भाद्रपद महिना सुरु झाला की वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. या गणेशउत्सवाच्या दहा दिवसात काही लहान- मोठे सण साजरे केले जातात. यातलाच एक महत्वाचा सण म्हणजे ऋषिपंचमी. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पंचमीला ऋषी पंचमीचा सण साजरा होतो. हा सण किंवा हे व्रत स्त्रियांनी करायचे असते. आपल्या हिंदू धर्मात होऊन गेलेल्या अनेक महान ऋषींना हे व्रत समर्पित आहे.
याच हिंदू धर्मामध्ये सात मुख्य ऋषी मानले जातात. याच सात ऋषींची पूजा आजच्या दिवशी केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. या सात ऋषींमध्ये कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ यांचा समावेश होतो. या व्रतामध्ये ब्राह्मणांना दान, दक्षिणा देण्याचे मोठे महत्त्व आहे. यंदा हे व्रत ८ सप्टेंबर २०२४ रोजी साजरे केले जात आहे. काही भागात ऋषी पंचमीचे व्रत हे स्त्रियांचा मासिक धर्माचा विटाळाचा दोष घालवण्यासाठी केले जाते. मुलगी आयात आल्यानंतर आणि जो पर्यंत स्त्रियांना मासिक धर्म चालू तोपर्यंत हे व्रत केले जाते.
ऋषीपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त
ऋषीपंचमी पूजा मुहूर्त : सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल.
ऋषीपंचमी ब्रह्म मुहूर्त : सकाळी ४ वाजून ३१ मिनिटांपासून ते दुपारी ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल.
ऋषीपंचमीचा अभिजीत मुहूर्त : सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल.
ऋषी पंचमीची पूजा
ही पूजा मांडतात त्यात कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठ ऋषींच्या पत्नीची अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडल्या जातात. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून एक दिवस तरी अर्थात आजच्या दिवशी स्वतः कष्ट करून प्राप्त केलेले अन्न खायचे असते. ऋषींनी मनुष्याला जीवनात यश मिळवण्यासाठी आणि योग्य पद्धतीने जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ऋषींचे ज्ञान, त्यांचे सिद्धांत त्यांचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.
ऋषिपंचमीच्या पूजेचा मंत्र
कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।
गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।
ऋषिपंचमीचे महत्त्व
ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते.
ऋषिपंचमीला या भाज्या करतात
महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते.
ऋषि पंचमी व्रत ठेवणार्यांना गंगेत स्नान करणे लाभदायक मानले जाते. परंतु सगळ्यांना हे शक्य नसते. अशा वेळेला अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. सकाळी 108 वेळा मातीने हात धुवावेत, शेण माती, तुळशीची माती, पिंपळाची माती, गंगाजी माती, गोपी चंदन, तीळ, आवळा, गंगाजल, गोमूत्र मिसळून हात पाय धुतात. स्नान करून गणेशाची पूजा केली जाते. गणेशाची पूजा केल्यानंतर सप्तऋषींची पूजा व कथा वाचन केले जाते. पूजा केल्यानंतर केळी, तूप, साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मण किंवा ब्राह्मणाला दान केले जाते. दिवसातून एकदा जेवण केले जाते. यामध्ये दूध, दही, साखर, धान्ये खात नाहीत. फळे आणि काजू खाऊ शकतात.
ऋषी पंचमी कथा
ब्रह्म पुराणानुसार, राजा सीताश्वने एकदा ब्रह्माजींना विचारले – पितामह, सर्व व्रतांमध्ये सर्वोत्तम आणि त्वरित फलदायी व्रत कोणते आहे. त्यांनी सांगितले की ऋषीपंचमीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि पापांचा नाश करणारे आहे. ब्रह्माजी म्हणाले, हे राजा, विदर्भात उत्तंक नावाचा एक पुण्यवान ब्राह्मण राहत होता. त्यांची पत्नी सुशीला ही सद्गुणी होती. त्याला एक मुलगा आणि एक मुलगा होता. त्यांची मुलगी लग्नानंतर विधवा झाली. दु:खी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलींसह गंगेच्या काठावर झोपड्या बांधून राहू लागले.
काही काळानंतर उत्कला कळले की त्याची मुलगी जन्मत: मासिक पाळी असतानाही पूजेच्या भांड्यांना हात लावते. त्यामुळे त्याच्या शरीरात जंत पडले आहेत. धर्मग्रंथानुसार चौथ्या दिवशी स्नान केल्याने ती शुद्ध होते. ऋषीपंचमीचे व्रत शुद्ध मनाने पाळल्यास पापमुक्त होऊ शकते. वडिलांच्या आदेशानुसार, त्यांच्या मुलीने विधीपूर्वक उपवास केला आणि ऋषी पचमीची पूजा केली. असे म्हणतात की व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली. तसेच पुढील जन्मी त्यांना अखंड सौभाग्य लाभले.
ऋषिपंचमीची कहाणी
ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई.
एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला.
तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली.
बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो.
आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला.
दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.
तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषिपंचमीचं व्रत कर! ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं.
त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.