सत्तेत आल्यापासून महायुतीत इनकमिंग जोरात सुरू आहे, त्यातही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जास्त. आता काँग्रेसचं पुण्यातील मोठ नाव रवींद्र धंगेकर सुद्धा हाती धनुष्यबाण घेणार आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण काँग्रेस सोडत असल्याचा निर्णय धंगेकरांनी जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. धंगेकरांच्या एंट्रीमुळे शिवसेनेला काय फायदा होणार ? शिवसेनेत जाऊन धंगेकरांना काय फायदा होणार? आणि धंगेकरांनी काँग्रेस का सोडली ? हे सर्व जाणून घेऊ. (Ravindra Dhangekar)
शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना असा धंगेकरांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली. जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा धंगेकर यांनी सुद्धा शिवसेना सोडली आणि मनसेत प्रवेश केला. तिथे ते नगरसेवक सुद्धा झाले. पुढे २००९ साली मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत धंगेकरांचा भाजपाच्या गिरीश बापट यांनी ७ हजार मतांनी पराभव केला. पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडूनच त्यांनी निवडणूक लढवली. पण यावेळी त्यांची लोकप्रियता आणखी कमी झाली आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. नंतर धंगेकरांचं मन मनसेत रमलं नाही. त्यानंतर त्यांनी तत्कालीन भाजपा राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भेट घेऊन भाजपामध्ये पक्ष प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण कसबा मतदारसंघातून काही पदधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला. (Political News)
मग २०१७ साली त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांना कसबा मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने तेव्हा अरविंद शिंदेंना उमेदवारी दिली. ज्यांचा भाजपाच्या मुक्ता टिळक यांनी पराभव केला. पण २०२३ साली मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना संधी मिळाली. त्यांनी या संधीचं सोन केलं. रवींद्र धंगेकर ११ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. धंगेकरांची लोकप्रियता बघता महाविकास आघाडीने २०२४ मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यातून उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांनी जवळ जवळ १ लाख २३ हजार मतांनी पराभव केला. त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी त्यांनी कसबा पेठ मतदारसंघातून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना भाजपा उमेदवार हेमंत रासणे यांनी १९ हजार मतांनी पराभूत केलं. (Ravindra Dhangekar)
आता काही दिवसांआधी त्यांनी गळ्यात भगवा घातलेला फोटो स्टेट्सला ठेवला आणि रवींद्र धंगेकर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा होऊ लागल्या, त्यातच त्यांनी शिंदेची भेट सुद्धा घेतली आणि आज पत्रकार परिषद घेत त्यांनी शिवसेनेतील पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे. “एखादा पक्ष सोडताना दु:ख होतं याचं कारणच नाही, शेवटी आपण माणूस आहे. कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून ऐकत नव्हते. मी मतदारांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं, आता आमची कामं कोण करणार, तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील’. मात्र, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत. याच काळात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तसेच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चेहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे. त्यानंतर आमचा जो निर्यय होईल तो जाहीर करू. “ असं ते या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. (Political News)
==============
हे देखील वाचा : America : अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाही देश सोडावा लागणार !
==============
थोडक्यात काँग्रेसमध्ये कोणाशी नाराजी असल्यामुळे नाही, तर मतदारसंघातील लोकांशी कार्यकर्त्यांशी चर्चाकरून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शिवसेनेला चांगला फायदा होऊ शकतो. पुण्यात शिवसेनेकडे हवा तसा चेहरा नाही. त्यामुळे धंगेकरांना पुण्यात शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व करण्याची उत्तम संधी मिळू शकते. शिवसेना सध्या सत्तेत असल्यामुळे त्यांना सत्ताधारी असण्याचे फायदे देखील मिळू शकतात. धंगेकरांना विधानसभा आणि लोकसभेला मिळालेली मतं बघता आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकर शिवसेनेला फायदेशीर ठरू शकतात. पुण्यात महापलिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याचं काम धंगेकर करू शकतात. पुणे तसं भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व असलेली जागा आहे. एकनाथ शिंदेंना पुण्यात पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्याची संधी आहे. धंगेकरांमुळे शिंदेची शिवसेना पुण्यात ऍक्टिव्ह होऊ शकते. किंवा हाच एकनाथ शिंदे यांचा प्लॅन असू शकतो. (Ravindra Dhangekar)
रवींद्र धंगेकर यांच्या पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. पण शिवसेनेसाठी रवींद्र धंगेकर, आणि रवींद्र धंगेकरांसाठी शिवसेना किती फायद्याची ठरेल हे येत्या काळात स्पष्ट होईल.