माझा भाऊ माझ्यासोबत नाही…पण रणदीपमध्ये मी माझ्या भावाला पाहिलं आहे. त्याच्याकडून मला एक वचन हवं आहे…जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा या बहिणीचा भाऊ म्हणून रणदीपनं खांदा द्यावा…भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणानं दलबीर कौर यांनी काही वर्षापूर्वी ही इच्छा व्यक्त केली होती. (Untold story of Dalbir Kaur and Randeep Hooda)
या दलबीर कौर कोण हा प्रश्न पडला असेल, तर दलबीर कौर म्हणजे सरबजीत सिंग यांची मोठी बहिण. हे तेच सरबजीत ज्यांचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झाला. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावातील रहिवासी असलेला सरबजीत सिंग ऑगस्ट 1990 मध्ये चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसला. यानंतर त्याला पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अटक केली. सरबजीतवर पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. लाहोर, मुलतान आणि फैसलाबाद बॉम्बस्फोटात रॉचा एजंट असल्याचा आरोप ठेऊन ऑक्टोबर 1991 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली.
सरबजीतच्या शिक्षेविरोधात अनेक मानवाधिकार संघटनांनीही लढा दिला. एप्रिल 2013 मध्ये लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात सरबजीतवर कैद्यांनी हल्ला केला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी सरबजीतला जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु 2 मे 2013 रोजी सरबजीतचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर पंजाब सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता. (Untold story of Dalbir Kaur and Randeep Hooda)
दरम्यान सरबजीत सिंगच्या 22 वर्ष पाकिस्तानी तुरुंगात असताना, त्याची मोठी बहीण दलबीर कौरने आपल्या भावाच्या सुटकेसाठी खूप मोठा संघर्ष केला. सरबजीतला भेटण्यासाठी त्या पाकिस्तानातही गेल्या होत्या. त्याच्यावर झालेला हल्लाही पाकिस्तानी सरकारचा कट असल्याचा आरोप दलबीर कौर यांनी केला होता. मात्र पाकिस्तानी सरकारनं त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
काही वर्षापूर्वी सरबजीत सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘सरबजीत’ हा चित्रपटही आला होता. त्यात दलबीर कौर यांची भूमिका ऐश्वर्या रायनं केली होती, तर रणदीप हुडानं सरबजीत साकारला होता. त्याच्या अभिनयामुळे सरबजीतच्या संघर्षाची माहिती झाली. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला दलबीर कौर उपस्थित होत्या. रणदीपला सरबजीतच्या भूमिकेत पाहून त्यावेळी त्या अतिशय भावूक झाल्या होत्या. (Untold story of Dalbir Kaur and Randeep Hooda)
रणदीपनं सरबजीत या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतली होती. यासाठी त्याने तब्बल 19 किलो वजनही कमी केलं होतं. शिवाय भूमिकेसाठी त्याने प्रचंड अभ्यासही केला होता. त्याच्या या भूमिकेला सरबजीतच्या बहिणीनं शंभर गुण देत असल्याचे सांगितले आणि तेव्हाच त्यांनी रणदीप यांच्याकडून वचन घेतले की, माझे निधन झाल्यावर भाऊ म्हणून रणदीपनं मला खांदा द्यावा. माझा सख्या भाऊ आता नाही, पण रणदीपनं मला त्याची झलक दाखवली आहे. रणदीपनं मला खांदा दिला, तर माझ्या आत्म्यास शांती लाभेल,असे त्या बोलल्या होत्या. त्यावेळी दलबीर यांच्या या वक्तव्यांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते. (Untold story of Dalbir Kaur and Randeep Hooda)
====
हे देखील वाचा – द ब्रोकन न्यूज: दोन न्यूज चॅनेल्समधील स्पर्धेची कहाणी
====
काही दिवसांपूर्वी दलबीर कौर यांचा मृत्यू झाला. रणदीप यांनी या आपल्या मानस बहिणीला दिलेल्या वचनाची आठवण ठेवत, दलबीर कौर यांच्या अत्यंसंस्काराला उपस्थित राहिला. दलबीर कौर यांच्यावर अमृतसर येथील भिखीविंडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
रणदीप आपल्या बहिणीच्या वचनाची आठवण ठेवून या दुःखद प्रसंगी तिथे गेला आणि त्यांनी दलबीर कौरच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यावेळी तिथे उपस्थित सर्वानाच त्याला पाहून धक्का बसला कारण कोणालाच वाटलं नव्हतं रणदीप येईल; पण रणदीप तिथे गेला आणि भावाच्या नात्याने त्याने सर्व संस्कारही पार पाडले. आपल्या या बहिणीच्या आठवणीनं तो गहीवरलाही. त्याच्या वागण्यामुळे त्याने त्या प्रसंगातही सर्वांची मनं जिंकली. (Untold story of Dalbir Kaur and Randeep Hooda)
आपल्या भावावर निस्सीम प्रेम करणाऱ्या या बहिणीला तिच्या मानस भावानं अखेरचा निरोप दिला. त्यावेळी उपस्थितांना रणदीपमध्ये सरबजीतसिंगची झलक दिसत होती…
– सई बने