Home » सामान्यांचे आबा

सामान्यांचे आबा

by Correspondent
0 comment
R. R. Patil | K Facts
Share

उत्तम वक्ता, उत्तम प्रशासक आणि सर्वसमावेशक राजकारणी अशी आर आर पाटील यांची महाराष्ट्राला ओळख होती. सांगली जिल्ह्यातील अंजनीसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देणारा ठरला आहे. १९८९ पासून सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रारंभ केला.

 १९८९ ते १९९० या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखविली. आर. आर. यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून शरद पवार यांनीच त्यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना आर आर पाटील यांची उणीव निश्चितच पक्षाला जाणवत असेल.

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पाटील हे पवारांच्या विश्वासास पात्र ठरले आणि त्यांची राजकीय कारकीर्द बहरली.१९९० मध्ये पाटील प्रथम विधानसभेवर निवडून आले. विधानसभेवर येताच त्यांनी सभागृहातील आपल्या आक्रमक भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधले. विधानसभेत एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांची खास ओळख झाली. त्यानंतर १९९५, १९९९, २००४ आणि २००९ असा सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीवर विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून त्यांचा सतत वचक राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत त्याचा वाटा अत्यंत महत्त्वाचा होता. १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेचा पराभव होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. ही सत्ता मिळविण्यातही पाटील यांचे योगदान मोठे होते. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये पाटील हे कॅबिनेट मंत्री बनले.

त्यांच्याकडे ग्रामीण विकास व पाणीपुरवठा हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. या खात्याचा कारभार हाती घेतल्यानतर त्याना ग्रामसभच्या मजबुतीकरणाबरोबरच स्वच्छतेवर अधिक भर दिला. गावचा विकास व गावाच्या स्वच्छतेसाठी त्यांनी ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ ही योजना राबविली.

माननीय शरद पवार साहेबांसमावेत आबा

यात लोकसहभागातून गावाची स्वच्छता ठेवणाऱ्या गावांसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली. या अभियानास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो गावांचा या अभियानात कायापालट झाला. राज्यात पहिल्या येणाऱ्या गावास २५ लाखांचे बक्षीस देण्यात आले. राज्याच्या विकासातील महत्त्वाचा अभियानास ओळखले जाते.

२००४ मध्ये राज्यात पुन्हा काँग्रेस-आघाडीचे सरकार सत्तेवर आले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढली होती. त्याचबरोबर आर. आर.पाटील यांची लोकप्रियताही वाढली होती. ग्रामविकासमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना थेट उपमुख्यमंत्रिपदी बढती दिली.

१ नोव्हेंबर २००४ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही सोपविण्यात आली. उपमुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यातील सर्वात वादग्रस्त निर्णय ठरला तो डान्स बार बंदीचा. या निर्णयास संबंधित प्रस्थापितांनी जोरदार विरोध झाला; पण सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे डान्स बार बंदीच्या निर्णयांची त्यांनी निग्रहपूर्वक अंमलबजावणी केली.

गावागावातील तंटे गावात मिटविण्यासाठी त्यांनी ‘महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीही गावांना बक्षिसे जाहीर करण्यात आली. या अभियानातून गावागावामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. मंत्रिमंडळातून बाहेर पडलल्या पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली त्यांच्याच नेतृत्वाखाली २००९ची विधानसभा निवडणूक पार पाडली.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर आली. सुमारे वर्षभर मंत्रिमंडळातून बाहेर असणाऱ्या पाटील यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांच्यावर पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाणार अशी शक्यता होती. मात्र त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद गेले.

कार्यतत्पर आबा

पाटील यांच्यावर पुन्हा गृहमंत्रिपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्या फळीतील नेता, सर्वसामान्यांचे आधारस्तंभ आणि सामाजिक सुधारणांसाठी पुढाकार घेणारे नेतृत्व अशीच त्यांची राज्याच्या राजकारणातील ओळख आहे.

समाजासाठी अजून खूप काही करण्यापुर्वीच मृत्यूनं आर आर पाटील यांना गाठलं आणि एका समंजस नेतृत्वाचा अकाली अस्त झाला.जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले.

— आदित्य बिवलकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.