रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळून तालुक्यातील एक व्हिडिओ गेल्या आठवड्यापासून सोशल मिडियावर सर्वाधिक बघितला जात आहे. हा व्हिडिओ एका मगरीचा आहे. पंधरा फूट लांबीची एक मगर चिपळूनच्या रस्त्यांवरुन आरामात फिरत होती. धोधो पावसात फिरणा-या या मस्त मगन मगरीला पाहून अनेकांची पाचावर धारण बसली. पादचा-यांनी मगरीला बघून लांबचा रस्ता पकडला. तर वाहनधारकांनी आपापल्या गाडीच्या काचा बंद करुन घेतल्या. मात्र मुळ चिपळूनकरांना या घटनेचे विशेष वाटले नाही. कारण गेल्या काही वर्षापासून चिपळूनमधून वाहणा-या दोन मोठ्या नद्या आणि एका तलावात अशाप्रकारच्या मगरींची संख्या जास्त झाल्याची चर्चा आहे.
या मगरी पावसाळ्यात अशाचप्रकारे रस्त्यावर येतात. रत्नागिरी जिल्ह्याला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. याच जिल्ह्यातील चिपळून तालुक्यात दमदार पाऊस पडतो. अशावेळी नद्यांमधील पाण्याची पातळी वाढते, आणि त्या नदीत रहाणा-या मगरी मग मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. चिपळूनमध्ये जेव्हा जेव्हा नद्यांना पूर येतो, तेव्हा या मगरी थेट मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना दरवर्षी होत आहेत. चिपळूनची शिवनदी आणि वशिष्ठी नदी या मगरींचे निवासस्थान आहे. (River of crocodiles)
या दोन्हीही नद्यांच्या पात्रात आता मगरींची संख्या धोकादायक होईल, एवढी वाढली आहे. याशिवाय चिपळून येथील वीरेश्वर तलावतही मगरी आहेत. या सर्व मगरी पावसाळ्यात जशा मानवी वस्तीत घुसतात, तशा ऊन आले की नदीकाठावर येतात. अशा मगरींमुळे भविष्यात मानवावर हल्ला होण्याचीही भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.चिपळूनच्या रस्त्यावर आरामात फिरणा-या विशाल मगरीचा व्हिडिओ गेल्या आवठवड्यात सर्वाधिक व्हायरल झाला. यानंतर चिपळूनमधून वाहणा-या शिवनदी आणि वशिष्ठी नदीपात्रातील मगरींच्या वाढत्या संख्येची चर्चा होत आहे. (River of crocodiles)
शिव नदी हे मगरींचे घर असल्याचे म्हटले जाते. कामठे-कापसाळ परिसरातील डोंगर हे शिवनदीचे उगमस्थान मानले जाते. ही नदी चिपळूण शहराच्या मध्यभागी वाहते. शिवनदीला दर पावसाळ्यात मोठा पूर येतो. एकूणच चिपळून आणि परिसरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शिवनदीला येणारा पूरही मोठा असतो. याच नदिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्चिम असे नैसर्गिकरित्या दोन भाग तयार झाले आहेत. या नदीतून वाहतूक होत असल्याचीही माहिती आहे. ऐतिहासिक काळात या नदीचा वापर मोठ्या गलबतांसाठीही होत असल्याची माहिती जाणकार देतात. मात्र अलिकडे डोंगरमाथ्याहून येणा-या मातीमुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे.
हाच गाळ शिवनदीमधील मगरींसाठी आरामदायक निवासस्थान झाला आहे. कारण शिवनदीच्या काठावरील गाळात रहाणा-या या मगरींचे प्रमाण गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढले आहे. पावसाळ्यात याच मगरी पाण्याची पातळी वाढली की मानवी वस्तीत येतात. चिपळूण शहरातील भोगले, खाटीकगल्लीय या भागात मगरींचा कायम मुक्त संचार असतो. त्यांना पकडून तेथील निसर्गप्रेमी नदीत सोडतात. (River of crocodiles)
मात्र या घटना वारंवार होत असल्यानं आता या मगरींना अन्यत्र नेण्याची मागणीही जोर धरत आहे. शिवनदीशिवाय चिपळूनची आणखी एक नदी आहे. ती नदी म्हणजे वशिष्ठी नदी. ही नदीही चिपळूनची ओळख म्हणून गौरविली जाते. वशिष्ठी नदी चिपळूनच्या शहरी भागातून वाहणा-या शिवनदीला मिळते आणि तिचे पात्र अधिक मोठे होते. हिच वशिष्ठी नदी खाली दाभोळ खाडीत मिळते.
====================
हे देखील वाचा : भारतात सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा साप !
====================
वाशिष्ठी नदी ही कोकणातली महत्त्वाची नदी आहे.संपूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यातून वशिष्ठि नदी वाहते. वशिष्ठी नदीच्या काठावर मोठी वनसंपदा आहे. याच नदीवर अवलंबून असलेल्या जंगलांमध्ये प्राण्यांचीही संख्या मोठी आहे. यासोबत वशिष्ठी नदीमध्ये मोठ्याप्रमाणात मगरीही आहेत. विशेषत: वाशिष्ठी नदीची उपनदी असलेल्या तांबी नदीच्या पात्रात मगरी मोठ्या प्रमाणात आढळतात.कात्रोली धरणाजवळ मोठ्या प्रमाणात मगरी कायम दिसतात. (River of crocodiles)
कात्रोली धरणाजवळ मोठ्या प्रमाणात मगरी कायम दिसतात. दरवर्षी पावसाळ्यात याच मगरी चिपळूनवासीयांसाठी डोकेदुखी ठरतात. त्यांची संख्या एवढी वाढली आहे की त्या पावसाळ्याच्या महिन्यात कायम मानवी वस्तीमध्ये दिसून येतात. याशिवाय चिपळून येथील वीरेश्वर तलावतही मगरींचे वास्तव्य आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजुला असलेल्या या ऐतिहासिक वीरेश्वर तलावातील या मगरी अनेकवेळा तलावाच्या बाहेर आलेल्या असतात. या तलावातही पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली की मगरी वर येतात आणि त्या मानवी वस्तीत घुसतात. चिपळूनमधील नद्यांमधील ही मगरींची वाढती संख्या स्थानिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
सई बने