Home » Rohit Arya : १७ मुलांचा जीव, एन्काउंटर आणि संपूर्ण बॅकस्टोरी …

Rohit Arya : १७ मुलांचा जीव, एन्काउंटर आणि संपूर्ण बॅकस्टोरी …

by Team Gajawaja
0 comment
Rohit Arya
Share

आपल्यातल्या अनेकांना कधी कधी रील लाइफ आणि रियल लाइफ यातील फरक इतका कमी वाटतो की पडद्यावर दिसणाऱ्या अनेक गोष्टी आपण प्रत्यक्ष आयुष्यात करायला जातो. रोहित आर्या आणि त्याने केलेलं अपहरण आणि मग त्याचा झालेला एन्काउंटर हे त्याचंच एक उदाहरण. मात्र टिपिकल बॉलिवूड पिक्चरसारखा या नाट्याचा शेवट रोहित आर्यासाठी हॅप्पी एंडिंग नाही ठरला. महत्वाच म्हणजे गुरुवारी मुंबईतील पवई येथे पोलिसांनी या अपहरण नाट्याचा अंत करताना ठार मारलेल्या रोहित आर्याचा महाराष्ट्र सरकारशी दीर्घ आणि गुंतागुंतीचा संबंध होता. २०२२ मध्ये राज्य शालेय शिक्षण विभागासोबत सहकार्याने त्यांच्या “स्वच्छता मॉनिटर” उपक्रमाद्वारे स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचे हळूहळू न भरलेल्या निधी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि आर्यच्या शेवटच्या दिवसांमध्ये निषेधाच्या मालिकेत रूपांतर झाले. आणि शेवटी पवईच्या एका अभिनय स्टुडिओमध्ये पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या, जिथे तो १७ मुलांना ओलीस ठेवत होता. त्यामुळे हे प्रकरण नेमकं किती खोलवर होतं? हा रोहित आर्या नेमका कोण होता? पोलिसांसमोर त्याला संपवण्याचाच ऑप्शन का राहिला? जाणून घेऊ. (Rohit Arya)

Rohit Arya

बँकर म्हणून करियरची सुरुवात करून नंतर सामाजिक, उद्योजक आणि चित्रपट निर्माता अशी ओळख घेणारा रोहित मूळ पुण्याचा होता. त्याने ऑक्टोबर २०१३ मध्ये “लहान मुलांना गोष्टी करण्याच्या किंवा समजण्याच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे ” हे ध्येय घेऊन प्रोजेक्ट लेट्स चेंज सुरू केला. २०१३ मध्ये ‘महात्मा गांधी जयंती से सरदार पटेल जयंती तक’ या मोहिमेपासून प्रेरित होऊन त्याने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘लेट्स चेंज’ नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीने या उपक्रमाची सुरुवात झाली. नंतर महाराष्ट्र आणि गुजरातमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कृतीशील योजनांसह स्वच्छता मोहीम हाती घेण्यास प्रेरित करण्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. (Trending News)

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, त्यांनी स्वच्छता मॉनिटरची संकल्पना सुरू केली होती, जी शालेय मुलांना त्यांच्या शाळा आणि परिसरांसाठी स्वच्छता दूत म्हणून नियुक्त करण्याचा एक प्रोजेक्ट होता. या कार्यक्रमांतर्गत उपक्रमांमध्ये कचरा टाकणे आणि थुंकणे यासारख्या कृत्यांना पाहणे आणि त्यांना परावृत्त करणे आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा घटनांचे व्हिडिओ रेकॉर्ड करणे अशा गोष्टी केल्या जात होत्या आणि मग रोहितचा संबंध आला सरकारशी. सप्टेंबर २०२२ मध्ये रोहित आर्याने स्वच्छता मॉनिटर संकल्पना घेऊन शालेय शिक्षण विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला निवडक शाळांमध्ये ती अंमलात आणण्याची परवानगी देण्यात आली मात्र सोबतच सीएसआर किंवा इतर मार्गांनी तो या प्रकल्पाला निधी उभारेल अशी अट घालण्यात आली.(Rohit Arya)

