Home » तोंड सांभाळून बोला नाहीतर…

तोंड सांभाळून बोला नाहीतर…

by Team Gajawaja
0 comment
Ravindra Chavan
Share

राज्यात निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशा केवळ विरोधी पक्षांमध्येच नाही तर मित्रपक्षांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असाच एक सामना पाहायला मिळाला शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुंबई- गोवा महामार्ग १४ वर्षांत झाला नाही हा मुद्दा उकरून काढत थेट भाजप मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेतलं. एवढेच नव्हे तर त्यांनी थेट रविंद्र चव्हाण यांचा ‘ कुचकामी ‘, ‘ चमकोगिरी ‘ करणारे असा उल्लेख करत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला. रामदास कदम स्टाईलमध्ये खालच्या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. रामदास कदम यांची आक्रमक भूमिका पाहता भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल का? की नेहमीप्रमाणे ताकीद देऊनच प्रकरण शांत केलं जाईल याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन सिक्सर मारला. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)

‘’राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न नॅशनल हायवे ऑथेरिटी अंतर्गत येतो. टाळ्या वाजवणारेही अडाणी असावेत. रामदास कदम १५ वर्ष स्वत: मंत्री होते. ३० वर्ष शिवसेनेत नेते होते, काय केले त्यांनी?” असं प्रत्युत्तर रविंद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिले. मात्र चव्हाण एवढ्यावरच थांबले नाहीत. “मलाही बोलायला येतं. बोलायला समोरासमोर या. कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा ! कशा भाषेत बोलतात ते दाखवतो.रविंद्र चव्हाण आहे मी. रविंद्र चव्हाणसारखं उत्तर देऊ शकतो. पण मी युती धर्म पाळतो. याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेले आणि मी ऐकून घेईन. होणार नाही असं. तोंड सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही.” असा सज्जड दम रविंद्र चव्हाणांनी कदमांना भरला.

महत्वाचं म्हणजे, एरवी राजकारण आणि सत्तेत राहूनही अत्यंत शांत, संयमी राजकारण करणारे रविंद्र चव्हाण हे आपण भले आणि जनतेचं काम करणं भलं या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळायचं. मात्र, ज्या शब्दात त्यांनी रामदास कदमांना दम भरला आहे, त्याची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. मात्र, रामदास कदमांना रविंद्र चव्हाणांनी दिलेला इशारा हा केवळ तोंडीच असणार नाही. रविंद्र चव्हाणांची गेल्या काही वर्षात वाढलेली ताकद पाहता, रामदास कदमांना हा इशारा चांगलाच महागात पडू शकतो. त्यामुळे रविंद्र चव्हाणांवर टीका करून रामदास कदमांनी स्वतःची संपूर्ण राजकीय कारकीर्दच धोक्यात आणली आहे. रामदास कदमांचा खरा राग आहे कोकणात गेल्या काही वर्षात भाजपच्या वाढलेल्या ताकदीचा आणि त्यामध्ये असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या योगदानाचा. रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा आहे. भाजपच्या युवा मोर्च्याच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या रविंद्र चव्हाणांना 2014 व त्यानंतर 2019 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी त्यांना सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)

दरम्यान, 2016 साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या 4 खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. राज्यमंत्री असताना पण विविध लोक उपयोगी निर्णय घेऊन त्यांनी अपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. पुढे अजून बढती मिळून 2022 मध्ये त्यांना पुन्हा एकदा शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री हे अत्यंत महत्वाचे मंत्रीपद मिळाले. सोबतच रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. या संपूर्ण कार्यकाळात रविंद्र चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील एक महत्वाचे नेते म्हणूनही पुढे आले. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)

कोकणाची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे दिली गेली. अजून एक गोष्ट म्हणजे नारायण राणे यांना पक्षात घेतल्यानंतर भाजपाला कोकणात नवी उभारी मिळेल अशी भाजपाला आशा होती. मात्र राणे पक्ष, संघटना वाढवायला सातत्याने अपयशी ठरत होते. अशावेळी कोकण जिंकण्याची कामगिरी रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली होती. रविंद्र चव्हाण यांच्या झंझावातामुळे भाजप पक्षसंघटना सिंधुदुर्ग पासून पालघर पर्यंत मजबूत झाली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि लोकांच्या डायरेक्ट संपर्कात राहण्याच्या स्वभावामुळे स्थानिक पातळीवरचे आणि तळागळातील लोक भाजपाशी जोडले गेले. त्यामुळे कोकण पट्ट्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला. अलिकडेच नारायण राणे यांनीसुद्धा म्हटले होते की, माझ्या विजयात रविंद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)

