Home » पाकिस्तानच्या संसदेत मांजरींची युक्ती

पाकिस्तानच्या संसदेत मांजरींची युक्ती

by Team Gajawaja
0 comment
Rat VS Parliament of Pakistan
Share

भारतामध्ये दहशतवादी पाठवणा-या पाकिस्तानला सध्या एका वेगळ्याच समस्येनं ग्रासलं आहे. आर्थिक परिस्थितीनं बेजार झालेल्या पाकिस्तानच्या संसदेत चक्क उंदरांचा वावर वाढला आहे. ही उंदरांची संख्या एवढी आहे की तिथे बसणंही खासदारांसाठी धोकादायक झालं आहे. या उंदरांनी महत्त्वाची कागदपत्रही खाऊन टाकली आहेत. उंदरांना पकडण्याचे सर्व प्रयत्न करुन झाल्यावर आता पाकिस्तान सरकारनं उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकार १२ लाख रुपये खर्च करणार आहे. पाकिस्तान आर्थिक दृष्ट्या डबघाईला आला आहे. सरकारी कर्मचा-यांचा पगार द्यायलाही पैसे नाहीत. पण अशावेळी सरकार मांजरींवर १२ लाख रुपये खर्च करणार आहे, म्हणून ओरड सुरु झाली आहे. मात्र सरकारी कागदपत्र अधिक महत्त्वाची आहेत, उंदरांपासून ती वाचवायची असतील तर मांजरी हव्यातच असे पाकिस्तानी सरकारचे म्हणणे आहे. या उंदरांना पकडण्यासाठी ज्या मांजरी नेमण्यात येणार आहेत, त्यांना खास प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. बाकी काही नाही, पण याच पाकिस्तानच्या निर्णयावर आता सोशल मिडियामध्ये मेसेज सुरु झाले आहेत. ज्या पाकिस्तानला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची सवय आहे, त्यांच्यावर आता मांजरींना शिकवण्याची वेळ आल्याची खिल्ली उडवण्यात येत आहे. (Rat VS Parliament of Pakistan)

पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्ताननं पुन्हा एकदा जगभर आपले हसू करुन घेतले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. लोकांकडे अन्नासाठी पैसे नाहीत, सरकार कर्जाखाली आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजाही सरकारला पुरवता येत नाहीत. स्वयंपाकघरातील नित्याच्या सामुग्रीची किंमत आभाळाला पोहचली आहे. मात्र या सर्वांकडे वेळ द्यायला सरकारला वेळ नाही. तर शाहबाज सकारला सध्या वेगळ्याच समस्येनं त्रस्त केलं आहे. ही समस्या म्हणजे, पाकिस्तानी संसदेत वाढलेल्या उंदरांची संख्या. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणा-या पाकिस्तानी संसदेत या उंदरांची दहशत आहे. त्यामुळे सर्वच खासदार आणि संसदेतील कर्मचारी हैराण झाले आहेत. या समस्येचा निपटारा करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. मात्र उंदरांची संख्या कमी झाली नाही.

अखेर शाहबाज सरकारनं या उंदरांचा बंदोबस्त कऱण्यासाठी मांजरींना कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संसदेत १२ लाखांचे बजेटही मांडण्यात आले. या योजनेअंतर्गत काही खास प्रशिक्षित मांजरांना संसदेच्या संकुलात ठेवण्यात येणार आहे. उंदरांनी अनेक महत्त्वाचा फायली कुरतडल्या असून त्यामुळे अनेक महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली आहेत. शिवाय या उंदरांनी संसदेतील अनेक वायरीही कुरतडल्या आहेत. तसेच संगणक आणि लॅपटॉपलाही त्यांनी नुकसान केले आहे. त्यामुळे संसदेतील कर्मचारी अधिक हैराण झाले आहेत. उंदरांना पकडण्यासाठी वा मारण्यासाठी अन्य कुठलाही मार्ग हा अधिक महागडा होता. त्या बदल्यात मांजरांना संसदेच्या आवारात तैनात ठेवणे हे कमी पैशात होणार असल्यामुळे पाकिस्तानच्या सर्व खासदारांनी या योजनेला मंजूरी दिली आहे. उंदरांचा नायनाट करण्यासाठी खासगी तज्ज्ञांची मदतही घेण्यात येणार आहे. शिवाय विशिष्ट सापळेही संसदेच्या आवारात ठेवण्यात येणार आहेत. (Rat VS Parliament of Pakistan)

======

हे देखील वाचा : पाकिस्तानातील नागरिकांना आता अन्नासाठी घ्यावे लागतेय कर्ज

======

पाकिस्तानी संसदेतील या उंदरांबाबत मजेशीर गोष्ट म्हणजे, या उंदरांची सर्वाधिक संख्या ही संसदेच्या पहिल्या मजल्यावर आहे. याच मजल्यावर विरोधी पक्षनेत्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांना उंदरांचा फटका बसला आहे. यासंदर्भात नॅशनल असेंब्लीचे प्रवक्ते जफर सुलतान यांनी, संसद भवनात इतके उंदीर आहेत की त्यांना पाहून मांजरीही घाबरतात, असे चक्क बीबीसीच्या बातम्यांमध्ये सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार संध्याकाळी कोणी नसताना उंदीर मॅरेथॉन असल्यासारखे धावतात. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची सवय झाली आहे, पण जेव्हा कोणी पहिल्यांदा इथे येताता ते मात्र घाबरतात. यावरुन पाकिस्तानच्या संसदेतील उंदरांच्या संख्येची कल्पना येते. याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्येही जाहिराती देऊन झाल्या आहेत. उंदरांवर कारवाई करण्यासाठी पेस्ट कंट्रोल कंपनी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आतापर्यंत केवळ दोनच कंपन्यांनी ही समस्या सोडवण्यात रस दाखवला आहे. त्याला कारण म्हणजे, सरकारकडून याबाबत रोख रक्कम येईल की नाही, याची खात्री संबंधित कंपनीला नाही. एकूण काय दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणा-या पाकिस्तानवर आता उंदरांना घाबरण्याची वेळ आली आहे. (Rat VS Parliament of Pakistan)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.