आपल्या महाराष्ट्रात चालेलेला ‘हाय वोल्टेज ड्रामा’ जरा हळू हळू कमी होऊ लागलाय. गेले पंधरा ते वीस दिवस चहाच्या टपरीपासून ऑफिसच्या डेस्कपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हाच एक विषय चर्चिला आणि चघळला जात होता. पण आता जरा लोकांना राजकारणापलीकडेही जग आहे याची जाणीव व्हायला लागली आहे. ही जाणीव व्हायला लागली तशी एक बातमी कानावर आली ती म्हणजे सुपरहिट बॉलीवुड स्टार आर. माधवन याचा नुकताच एक नवीन चित्रपट तब्बल सात ते आठ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं नाव आहे रॉकेटरी: द नंबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect).
चित्रपटाचं नाव ऐकल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की, हा चित्रपट अंतराळ क्षेत्राशी संबंधित आहे. हो! अंतराळ क्षेत्राशी संबंध असणारा हा चित्रपट एका प्रकाशझोतात न आलेल्या शास्त्रज्ञावर आधारित आहे. या शास्त्रज्ञाचं नाव म्हणजे ‘नंबी नारायण’.
एका मुलाखतीत बॉलीवुड स्टार आर माधवन या सिनेमाविषयी सांगताना म्हणतो की, “मी अतिशय कमी दर्जाचा असा विचार घेऊन या सिनेमाविषयी बोलायला नांबी सरांकडे गेलो होतो. मी त्यांच्या कामाला माझ्याही नकळत कमी लेखलं होतं. पण जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते व्यक्तिमत्व काय आहे आणि किती मोठं आहे याची मला जाणीव झाली. (Bollywood Movie – Rocketry: The Nambi Effect)
आपल्याला साधारण या व्यक्तीविषयी इंटरनेटवर किंवा इतर कुठूनही इतकंच सांगितलं जातं की, हा एक इस्रोचा शास्त्रज्ञ होता. या व्यक्तीचं काम खूप मोठं होतं. पण पुढे त्याचं नशीब बदलून टाकणारी एक घटना या व्यक्तीसोबत घडली आणि ती घटना म्हणजे या व्यक्तीवर चुकीचे आरोप केले गेले. त्याला स्पाय ठरवण्यात आलं आणि या सगळ्यांत त्या व्यक्तीच्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान झालं.
रॉकेटला जमिनीवरून उड्डाण करण्यासाठी जो फोर्स लागतो त्या विषयात नंबी नारायण यांनी मास्टर्स केलं होतं. शिवाय इस्रोमध्येच असताना त्यांनी विकास इंजिनचा सुद्धा शोध लावला. त्यांचं इतकं मोठं योगदान पाहून नासानेसुद्धा त्यांना संधी दिली होती. पण ती संधी न घेता, केवळ देशासाठी ते इस्रोमध्ये काम करत राहिले.हे देखील वाचारॉकेटला जमिनीवरून उड्डाण करण्यासाठी जो फोर्स लागतो त्या विषयात नंबी नारायण यांनी मास्टर्स केलं होतं. शिवाय इस्रोमध्येच असताना त्यांनी विकास इंजिनचा सुद्धा शोध लावला. त्यांचं इतकं मोठं योगदान पाहून नासानेसुद्धा त्यांना संधी दिली होती. पण ती संधी न घेता, केवळ देशासाठी ते इस्रोमध्ये काम करत राहिले.
या महान शास्त्रज्ञाच्या नशिबात मात्र काही वेगळंच वाढून ठेवलं होतं. साधारण १९९४ साली मालदीव मधल्या एका महिलेला आणि नंबी नारायण यांना अटक करण्यात आली. इस्रोच्या रॉकेट इंजिनचं चित्र पाकिस्तानला विकण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती.
====
हे देखील वाचा – कोटींच्या गाड्या अन् बंगला! जाणून घ्या मुकेश अंबानींच्या आलिशान जीवनशैलीबद्दल
====
अटक झाल्यानंतरचे तब्बल ५० दिवस नंबी नारायण यांना तुरुंगात काढावे लागले. त्यांच्यावर खूप चुकीचे आरोप झाले. नाचक्की झाली, बदनामी झाली, एवढंच काय तर, त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा या सगळ्याची झळ सोसावी लागली. या सर्व प्रकरणात त्यांचं स्वतःचं खूप नुकसान झालं, पण त्यावेळीही या सगळ्यात देशाचं खूप मोठं नुसकान झालं म्हणून त्यांना जास्त दु:ख झालं होतं.
नंबी नारायण यांच्या अटकेमुळे जे इंजिन १९९९ सालातच पूर्ण होऊ शकलं असतं ते पूर्ण व्हायला तब्बल १५ वर्ष लागली. जेव्हा ही सगळी तपासणी सीबीआयकडे सोपवली गेली तेव्हा नंबी नारायण यांना निर्दोष घोषित करण्यात आलं. त्यामुळे देशानेच देशाचं जास्त नुकसान केलंय याची खंत नंबी नारायण यांच्या मनात जास्त होती. हीच खंत आज इतक्या वर्षांनी सुद्धा आर. माधवनला त्यांच्या डोळ्यात दिसली, जाणवली. आणि तेव्हा “आपण यावर काहीतरी केलं पाहिजे, या माणसाला आपल्या परीने का होईना न्याय दिला पाहिजे”, अशी भावना आर माधवनच्या मनात निर्माण झाली. (Bollywood Movie – Rocketry: The Nambi Effect)
यानंतर आर माधवनने हळू हळू पाऊलं उचलायला सुरवात केली आणि चित्रपट आकार घेऊ लागला. रॉकेटरी: द नंबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect) या चित्रपटाच्या लेखनापासून दिग्दर्शन आणि निर्मितीपर्यंत सारं काही आर माधवन यानेच केलं आहे. त्यामुळे चित्रपट उत्कृष्ट असणार यात काहीच शंका नाहीये. पण या चित्रपटामागची कहाणी ऐकून हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने अगदी आवर्जूनच बघायलाच हवा, हे मात्र खरं.