मागच्याच वर्षी कोरोनावर औषध सापडल्याचा दावा करून रामदेव बाबा (Ramdev Baba) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्या कोरोनील या औषधाने कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९९.९९% असल्याचा त्यांचा दावा होता. इतकंच नाही तर पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटेनेने प्रमाणपत्र दिल्याचं विधानदेखील रामदेव बाबांनी केलं होतं. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) ही बातमी खोटी असल्याचं जाहीर करून, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. हा वाद शांत होतोय न होतोय तोवरच रामदेव बाबा पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत.
काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांनी एका बैठकीमध्ये, अॅलोपॅथीबाबत (Allopathy) अवमानकारक व्यक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये बाबा, अॅलोपॅथीविषयी तमाशा, बेकार इत्यादी शब्द वापरतांना आढळून आले. अॅलोपॅथी सायन्स हे दिवाळं काढणारं आहे आणि अॅलोपॅथीच्या औषधांमुळेच अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं होतं. समाजमाध्यमांमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच गदारोळ माजला. रामदेव बाबांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनसोबतच अनेक संस्थांनी उचलून धरली. याबाबात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र पाठवल्यानंतर, उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात रामदेव बाबांनी माफी मागत आपले विधान मागे घेतले आहे.
या पत्रात आपल्या विधानावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. याविषयी स्पष्टीकरण देतांना, एका कार्यकर्ता बैठकीतील ते वाक्य असून त्यावेळी आपण फक्त व्हाट्सऍप मेसेज वाचून दाखवत असल्याचं रामदेव बाबांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबांच्या या पत्रानंतर आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत त्यांनी केलेल्या या कृतीची प्रशंसा केली आहे. रामदेव बाबांनी पाठवलेल्या या पत्रातून त्यांचा समजूतदारपणा, परिपक्वता दिसत असून या पत्रामुळे हा वाद निश्चित थांबेल अशी आशा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
शब्दांकन: धनश्री गंधे