Home » रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja): एक शांत योद्धा!

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja): एक शांत योद्धा!

by Team Gajawaja
0 comment
रवींद्र जडेजा Ravindra Jadeja
Share

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) – एक शांत योद्धा! वाचकहो, शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? योद्धा आणि शांत? हे आपल्याला परस्परविरोध वाटलं असेल कारण योद्धे हे अत्यंत भडक डोक्याचे आणि आक्रमक वृत्तीचे असणेच आपल्याला अपेक्षित असते. मग हा योद्धा रणांगणातला असू दे अथवा खेळाच्या मैदानातला. मात्र खेळाच्या मैदानावरील योध्याची आठवण मी आज आपल्याला करून देत आहे. हा योद्धा आहे, पण शांत आहे. म्हणूनच तो लक्षवेधी ठरतो. रवींद्र जडेजा -भारतीय क्रिकेट संघातील अव्वल अष्टपैलू खेळाडू! तर, या रवींद्र जडेजाचा ६ डिसेंबर ला ३३ वा वाढदिवस आहे.त्यानिमित्त त्याला शुभेच्छा.

रवींद्र जडेजाचे नाव भारतीय क्रिकेट विश्वात झळकू लागले ते त्याच्या वयाच्या १६ व्या वर्षांपासून. तो २००६ तसेच २००८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. २००८च्या स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा तो उपकर्णधार होता, तर विराट कोहली कप्तान होता. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. पण जडेजाचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता.

गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात त्याचा जन्म अगदी गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील एका खाजगी एजेन्सीत सुरक्षा रक्षक होते. रवींद्रची क्रिकेटची हौस भागवणे त्यांना जिकिरीचे होते. त्यातच २००५ मध्ये त्याच्या आईचा अकाली मृत्यू झाला त्यामुळे त्याला प्रचंड नैराश्य आले. त्याने क्रिकेट खेळणे सोडून देण्याचा विचार केला होता, पण त्याच्या मोठया बहिणीने त्याला धीर देत त्याला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्याने पहिल्याच रणजी मोसमात सौराष्ट्रातर्फे अष्टपैलू कामगिरी करताना सर्वाधिक विकेट्स घेतल्या त्यामुळे त्याला भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे खुले झाले.

सन २००९च्या पूर्वार्धात त्याची भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाली. त्याच वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध त्याने आपल्या डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर ४बळी मिळवून भारताला सामना जिंकून दिला आणि तो सामनावीर ठरला. त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळेपर्यंत २०१२साल उजाडले.दरम्यानच्या काळात घरेलू क्रिकेटमध्ये तो चमकदार अष्टपैलू कामगिरी सातत्याने करत राहिला. ओरिसाविरुद्ध रणजी सामन्यात त्याने त्रिशतक फाटकावले. त्याला २०१२ च्या इंग्लंडविरुद्धच्या नागपूर कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली.

इंग्लंडच्या केविन पीटरसनचा उडवलेला त्रिफळा अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्याच्या चेंडूचा केवीनला अंदाजच आला नाही आणि त्याने चेंडू खेळायचा प्रयत्नच केला नाही व त्याचा त्रिफळा उडाला. ही तर केवळ सुरुवातच होती. त्याने २०१२-१३ च्या रणजी मोसमात गुजरात व रेल्वे संघांविरूद्ध त्रिशतके झळकावली आणि भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान मिळवले. या मालिकेत त्याने आपल्या डावखुऱ्या फिरकीने अश्विनच्या जोडीने कांगारुंची भंबेरी उडवली.मायकेल क्लार्कला पाच वेळा बाद करून आपले गिऱ्हाईक बनवले.

या मालिकेनंतर जडेजाची कारकीर्द बहरली ती आजतागायत चालूच आहे. ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत जडेजाने ५६ कसोटीत २१९५धावा काढल्या आहेत, तर २२८ विकेट्स घेतल्या आहेत. १६८एकदिवसीय सामन्यात त्याने १८८ विकेट्स घेतल्या असून २४११ धावा फटकावल्या आहेत.

