उद्योग जगतातील कोहिनुर अशी ओळख असलेल्या रतन टाटा यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी टाटा समूहामध्ये काम करताना या समूहाचा मोठा विस्तार केला आणि ‘टाटा’ हे नाव अत्युच्च शिखरावर पोहचवले. आपल्या हुशारीने त्यांनी त्यांच्या घराण्याचा व्यवसाय मोठा केला आणि यश मिळवले. रतन टाटा यांनी नेहमीच आयुष्यात यशाची शिखरं पादाक्रांत करताना आपले पाय जमिनीवरच ठेवले. ते नेहमीच आपण या समाजाप्रती काही देणं लागतो या मताचे होते. त्यामुळे त्यांनी अगणित सामाजिक कार्यांमध्ये आपला सहभाग नोंदवला.
एकीकडे व्यवसाय, काम करताना दुसरीकडे त्यांनी समाजाप्रती, समाजातील गरजू लोकांप्रती अनेक उत्तम कार्य केले. नुसते माणसं नाही तर त्यांनी भूतदया देखील दाखवत समाजातील प्राण्यांबद्दल देखील काम करत आपली आत्मीयता दाखवली. रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर आता सगळ्यांनाच एक मोठा प्रश्न पडला आहे आणि तो म्हणजे टाटा यांच्यानंतर या वैभवाचा वारसदार किंवा उत्तराधिकारी कोण?
रतन टाटा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये टाटा समूहाला मोठमोठे यश मिळवून दिले. त्यांनी ३,८०० कोटींची संपत्ती निर्माण केली आहे. आता हा एवढा मोठा वटवृक्ष आणि एवढे मोठे वैभव आता कोण सांभाळणार आणि कोण हा वारसा पुढे नेणार? याबद्दल सध्या टाटा कुटुंबातील काही नावं चर्चेत आहेत.
रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूह कोण सांभाळणार हा प्रश्न आज नाही तर याआधी देखील अनेकदा बऱ्याच लोकांना पडला असेल. रतन टाटा हे अविवाहित होते. त्यांनी कधीही विवाह केला नाही त्यामुळे त्यांना मुलंबाळं देखील नाहीत. याचसाठी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांची चर्चा होती. रतन टाटांनी टाटा सन्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर २०१७ पासून ते आजपर्यंत एन. चंद्रशेखर हे या कंपनीचे चेअरमन म्हणून कारभार पाहत आहेत. सोबतच टाटा समुहातील इतर कंपन्या टाटांच्या कुटुंबातील इविध सदस्य चालवत आहे. याशिवाय टाटांचे अनेक निकटवर्तीय आहेत जे टाटाच्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
रतन टाटा यांनी याविषयीची व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती. सायरस मिस्त्री यांच्या निवडीवरून झालेल्या वाद त्यांनी पाहिला आणि त्यानंतर रतन टाटा यांनी खूप काळजी घेतली. टाटा कुटुंबातील अनेक सदस्य हा वारसा मोठ्या धीराने पुढे नेऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांच्याकडे हा वारसा येऊ शकतो. त्यांचे नाव सर्वात पुढे आहे. यासोबतच नोएल टाटा यांची तीन मुलं माया, नेव्हिल, लेआ टाटा हे देखील उत्तराधिकारी असू शकतील.
नोएल टाटा
रतन टाटांच्या संभाव्य वारसदार म्हणून नोएल टाटा यांचे नाव सर्वात पुढे आहे. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांची दुसरी पत्नी असलेल्या सिमोन यांचे पुत्र नोएल टाटा हे भविष्यात टाटा समुह सांभाळताना दिसू शकतात. नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत.
माया टाटा
नोएल टाटा यांची कन्या ३४ वर्षीय माया टाटा सध्या टाटा समुहात महत्त्वाच्या पदावर काम करत आहे. त्यांनी Bayes Business School आणि University of Warwick मधून शिक्षण घेतले असून त्या टाटा अपॉर्च्युनिटिज फंड आणि टाटा डिजीटलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. Tata Neu अॅप लाँच करण्यातही माया महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.
नेविल टाटा
नोएल टाटांचा मुलगा ३२ वर्षीय नेविल टाटा देखील टाटा समूहामध्ये कार्यरत असून ते स्टार बाझारचे प्रमुख आहेत. ही कंपनी हायपरमार्केट चेन ट्रेंट लिमिटेड अंतर्गत येते. नेविल यांनी टोयोटा किर्लोस्कर समुहाच्या मानसी किर्लोस्कर यांच्याशी विवाह केला आहे. नेविल हे देखील टाटा समूहाचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त होऊ शकतात.
=======
हे देखील वाचा : जाणून घ्या रतन टाटांची कारकीर्द
=======
लीह टाटा
नोएल टाटांची सर्वात मोठी मुलगी ३९ वर्षीय लीह टाटा या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करत आहेत. त्यांनी स्पेनमधील IE बिझनेस स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केले असून त्या ताज हॉटेल्स आणि रिसॉर्ट, पॅलेसेसचा कारभार पाहत आहेत. लीह टाटा यांनी हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये टाटा समुहाची उंची वाढवण्याचं काम केलं आहे.