भारतातील अतिशय हुशार, चाणाक्ष, दूरदृष्टी असणारे उद्योजक रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईमध्ये दुःखद निधन झाले आहे. ते निष्णात उद्योजक असण्यासोबतच एक उत्तम व्यक्ती देखील होते. रतन टाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये टाटा समूहाला यशाच्या अत्युच्च शिखरापर्यंत नेण्याचे काम केले. रतन टाटा यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश करत टाटा समूहाचा यशस्वी विस्तार केला. आज मिठापासून ते दागिने, गाड्यां, विमानांपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये ‘टाटा’चे नाव घेतले जात आहे. याचे संपूर्ण श्रेय रतन टाटा यांनाच जाते. जाणून घेऊया रतन टाटा यांच्या कुटुंबाबद्दल.
टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा विवाह हीराबाई डब्बू यांच्याशी झाला होता. या दोघांना डोराभजी टाटा आणि रतनजी टाटा ही दोन मुलं होती. डोराभ जी टाटा हे देखील वडिलांप्रमाणे बिजनेसमॅन होते. १९०४ ते १९२८ पर्यंत ते टाटा ग्रुपचे चेयरमन होते. डोराभ जी टाटा यांचे लग्न मेहरबाईशी १८९६ मध्ये झाले. पण त्यांना मुलबाळ नव्हते.
जमशेद जी टाटा यांचे दुसरे अपत्य होते रतन जी दादा टाटा. १८५६ मध्ये नवसारी येथे रतन जी दादा टाटा यांचा जन्म झाला. १९२८ ते १९३२ ते टाटा ग्रुपचे चेयरमन होते. त्यांनी सुनी नावाच्या फ्रान्सच्या महिलेसोबत लग्न केले होते. नंतर त्यांचे नाव नवजबाई ठेवण्यात आले. १८९२ साली दोघे विवाह बंधनात अडकले. या दोघांना सुद्धा मुलबाळ नव्हते. त्यांनी एक मूल दत्तक घेतले आणि त्याचे नाव ठेवले नवल टाटा.
नवल टाटा यांनी दोन लग्न केली. त्यांनी पहिले लग्न केले सुनी यांच्यासोबत. त्यांना दोन मुलं झाली. रतन टाटा आणि जिम्मी टाटा. रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. त्याचप्रमाणे जिम्मी यांनी सुद्धा लग्न केले नाही. नवल टाटा आणि सूनी यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन नावाच्या महिलेसोबत लग्न केले. पुढे त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव नोएल टाटा. रतन टाटा आणि नोएल टाटा हे सावत्र भाऊ.
रतन टाटा यांनी आजीवन लग्न केले नाही. त्यांनी लग्न केले नसले तरी त्यांचे कुटुंब मोठे आहे. रतन टाटा १० वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील वेगळे झाले. त्यानंतर त्यांना त्यांची आजी नवाझबाई टाटा यांनी जीन पेटिट पारसी अनाथाश्रमातून औपचारिकपणे दत्तक घेतले आणि त्यांचा सांभाळ केला. रतन टाटा हे त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासोबतच लहानाचे मोठे झाले.
=======
हे देखील वाचा : जाणून घ्या रतन टाटांची कारकीर्द
=======
रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी चार वेळा लग्नाचा विचार केला, लग्नाच्या निर्णयापर्यंत ते आले असतानाच भीतीमुळे आणि इतर कारणांमुळे त्यांनी लग्न करण्याचा विचार बदलला. एकदा लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना टाटा एका मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यांची गाडी पुढे सरकणार तोच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या आजारपणामुळे रतन टाटा यांना भारतात यावे लागले. त्या मुलीच्या पालकांनी तिला भारतात जाऊ दिले नाही. त्यानंतर रतन टाटांनी लग्न करण्याचा विचार सोडला. ते आजन्म अविवाहित राहिले.