मग त्याने २०२२ मध्ये स्वतःच्या खर्चाने हा प्रकल्प चालवला आणि २०२३ मध्ये त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर केला. मग पुढे सरकारने ३० जून २०२३ रोजीच्या सरकारी ठरावाद्वारे (GR) प्रस्तावाला मान्यता दिली आणि रोहितच्या कंपनीला ९.९ लाख रुपये वितरित केले गेले.
त्यानंतर २५ जानेवारी २०२४ च्या दुसऱ्या एका जीआरनुसार, स्वच्छता मॉनिटर प्रकल्प नंतर राज्यातील माझी शाळा सुंदर शाळा (माझी शाळा, सुंदर शाळा) मध्ये विलीन करण्यात आला.

=====================

हे देखील वाचा : Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून वापरा हे 5 घरगुती फेसपॅक, त्वचा राहील मऊ आणि चमकदार!

=====================

मात्र यानंतरच रोहित आर्या आणि राज्य सरकार यांच्यात बिनसल्याच दिसतं. या टप्प्यात प्रॉमिस केलेले २ कोटी रुपये सरकारने कधीही दिले नाहीत असा आरोप रोहित आर्याने केला आहे. तर शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पाच्या अंमलबजावणी योजनांबाबत आर्या यांच्याकडून “अस्वीकार्य प्रस्ताव” आल्यामुळे निधी रोखण्यात आला आहे. सोबतच रोहित आर्याने शाळांकडून पैसे घेतल्याच देखील विभागाने म्हटलं होतं. रोहित आर्याला असे पैसे घेण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. यानंतर रोहितच्या कंपनीने शाळांकडून घेण्यात आलेले पैसे त्याला शासनाकडे डिपॉझिट करण्यास सांगण्यात आलं होतं. सोबतच त्याच्या कंपनीच्या विरोधात चौकशीही लागली होती. मात्र रोहितला हे आरोप मान्य नव्हते आणि त्याने त्याचे पैसे थकवल्याबद्दल आंदोलन करण्यास सुरवात केली. मात्र त्यानेही काम होत नसल्याने मग रोहित आर्याने एक टोकाचं पाऊल उचललं. महत्वाचं म्हणजे या काळात तो आर्थिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्याही खचला होता. त्याचं मानसिक आरोग्यही ठीक नव्हतं.(Rohit Arya)

त्यातूनच मग पवईमध्ये 30 नोव्हेंबर रोजी अपहरणाचा प्रकार त्याने घडवून आणला. ऑडिशनच्या नावाखाली परभणी, लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या 15 वर्षांखालील 17 मुलांसह 20 जणांना रोहित आर्याने पवईच्या प्रसिद्ध आर. ए. स्टुडिओमध्ये ओलिस ठेवले. लहान मुलांचं आणि ते ही इतक्या मोठ्या प्रमाणात अपहरण झाल्याने एकंच खळबळ उडाली आणि मग पोलीस ऍक्शनमध्ये आले. रोहित आर्याने सुरवातीला व्हिडीओ रिलीज करून आपल्याला काही बोलायचं असल्याचं सांगितलं.

मग पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवल. त्यावेळी पोलिसांना मागच्या दाराने इमारतीत प्रवेश करण्यात यश आले. आत गेल्यावर, त्यांनी प्रत्येक प्रवेशद्वाराची तपासणी केली आणि शेवटी ते स्टुडिओला जोडलेल्या वॉशरूमकडे गेले. पोलिसांना पाहून आर्यने एअरगनने एका ओलिसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमोल वाघमारेने मुलांना वाचवण्यासाठी गोळीबार केला. छातीत गोळी लागल्याने आर्य कोसळला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आता रोहितच्या एन्काउंटरवर प्रश्न निर्माण होतंच आहे मात्र १७ मुलांचा जीव पाहता पोलिसांकडे दुसरा ऑप्शन तरी होता का? असा प्रश्न विचारला जात आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.