त्याशिवाय, कोकणात मोठ्या प्रमाणात निधी वाटपातही रविंद्र चव्हाण यांचा मोठा हात राहिला आहे. अगदी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघासह कोकणातील प्रत्येक मतदारसंघातील विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी रविंद्र चव्हाणांनी आणला आहे. त्यामुळे वाडीवाडीत पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले. कोकणातील पूर्वापार पद्धतीने चालत आलेल्या सांकव पद्धतीत काळानुसार बदल करून पक्के साकव उभारले गेले. ज्यामुळे भाजपचं संघटन आणि रविंद्र चव्हाण हे नाव अगदी कोकणातल्या गावागावांत पोहचलं. याची धास्ती विरोधी पक्षातल्या नेत्यांबरोबरच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही घेतली. निलेश राणे यांनी तर राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. रविंद्र चव्हाण यांची वाढती ताकद हे यामागील कारण असल्याचं बोलल गेलं. अखेर फडणवीसांनी निलेश राणेंची समजूत काढली होती. मात्र, यामुळे रविंद्र चव्हाण यांची ताकद पुन्हा एकदा हायलाइट झाली, त्यामुळेच लोकसभेलाही रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा झाली होती. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)

रामदास कदम हे पूर्वीपासूनच स्वत:चं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी इतरांवर अर्वाच्च भाषेत टीका करत आले आहेत. २००५ साली, जेव्हा नारायण राणे शिवसेनेत बंड करून कॉँग्रेसमध्ये जाणार होते, तेव्हा रामदास कदमही त्यांच्या सोबत होते. स्वतःच्या फायद्याचा विचार करून, त्यांनी या बंडातून यू-टर्न मारला, अशी चर्चा तेव्हा झाली होती. नंतर सरकार मध्ये विरोधी पक्षनेते बनल्यावर नारायण राणेंवर अर्वाच्च भाषेत टीका केली होती. त्यानंतर, २०२२ मध्ये शिवसेनेत पुन्हा बंड झाल्यावर, रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबीयांसाठीसुद्धा अर्वाच्च भाषा वापरली होती. त्यामुळे चर्चेत येण्यासाठी ते असं करतात का, असा प्रश्न निर्माण होत आहे. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)

महत्वाचं म्हणजे रामदास कदम यांचं राजकीय भविष्य स्ट्रॉंग राहिलं नाहीये. त्यामुळेच खेडमधून राजकारण करणारे रामदास कदम या वेळी त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी मुंबईतून खासदारकीचं तिकीट मागत होते, मात्र ते काय त्यांना मिळवता आलंच नाही. सोबतच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जेष्ठ नेते म्हणून जरी त्यांचा उल्लेख होत असला तरी, शिंदेंनी ‘ नेते’ पद सोडलं तर कोणतंच मोठं पद रामदास कदमांना दिलेलं नाही. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आलं होतं. अशावेळी दापोलीत असलेली जागा वाचवणे हेच रामदास कदमांपुढील चॅलेंज आहे. या जागेवर सध्या रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)

======

हे देखील वाचा : अजित पवार – हताश की हुशार?

======

मात्र इथंही योगेश कदम पर्यायाने रामदास कदम यांची पूर्ण पकड नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, दापोली आणि खेड या तीन उत्तरेकडच्या तालुक्यांचा मिळून दापोली विधानसभा मतदारसंघ तयार होतो. 2009 पूर्वी या मतदारसंघात फक्त मंडणगड आणि दापोली हे तालुके यायचे, मात्र 2009 च्या मतदारसंघ फेररचनेत रामदास कदमांचं संस्थान खालसा झालं. खेड मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्याचा निम्मा भाग गुहागर आणि निम्मा दापोली मतदारसंघाला जोडण्यात आला. तेव्हापासून इथे रामदास कदमांची पकड लूज होताना दिसली. महत्वाचं म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दापोलीतून कदमांना जोरदार झटका बसला होता. कारण मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला २५ हजार लीड दिला नाही तर राजकारण सोडून देण्याची घोषणा योगेश कदमांनी केली होती. मात्र प्रत्यक्ष लढतीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे पाच हजरांपेक्षा जास्त मतांनी मागे पडले. त्यामुळे योगेश कदम यांच्यासाठी ही धोक्याची घंटा समजली जाते. सोबतच जर कदमांना जमत नसेल तर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणीही काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशावेळी आपलं उपद्रव्य मूल्य वाढवून मतदारसंघ टिकवण्यासाठी रामदास कदम अशी भाषा वापरत असल्याचं बोललं जातं. मात्र टीका करताना रविंद्र चव्हाण पर्यायाने भाजपाची नाराजी कदमांनी ओढवून घेतली आहे ज्याची किंमत त्यांना विधानसभेत मोजावी लागू शकते. (Ravindra Chavan VS Ramdas kadam)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.