जडेजाची खासियत म्हणजे त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी. तो बेदी,शिवलकर,गोयल यांच्यासारखा कलावंत नाही मात्र तेवढाच परिणामकारक आहे. तो जेमतेम दोन पावलांचा स्टार्ट घेतो आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर धावा काढणे कठीण जाते. तो चेंडूला अजिबात उंची देत नाही. त्याचे जास्तीत जास्त बळी हे पायचीत किंवा त्रिफळाबाद आहेत. 

नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने हसीब हमीदला दोन वेळा त्रिफळाबाद केले तेव्हा चेंडू लेग स्टंप वरून इतका वळला की हसीबला फिरकीचा अंदाजच  आला नाही. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत त्याने स्टंपमध्ये अचूक गोलंदाजी करून तीन फलंदाजांना पायचीत पकडले.

गोलंदाजीबरोबरच तो फलंदाजी पण गाजवतो. सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर येऊन त्याने अनेकवेळा भारताचा डाव सावरला आहे. २०१८ च्या इंग्लंडमधील मालिकेत त्याला शेवटच्या कसोटीत संधी मिळाली. त्याने तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन अप्रतिम नाबाद ८६ धावा काढताना भारताला इंग्लंडच्या धावसंख्येचा अगदी जवळ पोहोचवले होते. न्यूझीलंडविरुद्ध कानपुर कसोटीत श्रेयस अय्यर बरोबर शतकी भागी करताना भारताचा डाव सावरला. अलीकडे तो अधिक तंत्रशुद्ध फलंदाजी करत असल्याने त्याची विश्वासार्हता वाढली आहे. 

अर्धशतक/शतक पूर्ण केल्यावर तो तलवारीसारखी बॅट फिरवून आपण क्षत्रिय राजपूत योद्धा असल्याचे दाखवून देतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ त्रिशतके मारून सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केल्याने त्याला धोनीने ‘सर’ असे विनोदाने म्हणायला सुरवात केली. जडेजा हा विराटसारखाच भारताचा अव्वल क्षेत्ररक्षक आहे.त्याचा पिक अप आणि थ्रो एका एक्शनमध्ये होतो.

सन २०१३ च्या चॅम्पिअनशिप ट्रॉफीच्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने पिटर्सनला धावबाद करताना जी चपळता दाखवली ते दृश्य वारंवार टीव्ही वर दाखवले जात होते. त्याने बॅकवर्ड पॉइंटहून,फक्त एक स्टंप दिसत असताना,थेट अचूक फेक करून अनेक फलंदाजांना धावचीत केले आहे. त्याने सीमारेषेजवळ अनेक अशक्यप्राय झेल घेतले आहेत. २०२० च्या न्यूझीलंडमधील मालिकेत पहिल्या कसोटीत वॉटलिंगचा उंच उडालेला झेल घेताना त्याने स्वतःच्या मागे उंच उडी मारून एक हातात झेल पकडला तो न्यूझीलंडमध्ये घेतलेला सर्वोत्तम झेल असावा असे समालोचक म्हणत होते. जडेजाने सोडलेला एकच झेल मला आठवतो. त्याने २०१४ च्या इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीत स्लिपमध्ये आलेस्टर कूकचा त्यामानाने सोपा असलेला झेल सोडला होता तो पंकज सिंगच्या गोलंदाजीवर.

मैदानात शांत असलेला जडेजा मैदानाबाहेर मात्र स्पष्टवक्ता आहे.संजय मांजरेकरने त्याला डिवचल्यावर त्याने त्याला फटकारले की त्याने मांजरेकरपेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. विवाहित जडेजाला एक मुलगी असून राजकोटला त्याचे ‘जाडूज’हे रेस्टारंट प्रसिद्ध आहे.

मैदानात योध्याप्रमाणे लढताना अत्यंत शांत असलेल्या जडेजापुढे अजून उज्वल भविष्य आहे आणि तो अजून पराक्रमाची नवनवीन शिखरे सर करील याबाबत तिळमात्र शंका नाही.

रघुनंदन भागवत

(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.

हे नक्की वाचा: यह तो होना ही था…

व्यक्तिविशेष: अजित आगरकर(Ajit Agarkar): पूर्ण न उमललेले फुल

इतर: भारतातून टेनिस हरवले आहे का ?


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.