स्क्रोल करता करता एक रील आली. ती रील पृथ्वी शॉची होती. बघितल्या बघितल्या वाटलं भावाचा कमबॅक झाला पाहिजे. बर खाली कमेंट बघितल्या तर जवळपास सगळ्यांच्या भावना तशाच होत्या. बर याचा कमबॅक झाला पाहिजे त्याचा कमबॅक झाला पाहिजे याची प्रत्येकाची लिस्ट वेगळी आहे. आता कोणाला समय रैनाचा कमबॅक पाहिजे तर कोणाला बियर बायसेप्सचा. त्यात २०२५ च्या पहिल्याच महिन्यात या वर्षी मीही कमबॅक करणार असे रील सेव्ह करून ठेवणारी जनताही वेगळी आहे. ते जाऊ द्या विषय राजकारणाचा आहे तर याच विषयावर येऊ..
राज्याच्या राजकारणातही २०२४ मध्ये एक असा कमबॅक झालाय की ज्याची हवा आता २०२५ मध्येही आहे आणि हा कमबॅक आहे राणे फॅमिलीचा. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांचा एकेकाळी एवढा कठीण काळ चालू होता की राणे संपले अशा वावड्या उठल्या होता आणि थेट २०२४ मध्ये काय परिस्थिती आहे तर एकाच घरात एक खासदार आणि दोन आमदार आहेत. ते हि थेट जनतेतून निवडून येऊन. त्याही पलीकडे मंत्रीपदही आहे. त्यामुळे राणे फॅमिलीचा हा कमबॅक नेमका कसा झाला? राणेंचे फासे नेमके कुठे बरोबर पडले ? जाणून घेऊ. (Rane Family)
नारायण राणे (Narayan Rane) यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती शिवसेनेतून. अवघं १६ वर्षे वय असताना राणे शिवसेनेचे सदस्य म्हणजेच शिवसैनिक झालेम, असं सांगितलं जातं. मग त्यानंतर मुंबईत नगरसेवक झाले, आमदार झाले. राणेंच्या राजकीय कारकिर्दीने शिखर गाठलं जेव्हा १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि राणे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. साधारण सात महिने राणे मुख्यमंत्री होते. मात्र पुढे युतीची सत्ता गेली. २००५ पर्यंत राणे विरोधी पक्षनेते राहिले. त्यानंतर मात्र राणे यांच्या राजकीय प्रवासाचीही दिशा बदलत गेली. उद्धव ठाकरेंशी असलेल्या वादामुळे जुलै २००५ मध्ये बाळासाहेबांनी राणे यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला. मग पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसायची महत्वाकांक्षा घेऊन राणे काँग्रेसमध्ये गेले.(Rane Family)
शिवसेनेला खिंडार पाडत डझनभर पेक्षा जास्त आमदार सोबत घेत राणे काँग्रेसमध्ये आले होते. मात्र काँग्रेसमध्ये ते एक सामान्य नेतेच होऊन गेले. आणि इथूनच राणेंच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याच्या चर्चा चालू झाल्या. काँग्रेसमध्ये आधी महसूल आणि नंतर उद्योग या खात्यांवरच राणे यांना समाधान मानावे लागले. २०१४ मध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद असताना राणे यांनी त्यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान दिलं. यातच लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राणेंच्या घरी पहिला पराभव आला. या निवडणुकीत राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांचा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पराभव केला. या पराभवापासून जणू राणेंना ग्रहणच लागलं. (Narayan Rane)
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांत २०१४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचा सूपडासाफ झालाच सोबतच मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या नारायण राणेंनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. कुडाळ मतदारसंघात शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यानंतरच वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. शिवसेना आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. यावेळीही नारायण राणेंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकलं. शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. ‘मातोश्री’च्या अंगणात राणेंनी शिवसेनेला आव्हान दिलं आणि निवडणूक चुरशीची केली. मात्र इथेही राणेंच्या पदरी पराभव आला.(Rane Family)
यानंतर मात्र राणेंनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय कारकिर्दीची दिशा बदलली आणि काँग्रेसला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत वेगळी राजकीय वाटचाल सुरू केली. मात्र २०१७ मध्ये स्थापन झालेला हा पक्ष अल्पजीवी ठरला. २०१९ मध्ये राणे यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला आणि त्यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक भाजपात गेले. भाजपात मात्र मग राणेंना नवसंजीवनी मिळाली. त्यांना राज्यसभेची खासदारकीदेऊन पुनर्वसन करण्यात आलं तर पुढे केंद्रात जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना संधी मिळाली. यात शपथविधीत पहिला क्रम त्यांचा होता. यावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना महत्त्व दिले हे दिसले.(Rane Family)
कोकणात मराठा समाजातून आलेल्या या नेत्यावर भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली. कोकणच्या राजकारणावर मुंबईतील वातावरण आणि घडामोडींचा प्रभाव असतो. राणेंच्या रूपाने मुंबई व कोकणात लाभ होईल, असा भाजपचा हिशेब होता. आणि राणेंनीही या विश्वास सार्थ ठरवला. आणि राणेंच्या या दुसऱ्या फेजमध्ये त्यांना समर्थ साथ मिळाली ती त्यांच्या लोकांची. महत्वाची म्हणजे नितेश राणेंची. नितेश राणे यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका सुरु केली. या भूमिका घेताना त्यांनी उद्धव ठाकरेंनाही अनेकदा सळो की पळो करून सोडलं. माजी मुख्यमंत्र्याचा पोरगा या इमेजमधून बाहेर येत ते संपूर्ण राज्यभर ओळखले जाऊ लागले. भाजपनेही हिंदूंत्वचा मुद्दा लावून धरण्याचा काम त्यांना दिल आणि याचे परिणाम लवकरच दिसले.
=============
हे देखील वाचा : Suresh Dhas : चंद्रशेखर बावनकुळेंमुळे धस आणि मुंडे यांच्यामध्ये मांडवली ?
=============
लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गमधून थेट नारायण राणे यांना भाजपने मैदानात उतरवलं. राणे फॅमिलीनेही याचा फायदा उचलत विनायक राऊत यांची हॅट्रिक हुकवली. संपूर्ण राज्यात भाजपाची पीछेहाट झाली असताना सिंधुदुर्ग राणेंनी भाजपसाठी जिंकून आणला. आता विधानसभेची वेळ होती. कणकवलीतून नितेश राणे हे आमदार होतेच आणि ते पुन्हा निवडून येणंही जवळपास फिक्स होतं. मात्र सोबतच राणेंचा डोळा होता कुडाळवर. राणेंचा हा बालेकिल्ला होता मात्र वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा (Narayan Rane) पराभव करत हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला होता. आणि हा राणेंपुढील मोठं आव्हान होतं.
त्यातच जागावाटपात हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार होता. मग पुन्हा एकदा राणेंनी अप्लाय चक्र फिरवली आणि माजी खासदार निलेश राणे यांना शिंदेंच्या सेनेतून कुडाळचं तिकीट मिळवून दिलं. आता राणेंच्या घरातून दोन सख्खे भाऊ विधानसभेच्या रिंगणात होते. राणेंनी मात्र हे आव्हान सहा पेललं आणि दोन्ही भाऊ आरामात निवडून आणले. यामुळे सिंधूदुर्गवरील एकहाती पकड राणेंनी पुन्हा मिळवली. याचाच फायदा झाला आणि नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले. आता पुन्हा एकदा अशी परिस्थिती आली आहे कि कोकणाच्या राजकारणाचा विचार राणेंशीवाय होणार नाही कारण राणेंचा कमबॅक झालाय..