Home » राणी रुद्रमादेवी, भारतातील महान राणी

राणी रुद्रमादेवी, भारतातील महान राणी

by Team Gajawaja
0 comment
Queen Rudramadevi
Share

भारत देशाच्या इतिहासात जसे महान राजांचे योगदान आहे, तसेच अनेक पराक्रमी राण्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.  मात्र आपल्याला त्या राण्यांबद्दल माहिती नाही.  या राण्यांनी अजोड असा  पराक्रम केला. जेव्हा सर्वत्र पुरुषसत्ताक राज्यपद्धती होती, तेव्हा वेळप्रसंगी आपल्या राज्याला वाचवण्यासाठी पुरुषवेश परिधान करुन राज्यकारभार केला. लढाया केल्या आणि जिंकल्याही. यासोबत जनतेच्या भल्यासाठी अनेक निर्णय घेतले. तत्कालीन लोकप्रिय असलेल्या या राण्या काळाच्या ओघात कुठे गायब झाल्या. मात्र त्यांच्या पाऊलखुणा आता नव्यानं मिळू लागल्या आहेत, त्यातून इतिहासात गायब झालेल्या या पराक्रमी राण्यांची माहिती पुढे येऊ लागली आहे.  अलिकडेच तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात एका पराक्रमी राणीच्या मुर्ती सापडल्या.  ही राणी म्हणजे, एकेकाळी दक्षिण भारतावर राज्य केलेली राणी रुद्रमादेवी.  (Queen Rudramadevi) राणी रुद्रमादेवी हिच्या पराक्रमाची यशोगाथा खूप मोठी आहे.  

तेलंगणा राज्यातील राणी रुद्रमादेवी (Queen Rudramadevi) ही काकतीय घराण्याची महिला शासक होती.  भारताच्या इतिहासातील महान शासक राणींमध्ये राणी रुद्रमादेवीचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.   राणी रुद्रमादेवी, 1263 पासून तिच्या मृत्यूपर्यंत दख्खनच्या पठारावरील काकतिया घराण्याची राजकुमारी आणि नंतर महाराणी म्हणून ओळखली जाते.  मुख्य म्हणजे, इतिहासात राणी रुद्रमादेवी (Queen Rudramadevi) आणि राजा रुद्रदेव या दोन्ही नावांनी या राणींची ओळख आहे.  भारतातील सम्राट म्हणून राज्य करणाऱ्या आणि लढाई लढणा-या महिलांपैकी राणी रुद्रमादेवी ही एक होती. 

1262 मध्ये राणी रुद्रमादेवीचा (Queen Rudramadevi) जन्म झाला.  राणीचे वडील गणपती देव हे काकतीय वंशाचे राजा होते.  राजा गणपतीदेव यांना दोन मुली झाल्या.  त्यातील राजकुमारी रुद्रमादेवी ही मोठी मुलगी होती.  त्याकाळी मुलीला राज्यकारभार बघता येत नव्हता.  त्यामुळे राजानं अनेक वर्ष आपल्या या मोठ्या मुलीला मुलगा म्हणून मोठं केल्याचे सांगितले जाते.  राजकुमारी रुद्रमादेवीची (Queen Rudramadevi) ओळख राजकुमार रुद्रकुमार म्हणून अनेक वर्ष आपली खरी ओळख लपवली होती.  1262 ते 1295 या काळात रुद्रमादेवीने काकतीय राज्यावर अतिशय कुशलतेने राज्य केले.  एक महिला असूनही राणी रुद्रमादेवीनं काकतीय राजवंशाच्या रक्षणासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले.  त्यामुळे राणी रुद्रमादेवीची प्रतिमा देवीसारखी होती.  

राजा गणपती देवा यांनी आपल्या मुलीला सर्व शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते.  राणी रुद्रमादेवी अत्यंत कुशल अशी लढवय्यी होती.  ब-याचवेळा राणी एकटीच भर रणांगणात शत्रूंबरोबर तलवार घेऊन लढत असे.   रुद्रमादेवीने (Queen Rudramadevi) वयाच्या 14 व्या वर्षी रुद्रदेव नावाने वडिलांसोबत सिंहासन सांभाळण्यास सुरुवात केली.  महाराजा गणपती देव यांच्या मृत्यूनंतर, रुद्रमादेवी यांचा पूर्ण विधींसह राज्याभिषेक करण्यात आला.  त्यावेळी राणीनं धारण केलेले मुलाचे नाव सोडून राजकुमारी म्हणून काकतीय वंशाची पूर्ण शासक म्हणून स्वतःला घोषित केले.  

