Red Fort : भारताच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये ‘लाल किल्ला’ हे नाव अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, अनेकांना हे माहीत नाहीये की देशात दोन लाल किल्ला दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे . एक आग्रा येथे आणि दुसरा दिल्लीमध्ये. दोन्ही किल्ले मुघल साम्राज्याच्या कारकिर्दीत बांधले गेले असून, त्यांच्या स्थापत्यशास्त्रात, ऐतिहासिक भूमिका आणि राजकीय महत्त्वामध्ये लक्षणीय फरक आहे.
आग्रा येथील लाल किल्ला:
आग्रा किल्ला, ज्याला ‘लाल किल्ला’ किंवा ‘आग्रा फोर्ट’ देखील म्हणतात, याचे बांधकाम सम्राट अकबरने इ.स. १५६५ मध्ये सुरू केले होते. हा किल्ला यमुना नदीच्या काठी वसलेला असून याला UNESCO चा जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाला आहे. हा किल्ला मुख्यतः संरक्षणाच्या दृष्टीने बांधण्यात आला होता, परंतु पुढे शाहजहानच्या काळात यामध्ये सुंदर महाल, जसे की दिवाने खास, दिवाने आम, मिना बाजार व मक्तबखाना यांचा समावेश झाला. हे ठिकाण म्हणजे मुघल स्थापत्यशास्त्रातील एक उत्कृष्ट नमुना आहे, जिथे हिंदू आणि इस्लामिक स्थापत्यशैलींचा समावेश दिसून येतो.

Red Fort
दिल्ली येथील लाल किल्ला:
दिल्लीतील लाल किल्ल्याचे बांधकाम सम्राट शाहजहानने इ.स. १६३८ मध्ये केले होते. जेव्हा त्याने राजधानी आग्राहून दिल्ली येथे स्थलांतरित केली, तेव्हा यमुना नदीच्या काठी नवीन राजधानी ‘शाहजहानाबाद’ स्थापली आणि त्यासाठी भव्य लाल किल्ल्याची उभारणी केली. हा किल्ला राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचा मानला जातो कारण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर, १५ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आजही प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करतात. त्यामुळे हा किल्ला राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक बनला आहे.
महत्त्वाच्या फरकांची तुलना:
यमुना नदीच्या काठावर दोन्ही किल्ले वसले असले तरी त्यांचा उद्देश, स्थापत्यशैली, ऐतिहासिक घटनांमधील सहभाग वेगळा आहे. आग्रा किल्ला मुख्यतः लष्करी उपयोगासाठी बांधला गेला होता आणि नंतर सम्राटांचे निवासस्थान म्हणून वापरला गेला. तर दिल्लीचा लाल किल्ला राजकीय आणि प्रशासकीय केंद्र होता. स्थापत्याच्या दृष्टीने पाहता, आग्रा किल्ला अधिक पारंपरिक मुघल शैलीचा असून दिल्लीचा लाल किल्ला अधिक नजाकतीने, नक्षीकाम आणि बारीक कारागिरीसह बांधला गेला आहे.(Red Fort)
=========
हे देखील वाचा :
MV Derbyshire : ते जहाज समुद्रात गायब झालं आणि २० वर्षानंतर…
The Lost Bomb : त्या बेटाजवळ अणूबॉम्ब हरवला जो कधीही…
Indian Flag : ध्वजारोहण आणि झेंडावंदनमध्ये हा आहे फरक, 15 ऑगस्टपूर्वी घ्या जाणून
===========
दिल्ली येथील लाल किल्ला राष्ट्रीय इतिहास, स्वातंत्र्य संग्राम व आजच्या प्रजासत्ताक भारताशी थेट जोडलेला आहे, त्यामुळे त्याला अधिक राजकीय आणि राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, आग्रा फोर्टचा ऐतिहासिक दृष्टिकोन आणि स्थापत्य वारसा देखील दुर्लक्षित करता येणार नाही. दोघेही आपापल्या जागी मोलाचे असून, भारताच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार आहेत. तरीसुद्धा, आजच्या काळात दिल्लीचा लाल किल्ला अधिक व्यापक ओळखीचा आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक मानला जातो.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics