Home » अनेक प्रश्न निर्माण करून गेलेला सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू

अनेक प्रश्न निर्माण करून गेलेला सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू

by Correspondent
0 comment
Sushant Singh Rajput | K Facts
Share

लेखन – श्रीकांत ना. कुलकर्णी

हरहुन्नरी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होऊन १४ जूनला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. मात्र त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. घरातील पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. एका तरूण अभिनेत्याचा अकाली दुर्देवी अंत सर्वांनाच चटका लावून गेला त्याचबरोबर अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला. त्याच्या या आततायी कृत्याने केवळ चित्रपटसृष्टीत नव्हे तर देशातील त्याच्या लाखो चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्याच्या आत्महत्येच्या कारणांना नंतर अनेक फाटे फुटले.

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील एका तरुण अविवाहित मंत्र्यांचे बॉलिवूडमधील कलाकारांशी असलेले मैत्रीसंबंध लक्षात घेऊन सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आला अशीही जोरदार चर्चा सुरुवातीला सुरू झाली होती. त्याचीही अनेक कारणे सांगण्यात येऊ लागली. बॉलिवूडमधील घराणेशाही, स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रस्थापितांकडून नवोदित आणि होतकरू अभिनेत्यांची होत असलेली गळचेपी, अल्पावधीत मोठे यश मिळविण्यासाठी चालू असलेली जीवघेणी स्पर्धा, आदी गोष्टींवरही चर्चा झडल्या. याशिवाय सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकाराने बॉलिवूडचे ड्रग्सशी असलेले कनेक्शन पुन्हा एकदा उघडकीस आले.

Sushant Singh Rajput death

याप्रकरणात सुशांतसिंग (Sushant Singh Rajput) याच्या घरात राहणारी त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला तसेच सिद्धार्थ पिठानी या त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली. तपासात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्स प्रकरण बाहेर आले आणि पुढे चालून दीपिका पदुकोण, रकुल प्रीती सिंग आदी अभिनेत्रींची चौकशीही झाली. त्याशिवाय सुरूवातीलाच सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात सुशांतसिंगने आत्महत्याच केली असा निष्कर्ष काढला होता. मात्र मुंबई पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीबाबत लगेच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. अर्थात त्यामागेही उघडपणे झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप होते.

त्यातच सुशांतच्या वडिलांनी त्याचा खूनच झाला असा आरोप करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुशांतसिंग हा बिहारचा असल्याने बिहार सरकारनेही या वादात उडी घेतली आणि सुशांत सिंग याच्या वडिलांच्या मागणीला पाठिंबा दिला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली. सुरुवातीला सीबीआयच्या चौकशीत सुशांतसिंग प्रकरणात फार मोठे ‘घबाड’ लागेल अशी हवा निर्माण झाली होती मात्र तसे काही दिसले नाही. आता वर्षभरानंतरही सीबीआयने सुशांतसिंग प्रकरणात आपला कोणताही निष्कर्ष दिलेला नाही. ‘तपास चालू आहे’ एवढेच सीबीआयतर्फे सांगण्यात आले आहे.

Sushant Singh Rajput

आपल्याकडे कोणत्याही प्रकरणाचे कसे ‘राजकीय भांडवल’ केले जाते त्याचे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण हे उत्तम उदाहरण आहे. केंद्रात भाजपचे सरकार आणि महाराष्ट्रात भाजपविरोधी आघाडीचे सरकार ( महाविकास आघाडी ) सत्तेवर असल्यामुळे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे ‘राजकारण’ प्रकर्षाने दिसून आले. त्या राजकारणाचा निरपेक्ष वृत्तीने केलेल्या तपासावर परिणाम होतो हेही अनेकांच्या लक्षात आले नाही. वास्तविक अशा तपासात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधांचा प्रश्न येतोच कोठे? परंतु सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून आली त्यामुळे तपास यंत्रणांवर कसा दबाव येतो हेही अधोरेखित झाले.

सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस, सीबीआय प्रमाणेच अतिरिक्त संचालनालय तसेच ड्रग्सविरोधी पथकाने तपास केला. यानिमित्त बॉलिवूडमधील कलाकार ड्रग्जच्या विळख्यात कसे अडकले आहेत हेही स्पष्ट झाले. सुशांतसिंगची मैत्रीण रिया चक्रवर्तीने तर त्याची कबुलीच दिली आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सध्या जामिनावर मुक्त आहेत. मात्र रियाच्या जबाबामुळे बॉलिवूड (Bollywood) मधील कलाकारांचे परस्परांशी कसे ‘मुक्त संबंध’ आहेत हेही दिसून आले. ड्रग्स प्रकरणाच्या मुळाशी जाऊन बॉलिवूडमधील ‘रॅकेट’ उद्ध्वस्त करण्याची नामी संधी यानिमित्ताने अमलीपदार्थ विरोधी संचालनायला मिळाली आहे हे मात्र खरे. मात्र अंतिम तपासात त्यातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.

Sushant Singh Rajput Case Not Closed

चित्रपटसृष्टीत कसलाही वारसा नसलेला वा साधी ओळख-पाळख नसलेल्या सुशांतसिंगने अतिशय अल्प काळात मिळविलेले यश कौतुकास्पद होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेद्वारे आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या सुशांतसिंगने ‘काय पो छे’ द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि अल्पावधीतच तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला. गेल्याच वर्षी (म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर) प्रदर्शित झालेला ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट. त्यामध्ये त्याने खेळकर, बिनधास्त (हॅप्पी-गो लकी) तरुणाची भूमिका फार चांगल्या प्रकारे निभावली होती.

असा हा अभिनेता आपल्या जीवनाचा शेवट असा अनपेक्षितपणे करू शकतो यावर अनेकांचा साहजिकच विश्वास बसला नाही. यानिमित्ताने तरुणांच्या मानसिकतेचा मुद्दा चर्चिला गेला. मृत्यूपूर्वी सुशांतसिंग हा देखील मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार चालू होते असे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. त्या ‘बेचारा’ सुशांतसिंगच्या मानसिक आजाराचे रहस्य काय असावे? त्याचाही शोध घेण्याची गरज आहे. थोडक्यात सुशांतसिंग राजपूत या तरुण अभिनेत्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या सर्वांचीच उत्तरे मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये ‘राजकारण’ आणू नये एवढीच अपेक्षा आहे.

  • श्रीकांत ना. कुलकर्णी, पुणे
    (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.