रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला धक्कादायक वळन मिळाले आहे. या युद्धात युक्रेननं चक्क रशियाचा काही भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. या भागात तैनात असलेल्या रशियाच्या सैनिकांना मारण्यात युक्रेनला यश आल्याची माहिती आहे. तसेच उर्वरित सैन्याला अटक करण्यात आली आहे. यामळे युक्रेन सीमेजवळील रशियन गावे खाली झाली आहेत. अनेक रशियन नागरिकांनी आपली घरे सोडून शहराकडे पलायन केले आहे. ही बाब रशियासाठी नामुष्कीची आहे. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादेमिर पुतीन यांनी या युद्धात धोकादायक व्हॅक्यूम बॉम्ब वापरल्याची माहिती पुढे आली आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी थर्मोबॅरिक शस्त्रे तयार केली होती. हा बॉम्ब कुठेही टाकला जातो, तेव्हा त्याच्या स्फोटामुळे हवेत मोठ्या प्रमाणात रासायनिक कण पसरतात आणि त्याचे विनाशकारी परिणाम होतात. युक्रेनने रशियाला दिलेल्या या मोठ्या धक्क्यामुळे रशियानं हेच व्हॅक्यूम बॉम्ब बाहेर काढले असून यामुळे रशिया युक्रेन युद्ध परमाणू युद्धाच्या टप्प्यावर पोहचल्याची चर्चा आहे. (Russia and Ukraine War)
फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झालेल्या रशिया युक्रेन युद्धातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे, युक्रेनने व्लादिमीर पुतिन आणि रशियासमोर पहिल्यांदा मोठे आव्हान उभे केले आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाला जोरदार झटका देत कुर्स्क प्रदेशाचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे. युक्रेनच्या सैन्यानं या भागात आपला झेंडा फडकवला आहे. रशियामधील ३५० चौरस किलोमीटरचा प्रदेश आता युक्रेनच्या ताब्यात आला आहे. जे युद्ध रशिया काही दिवसातच जिंकेल अशी शक्यता सांगण्यात येत होती. त्या युद्धात रशियासमोर उभं राहून युक्रेननं लढा दिला आहे. आता बलाढ्य अशा रशियावरच मात करायला सुरुवात केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादेमिर पुतिन अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच रशियन लष्कराने धोकादायक शस्त्रांचा वापर सुरु केला आहे. युक्रेनियन सैन्याने कुर्स्कमध्ये खोलवर जाण्यापासून रोखण्यासाठी रशिया धोकादायक थर्मोबॅरिक बॉम्ब टाकत आहे. (Russia and Ukraine War)
व्हॅक्यूम बॉम्ब म्हणून ओळखला जाणारा हा विध्वंसक बॉम्ब ज्या भागात पडतो त्या ठिकाणी घातक रसायने सोडतो. त्यामुळे गुदमरून किंवा फुफ्फुसाच्या संसर्गामुळे लोकांचा मृत्यू होतो. या धोकादायक बॉम्बमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. हे बॉम्ब कुर्स्कमध्ये टाकण्यात आल्याचा दावा आहे. या बॉम्बचा वापर म्हणजे रशियानं परमाणू युद्धाचे पहिले पाऊल टाकल्याचे सांगण्यात येते. युद्धग्रस्त कुर्स्क प्रदेशात रशियानं मोठ्या प्रमाणात हे व्हॅक्यूम बॉम्ब टाकले आहेत. पण या बॉम्बनी किती नुकसान झाले आहे, ते स्पष्ट नाही. या भागातील बहुतांश रशियन नागरिकांनी पलायन केले आहे. त्यामुळे यातून रशियाला नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. (Russia and Ukraine War)
युक्रेनच्या लष्कराने गेल्या आठवड्यात रशियाच्या हद्दीत २० किलोमीटर घुसण्यात यश मिळवले आहे. युक्रेन लष्कराच्या हल्ल्यात शेकडो रशियन तिथे आणीबाणी जाहीर करुन अतिरिक्त सुरक्षा दल पाठवले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच कोणत्याही देशाचे सैन्य रशियात दाखल झाले आहे. युक्रेनियन सैनिकांनी रशियातील इमारतींवर त्यांच्या देशाचा ध्वज लावत रशियाला अधिकच डिवचले आहे. पुतिन यांच्यासमोर हे मोठे आव्हान असून युक्रेनच्या सैनिकांना आपल्या देशाबाहेर काढण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न आता पुतिन करणार आहेत. त्याचवेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले आहे. रशियाच्या लष्करी कमकुवतपणाचा पर्दाफाश करण्यात आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
====================
हे देखील वाचा : ब्रिटनजवळ इस्लामिक राज्य !
===================
रशियन गावांचा ताब्यात घेतल्यावर युक्रेनच्या सैनिकांनी त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ही मोठी बातमी असून यामुळे रशियाच्या समर्थकांना आणि विरोधकांनाही आश्चर्यांचा धक्का बसला आहे. ज्या भागात रशियानं आणीबाणी लागू केली आहे, त्या कुर्स्क प्रदेशातील दोन मोठ्या तटबंदीच्या रेषा नष्ट करण्यात आल्या आहेत. ही तटबंदी उभारण्यासाठी रशियाला अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ लागला होता. तसेच त्याच्यावर सुमारे १४ हजार कोटी खर्च झाल्याचीही माहिती आहे. युक्रेनच्या हल्ल्यात आता हिच तटबंदी नष्ट झाली आहे. या सर्वातील चिंताजनक गोष्ट म्हणजे, ज्या ज्या भागात ही लढाई सुरू आहे तो भाग कुर्स्क न्यूक्लियर प्लांटजवळ आहे. हा पॉवर प्लांट रशियामधील सर्वात मोठ्या अणु प्रकल्पांपैकी एक आहे. याच भागात आता रशियानं व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याची माहिती आहे. यामुळे मोठा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल अशी शंका आहे. (Russia and Ukraine War)
सई बने