स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट‘ या शोवरून सध्या वादळ सुरु आहे. अनस्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म या नावाखाली चालू असलेला हा शो वादग्रस्त कंटेंटसाठी अधिक प्रसिद्ध झाला आहे. इंडियाज गॉट लेंटेट या समय रैनाच्या शोमध्ये जज म्हणून काही व्यक्ती उपस्थित असतात आणि ते स्पर्धकाला काहीही करायला सांगतात. या काहीहीपैकी बहुतांशी प्रकार हे अश्लिल असतात. यावर आत्ताच नाही, तर यापूर्वीही अनेकवेळा टिका कऱण्यात आली आहे. अलिकडे तर या शोमध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावरुन प्रश्नउत्तरे झाली. ज्या भागावरुन सध्या वाद सुरु आहे, त्यात समय रैना सोबत लोकप्रिय युट्यूबर रणवीर इलाहाबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्वा उपस्थित होते. यात विनोद करता करता रणवीर इलाहाबादियाने स्पर्धकांना त्यांच्या पालकांच्या लैंगिक संबंधावरुन प्रश्न विचारला. (Ranveer Allahabadia)
अर्थात स्पर्धकही त्याच धाटणीतले असल्यामुळे त्यांनीही त्याबाबत सडेतोड उत्तरं दिली. हा भाग प्रदर्शित झाल्यावर मात्र त्यावर प्रचंड गदारोळ सुरु झाला. ज्यानं प्रश्न विचारला तो रणवीर इलाहाबादिया हा लोकप्रिय युट्युबर आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक श्रीमतं युट्युबर म्हणून रणवीर इलाहाबादिया याचे नाव घेतले जाते. पण हिच लोकप्रियता डोक्यात गेली की काय होतं, याचं उदाहरण या रणवीरनं दिलं आहे. आपण काय चूक केली याची त्याला जाणीवही झाली नव्हती. कारण या शो च्या दरम्यान अश्लिल विनोद केल्याचे समाधान घेत, त्यानं आनंद व्यक्त केला होता. (Entertainment News)
आता त्याच्यावर आणि पर्यायानं या शो वर होत असलेल्या टिकेमुळे त्यानं सोशल मिडियावर माफी मागितली आहे. मला विनोद करता येत नाही, विनोद करतांना माझ्याकडून चुकी झाली, असा त्याच्या माफीचा आशय आहे. मात्र रणवीर इलाहाबादियाच्या निमित्तानं या संपूर्ण शोवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. स्टँड-अप कॉमेडियन असलेल्या समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये आत्तापर्यंत अनेक आक्षेपार्ह विनोद झाले आहेत. अगदी त्यात सामिल होणा-या स्पर्धकांच्या शरीरावरुन आणि कपड्यांवरुनही. याबाबत आवाज उठवण्यात येत होता. मात्र त्याला पुरेसा पाठिंबा मिळत नव्हता. आतातरी या शोची पूर्ण पाहणी करुन त्याची परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी होत आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका भागावरुन सुरु झालेला वाद आता मंत्रालयापर्यंत गेला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (Ranveer Allahabadia)
रणबीर इलाहाबादियाने पालकांबद्दल केलेल्या अश्लील टिप्पण्यांबद्दल हिंदू आयटी सेलने तक्रार दाखल केली आहे. सोशल मिडियातही या शोमध्ये होत असलेल्या अन्य आक्षेपार्ह गोष्टींबद्दलची माहिती येत आहे. शिवाय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे या शो ची तक्रार करण्यात आली आहे. या टिकेचे मुख्य लक्ष रणवीर अलाहाबादिया आहे. युट्यूबर असलेल्या रणवीरनं विचारलेले अश्लिल प्रश्न ऐकून वयोवृद्धानी नाही तर तरुणांनीही नाराजी व्यक्त केली आहे. प्रसिद्धिच्या शिखरावर असलेल्या रणवीरच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेल्याचेही मेसेज सोशल मिडियावर आहेत. आता या सर्वांची मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. मात्र इंडियाज गॉट लेटेंट हा शो अशाच मार्गातून लोकप्रिय झाल्याचे स्पष्ट आहे. या शोची स्क्रिप्ट ही आधी तयार नसते. यात सामिल होणारे स्पर्धक स्टेजवर आल्यावर उपस्थित परिक्षकांचे पॅनल त्यांच्या मनात येतील ते प्रश्न स्पर्धकांना विचारतात. यातूनच या शो मध्ये अनेकवेळा अश्लिल विनोद झाले आहेत. (Entertainment News)
=============
हे देखील वाचा : वयाच्या चाळीशीत आरोग्याची अशी घ्या काळजी, हृदयासह संपूर्ण हेल्थ राहिल फिट
America : चिंता वाढली गायींमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव !
=============
समय रैना हा एक स्टँड-अप कॉमेडियन आणि युट्यूबर आहे. त्याच्या या शो मध्ये याधीही भारतीय संस्कृतीवर विनोद करण्यात आलेला आहे. ज्याच्या प्रश्नावरुन या शोमध्ये गोंधळ झाला आहे, तो रणवीर अलाहबादिया हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. नेतृत्व प्रशिक्षण, प्रेरक पॉडकास्ट यासाठी त्याची ओळख आहे. त्याच्या पॉडकास्टमध्ये आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. अनेक बॉलिवूड, टॉलिवूड स्टार्सही त्याच्या युट्यूबवर दिसले आहेत. रणवीर काही वर्षापूर्वी डिप्रेशनच्या चक्रात अडकला होता. त्यातून तो कसा बाहेर पडला याचा एक एपिसोडही त्यानं आपल्या चॅनेलवर शेअर केला आहे. मात्र रणवीरला हे यश सहजासहजी पचवता येत नसल्याचे आता त्याच्या कमकुवत विनोद बुदधीवरुन स्पष्ट होत आहे. त्यानं माफी मागितली असली तरी या संपूर्ण शो ची परवानगी रद्द करावी अशी मागणी जोर पकडू लागली आहे. (Ranveer Allahabadia)
सई बने