात जन्मलेले हे बाळ आता सुखरुप असून विज्ञानाच्या जगातील एक अनोखा चमत्कार म्हणूनच त्याच्याकडे बघितले जाते.

२०२५ मधील विज्ञानाच्या जगातील चमत्कार म्हणून कॅलिफोर्नियातील एका घटनेचा उल्लेख कायम केला जाणार आहे. कॅलिफोर्नियामध्ये एक दुर्मिळ घटना घडली आहे. एका आईने गर्भाशयाबाहेर विकसित झालेल्या बाळाला सुरक्षितपणे जन्म दिला आहे. डॉक्टरांच्या मते, लाखातून एकदा घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. अशा बाळंतपणाला एक्टोपिक गर्भधारणा म्हणतात. अशी गर्भधारणा झालेल्या बाळाचा जन्मही अवघड असतो. पण कॅलिफोर्नियातील सेडर्स-सिनाई हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या बाळाला सुखरुप जन्म दिला, सोबतच त्याच्या आईचाही जीव वाचवला आहे. कॅलिफोर्नियातील बेकर्सफील्ड येथील ४१ वर्षीय सुझे लोपेझ यांच्याबाबतीत हा चमत्कार झाला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांना पोटात खूप दुखायला लागले. सततच्या दुखण्यामुळे त्यांचे बीपीही वाढले. त्यामुळे सुझे या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. सुरुवातीला डॉक्टरांना सुझे यांच्या गर्भशयाच्या बाहेर एक गाठ आहे, असे वाटले. या गाठीचा आकार पाहून डॉक्टरांनी हा ट्यूमर आहे का, यासाठी तपासणी सुरु केली. या सर्वात सुझे यांना होणा-या वेदना वाढू लागल्या. त्यामुळे डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी त्यांची गर्भधारणा चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे डॉक्टरांनी सुझे यांच्या गर्भपिशवीच्या बाहेर असलेल्या मोठ्या गाठीचे ऑपरेशन सुरु केले. तब्बल ३० डॉक्टर या शस्त्रक्रियेमध्ये होते.
हे देखील वाचा
घरात नवजात बाळ असेल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
प्रगत तंत्राच्या माध्यमातून ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी या मोठ्या गाठीमध्ये काय आहे, हे जाणून घेतले आणि तेही हादरले. कारण गर्भाशयाच्या बाहेर असलेल्या गाठीमध्ये एक पूर्ण वाढ झालेले बाळ होते. अशा प्रकारच्या गर्भधारणेला एक्टोपिक गर्भधारणा म्हणतात. हा गर्भधारणा सामान्यतः प्राणघातक मानली जाते. यामध्ये आईच्या जीवाला मोठा धोका असतो. त्यामुळेच अत्यंत दुर्मिळ असे हे ऑपरेशन सेडर्स-सिनाई हॉस्पिटलचे डॉ. जॉन ओझिमेक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. जॉन यांच्यामते, गर्भाशयाबाहेर वाढणारा गर्भ पूर्ण मुदतीपर्यंत पोहोचण्याची शक्यता लाखोंमध्येही शक्य नसते. पण सुझे लोपेझ हिच्या गर्भाशयाबाहेर असलेला गर्भ हा पूर्णपणे सुरक्षीत होता. सुझे लोपेझ ही स्वतः नर्स आहे, तिला प्रसूतीच्या काही दिवस आधीच या प्रकारची गर्भधारणा असल्याची माहिती मिळाली. तेव्हा बाळाचे नऊ महिने पूर्ण झाले होते. सुझे लोपेझ वर्षानुवर्षे गर्भाशयाच्या सिस्टने ग्रस्त होती. वयाच्या २० व्या वर्षी तिचे एक अंडाशय काढून टाकण्यात आले होते. डॉक्टरांनी तिची आधी तपासणी केली होती, तेव्हा तिच्या पोटात २२ पौंड वजनाचा सिस्ट असल्याचे सांगितले होते. पोटदुखी आणि रक्तदाब वाढल्यानंतर ती तो सिस्ट काढण्यासाठी रुग्णालयात गेली. त्याचवेळी यात बाळ असल्याचे तिला समजले. सुझे लोपेझ ला १७ वर्षाचा एक मुलगा आहे.
हे देखील वाचा
Health : नियमित स्तनपान केल्याने आईला आणि बाळाला होतात मोठे फायदे
तिच्यासाठी ही बातमी अविश्वनीय होती. चमत्कारानं जन्मलेल्या या बाळाचे नाव सुझेने Ryu ठेवले आहे. रयू हे जपानी नाव आहे. जपानी भाषेमध्ये रयू म्हणजे, शक्ती, सौभाग्य आणि शहाणपणाचे प्रतीक आहे. रयू म्हणजे, फायटर म्हणूनही उल्लेख करण्यात येतो. ऑगस्ट महिन्यात जन्म झालेला रयू आणि त्याची आई सुझे या दोघांचीही प्रकृती आता छान आहे. ही शस्त्रक्रिया करणा-या ३० डॉक्टरांसाठी ही घटना एखाद्या चमत्कारासारखीच आहे.
