Home » Honey Trap : रशियन हनी ट्रॅपच्या जाळ्यात अमेरिका !

Honey Trap : रशियन हनी ट्रॅपच्या जाळ्यात अमेरिका !

by Team Gajawaja
0 comment
Honey Trap
Share

हनी ट्रॅप हे एक प्रकारचे हेरगिरी तंत्र आहे. यात गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सुंदर महिलांचा वापर करण्यात येतो. हनी ट्रॅप हे एक धोकादायक आणि अनैतिक तंत्र असले तरी त्याचा गेली कित्येक वर्ष सर्रास वापर होतो. विशेषतः आजकालच्या सोशल मिडियाच्या काळात हनी ट्रॅपचा वापर अधिक वाढला आहे. अनेक देशांच्या गुप्तहेर संघटना याच हनी ट्रॅपच्या आधारावर दुस-या देशातील संरक्षण आणि अन्य महत्त्वाची माहिती हस्तगत करतात. (Honey Trap)

या सर्वात रशियाच्या गुप्तहेर संघटना आघाडीवर आहेत. याच रशियानं हनी ट्रॅपचा वापर करत अमेरिकेची अंतर्गत यंत्रणा पोखरुन काढली आहे. अमेरिका आणि रशियामध्ये असलेले वैर हे कधीही न संपणारे आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांनी एकमेकांची भेट घेऊन चर्चा केली तरी या चर्चेआड या दोन नेत्यांमधील वैरभाव उघड होतो. त्यात रशियानं अमेरिकेत फैलावलेल्या हनी ट्रॅपच्या कथाही आता समोर येऊ लागल्या आहेत. रशियाच्या या हनी ट्रॅपच्या विळख्यात अमेरिकेची अवघी यंत्रणा पूर्णपणे फसल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाल्यानं अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेची मुख्य गुप्तहेर संघटना सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच सीआयए आहे. सीआयएच्या अंतर्गत अन्यही काही संघटना असून त्यांचे देशात आणि देशाबाहेर गुप्तचरांचे जाळे आहे. मात्र ही सर्व यंत्रणा किती भक्कम आहे, याबाबत कायम प्रश्नचिन्ह विचारले जात होते. आता तर या सर्व यंत्रणा पोखरल्याचा पूरावाच मिळाला आहे. सीआयए अंतर्गत असलेल्या एका गुप्तचर संघटनेच्या अहवालात अमेरिकेतील प्रमुख संस्थांमधील अधिका-यांना रशिया आणि चीन मधील सुंदरींनी हनी ट्रॅपमध्ये अडकवले असून त्याद्वारे देशातील महत्त्वाची माहिती रशिया आणि चीनमध्ये पोहचवली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (International News)

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी उघड केले आहे की, रशिया आणि चीनमधील गुप्तचर यंत्रणा काही वर्षापासून अमेरिकेत कारवाया करत आहेत. यात महिलांचा वापर अधिक करण्यात आला आहे. या तरुणी, शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्तानं अमेरिकेत आलेल्या आहेत. अतिशय रुपवान असलेल्या या तरुणी रशियासाठी सशस्त्र सैनिकांपेक्षा कमी नाहीत. या तरुणी नोकरीच्या वा अभ्यासातील मदतीच्या निमित्तानं अमेरिकेच्या प्रमुख संस्थांमध्ये काम करत आहेत. यातील अनेक तरुण पार्टटाईम आणि शिक्षणासाठी पैसे गोळा करण्यासाठी काम करतात. मात्र हे करतांना त्या या प्रमुख संस्थामधील माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारे अमेरिकन गुपिते आणि तांत्रिक माहिती परस्पर चोरून ती रशियाला पाठवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक जेफ स्टॉफ यांच्या मते, चीन आणि रशिया आता उघडपणे अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हेरगिरी करत आहेत. (Honey Trap)

मुख्यतः स्टार्टअप्स, संशोधन प्रकल्प आणि संरक्षण विभागातील माहिती मोठ्याप्रमाणात चोरण्यात आली आहे. यासाठी या रशियन सुंदरी या विभागातील अभियंते आणि अन्य उच्चपदस्थ अधिका-यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याकडून ही माहिती या प्रशिक्षीत महिला बेमालूमपणे काढून आपल्या देशातील गुप्तचरांपर्यंत पोहचवतात. याबाबत अमेरिकन गुप्तचर अधिकारी जेम्स मुल्वेनन यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात सांगितले आहे की, काही महिन्यापूर्वी दोन ग्लॅमरस चिनी महिला व्हर्जिनियामध्ये एका परिषदेत घुसण्याचा प्रयत्न करताना पकडल्या गेल्या. त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे अमेरिकेतील काही गुप्त माहिती सापडली. अशाच प्रकारे काही रशियन तरुणींचीही चौकशी सुरु आहे. तिने एका अमेरिकन एरोस्पेस कर्मचाऱ्याशी लग्न केले होते. त्यानंतर आपल्या अमेरिकन पतीकडून एरोस्पेस संदर्भातील तांत्रिक माहिती मिळवून तिनं ती माहिती रशियाला दिल्याचा संशय आहे. (International News)

=======

हे देखील वाचा :

Israel : हमासनं इस्रायली ओलिसांची सुटका केली !

======

रशियामध्ये हनीट्रॅपचे मोठे नेटवर्क आहे. तेथील गुप्तहेर संघटनांमध्ये अनेक तरुणींना या हनीट्रॅपचे प्रशिक्षण देऊन देश-विदेशात पाठवले जाते. त्यात अमेरिकेत पाठवलेल्या तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. अलीकडेच त्वेटेलिना जानचेवा आणि त्वेतांका डोन्चेवा या दोन बल्गेरियन महिलांना लंडनमध्ये अटक करण्यात आली असून त्या रशियन गुप्तचर संस्थेसाठी हनीट्रॅपचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात रशियासोबत चीनही या हनीट्रॅपमध्ये पुढे आहे. अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संघटनेच्या मते अनेक चिनी तरुणी शिक्षणासाठी अमेरिकेत येऊन गुप्तहेर म्हणून काम करत आहेत. फांग फांग या तरुणीने २०११ ते २०१५ दरम्यान अमेरिकन नेत्यांना जाळ्यात अडवले, तेव्हा या हनीट्रॅपचे जाळे उघड झाले. फांगने अमेरिकन काँग्रेस सदस्य एरिक स्वालवेल यांच्याशी जवळचे संबंध निर्माण करत अनेक गुप्त माहिती बाहेर काढली होती. एफबीआयला तिच्याबद्दल माहिती मिळण्यापूर्वीच ती चीनला पळून गेली. सध्या अमेरिकन गुप्तचर संघटना या हनीट्रॅपचा सामना कसा करायचा याबाबत आपल्या गुप्तचरांना प्रशिक्षण देत आहेत. हे एक मानसिक युद्ध असून त्याविरोधात लढा देण्यासाठी तयारी केली नाही तर अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे ढेपाळून जाईल, असा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे. (Honey Trap)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.