राजकन्या रुद्रमादेवीने (Queen Rudramadevi) चालुक्य वंशातील वीरभद्र याच्याबरोबर विवाह केला.  हा विवाह म्हणजे, निव्वळ राजकीय विवाह होता.  रुद्रमादेवीला वीरभद्रापासून दोन मुली झाल्या.  मात्र वीरभद्रने राणी रुद्रमादेवीला  राज्यकारभार सांभाळण्यासाठी साथ दिली नाही.  या दोघांचे वैवाहिक आयुष्य वादात गेले.  राणी रुद्रमादेवीच्या (Queen Rudramadevi) विरोधात सिंहासन काबीज करण्यासाठी अनेक कट करण्यात आले.  त्यातील काही कटामध्ये वीरभद्रनेही साथ दिल्याची माहिती आहे.  त्यामुळे या दोघात कायम वाद होत असत.  राणीचे मुलीचे नाव रुयम्मा आणि मुम्मदंबा होते.  मुमदंबेचा विवाह महादेवाशी झाला. राणीला अंतर्गत शत्रूंबरोबरही अनेकवेळा लढा द्यावा लागला.  काकतीय साम्राज्याच्या सर्व शत्रूंनी एकदा रुद्रमादेवीच्या राज्याला वेढा घातला होता.  या सर्व शत्रूंना रुद्रमादेवीने (Queen Rudramadevi) धैर्य आणि पराक्रमाच्या जोरावर पराभूत केले.  रुद्रमादेवीने अत्यंत यशस्वीपणे राज्य केले. यामुळेच इतिहासकारांनी आंध्रच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून राणीच्या कारकिर्दीचे वर्णन केले आहे.काकतीय साम्राज्याच्या काळात, त्यांच्या अनेक मित्रपक्षांनी राणी रुद्रमादेवीला राणी म्हणून स्वीकारले नाही. कितीही पराक्रमी असली तरी एक महिला म्हणून तिला विरोध झाला.  अंतर्गत युद्ध आणि विरोधाला कंटाळून 1280 मध्ये राणी रुद्रमादेवी (Queen Rudramadevi) यांनी तिचा नातू प्रतापरुद्रदेव याला काकतीय राज्याचा भावी वारसदार म्हणून घोषित केले.  राणी रुद्रमादेवीने ओरुगालू किल्ला बांधला.  गोलकोंडा किल्ल्याचे बांधकामही राणी रुद्रमादेवीनं सुरु केल्याची माहिती आहे. शूर राणी रुद्रमादेवी हिचा मृत्यू अंबादेवाशी लढताना 1289 मध्ये झाल्याची माहीती आहे.  

=============

हे देखील वाचा : डार्क सर्कल दूर करण्यासाठी डाएटमध्ये खा ‘हे’ फूड्स

============

काही वर्षांपूर्वी, तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील बोलिकुंटा गावात राणी रुद्रमादेवीच्या (Queen Rudramadevi) दोन ग्रॅनाइट मूर्ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने  शोधून काढल्या.  या मूर्ती अत्यंत खराब अवस्थेत आढळल्या. पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून या मुर्ती महत्त्वाच्या ठरला.  त्यांच्या अभ्यासातून राणीच्या कालखंडातील संस्कृती, राहणीमान, शासनव्यवस्था यासंबंधीची माहिती इतिहासकारांनी शोधून काढली.  याचवेळी राणीवर लिहिलेले दोन शिलालेखही आढळले.  या दोन शिलालेखांपैकी एका शिलालेखावर राणी घोड्यावर स्वार होत असल्याचे चित्र आहे. ज्यामध्ये राणीला योद्ध्यासारखे कपडे घातलेले, कमरेला पट्टा बांधलेला दाखवले आहे.  त्यांच्या उजव्या हातात तलवार आहे.  राणीवर राजेशाही चिन्हही लावण्यात आले आहे. घोड्याच्या अंगाभोवती सुशोभित पट्टाही बांधलेला आहे.   दुस-या शिलालेखात राणी रुद्रमादेवी (Queen Rudramadevi) थकलेल्या अवस्थेत, उजव्या हातात तलवार धरून आणि डाव्या हातातून घोड्याची लगाम धरलेली दाखवली आहे.  या भागात अद्यापही काही शोध घेण्यात येत असून त्यातून राणी रुद्रमादेवीबद्दल काही अधिक माहिती मिळते का याचा शोध चालू आहे.  

सई बने  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.