रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे या मंदिलाराला रामेश्वर असे नाव पडले. स्कंद पुराण व शिव पुराणांमध्ये या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे
भौगोलिक रचना
रामेश्वर हे बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जाते. येथील मंडपाची निर्मिती इ.स. १७४० ते १७७० या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथऱ्यावर सुंदर शिवलिंग आहे.
रामेश्वराची अख्यायिका
तमिळनाडू राज्यात रामेश्वरम बेटावर एक शिवमंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणाविरुद्ध केलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. रामेश्वरतीर्थ ला सेतुबंध तीर्थ देखील म्हटलं जातं.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती. सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे. एकेकाळी सन १९६४ साली धनुष्कोडी हे भारतात प्रवेश करण्यासाठीचे मोठे बंदर होते. त्यावेळी एक फार मोठे चक्रीवादळ आले, आणि त्यामुळे धनुष्कोडी शहर, तेथली रेल्वे लाईन, एक स्टीम रेल्वे इंजिन आणि त्याला जोडलेले डबे हे सर्व वाहून गेले. या चक्री वादळाला रामेश्वर वादळ असे म्हणतात. वादळाच्या वेळी समुद्राच्या लाटांची उंची साडेचार मीटर होती.
पोहोचणार कसे
रामेश्वरम रेल्वे स्थानक दक्षिण रेल्वेचे एक टर्मिनस असून चेन्नई व मदुराईहून येणारे रेल्वेमार्ग येथे संपतात. रामेश्वरम हे श्रीलंकेच्या मन्नार द्वीपापासून ५० किमी अंतरावर आहे. मंदीर हे तमिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे. सर्वप्रथम मदुराईला पोहचावे लागेल. मदुराईला पोहोचण्यासाठी मुंबई, चेन्नई, दिल्ली अशा प्रमुख शहरांपासून रेल्वे सेवा आहे. मदुराई ते रामेश्वर अंतर १७० किमी आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग – वैजनाथ
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.