अवघ्या काही दिवसांनी आपण प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. श्रीराम हे हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचे देव म्हणून ओळखले जातात. त्रेतायुगात दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू हे पृथ्वीवर श्रीराम या अवतारात प्रगट झाले होते. श्रीराम यांनी त्यांचे संपूर्ण जीवन कायम न्याय, नीती, तत्व यांचे पालन करण्यात व्यतीत केले. त्यांच्या जीवनामधून आपल्याला देखील अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
श्रीराम यांचे संपूर्ण जीवन महर्षी वाल्मिक यांनी त्यांच्या ‘रामायण’ या महाग्रंथात मांडले आहे. आपण टीव्ही, चित्रपट, गोष्टी, गाणी यांमधून श्रीरामांचे जीवन ऐकले, पाहिले आहे. मात्र रामायणामध्ये अशा अनेक घटना आहेत, ज्या जास्त लोकांना माहित नसतील. मात्र या घटना देखील अतिशय महत्वाच्या होत्या. या घटनांचा परिणाम रामायणातील इतर घटनांवर देखील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र रामायणातील अशा कोणत्या घटना आहेत, ज्या जास्त लोकांना माहित नाही चला जाणून घेऊया.
* रावणाने महादेवांचा कैलास पर्वत उचलला रावण शक्तिशाली होता आणि त्याला त्याच्या सामर्थ्याचा अभिमानही होता. या अभिमानाने तो महादेवाशी युद्ध करण्यासाठी कैलास पर्वतावर गेला होता. त्यावेळी महादेव ध्यान करीत होते. रावणाने भगवान शंकरांना युद्धासाठी आमंत्रित केले, पण भगवान ध्यानात बसले होते. महादेव ध्यानातून उठत नाही हे पाहिल्यावर रावणाला राग आला आणि त्याने कैलास पर्वत उचलण्यास सुरुवात केली. तेव्हा महादेवांनी केवळ पायाच्या बोटाने कैलास पर्वताचे वजन वाढवले. वाढलेल्या वजनाने रावणाचा हात दबला गेला. यानंतर रावणाला त्याची चूक समजली आणि त्याने महादेवांना आपला गुरू बनवून माफी मागितली.
========
हे देखील वाचा : Kitchen Tips : ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून चाकू, कात्रीला द्या घरच्या घरी धार
========
* सुग्रीवाचा भाऊ बालीने रावणाला काखेत दाबले होते. एकदा रावण बालीशी युद्ध करण्यासाठी पोहोचला होता. त्यावेळी बाली महासागराची परिक्रमा करत असताना रावण सतत बालीला युद्धासाठी बोलावत होता. तेव्हा बालीने रावणाला आपल्या बाहूत धरून समुद्राची परिक्रमा सुरू ठेवली. रावणाचा बालीकडून पराभव झाला आणि रावणाने बालीशी मैत्री केली.
* बिभीषण, कुंभकर्ण आणि रावण ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत होते. तिन्ही भावांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि तिघांनाही वरदान मागायला सांगितले. रावण आणि विभीषणाला वरदान दिल्यानंतर कुंभकर्णाला पाहून ब्रह्मदेव काळजीत पडले. ब्रह्मदेवांनी विचार केला की जर कुंभकर्णाने दररोज पोटभर अन्न खाल्ले तर लवकरच संपूर्ण सृष्टीचा अंत होईल.
तेव्हा ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीच्या साहाय्याने कुंभकर्णाची बुद्धी भ्रमित केली आणि मग कुंभकर्णाने भ्रमामुळे ६ महिने झोपेचे वरदान मागितले. त्यामुळेच तो ६ महिने झोपायचा आणि ६ महिने जागायचा. राम-रावण युद्धाच्या वेळी बिभीषणानंतर कुंभकर्णानेही रावणाला श्रीरामाचा द्वेष करू हे सांगायचा प्रयत्न केला होता, पण रावणाने दोन्ही भावांचे ऐकले नाही.
* रावणाने स्त्रियांचा कधीच आदर केला नाही, तो स्त्रियांना केवळ उपभोगाची वस्तू मानायचा. एके दिवशी रावणाने अप्सरा रंभाला पाहिले तेव्हा तो रंभावर मोहित झाला. रावणाने रंभासोबत आपले बळ वापरले. नंतर रंभाने हे नलकुबेरांना सांगितल्यावर नलकुबेरने रावणाला शाप दिला की, आतापासून रावण जेव्हा कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श करेल किंवा तिला जबरदस्तीने महालात ठेवेल तेव्हा तो भस्म होईल. या कारणामुळे रावणाने सीतेला आपल्या महालात ठेवले नाही, तर अशोक वाटिकेत ठेवले. नलकुबेर हा रावणाचा भाऊ कुबेरदेव यांचा मुलगा होता.
* राम आणि रावण यांच्या युद्धात श्रीरामांनी रावणाला ३१ बाण मारले होते. श्रीरामाचा एक बाण रावणाच्या नाभीला लागला, १० बाणांनी १० डोकी, २० बाणांनी २० हात धडापासून वेगळे केले. अशा प्रकारे रावणाचा वध झाला होता.
========
हे देखील वाचा : Uluru : तुम्हाला माहित आहे का…? चमत्कारिक रंग बदलणाऱ्या डोंगराबद्दल
========
* रावणाच्या मृत्यूने बिभीषणाला भाऊ गेल्यामुळे अतीव दुःख झाले होते. तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणाला बिभीषणाला समजावण्यासाठी पाठवले. लक्ष्मणाच्या समजूतीने बिभीषणाचे दुःख शांत झाले. नंतर बिभीषणाने रावणाचा अंत्यसंस्कार केला. तेव्हा श्रीरामाचा वनवास चालू होता, त्यामुळे ते लंकेत गेले नाहीत. श्रीरामांनी लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबवन यांना बिभीषणाचा राज्याभिषेक करण्यास सांगितले.
* बिभीषणाचा राज्याभिषेक झाल्यानंतर रावणाने अशोक वाटिकेमध्ये ठेवलेल्या देवी सीतेला आणण्यासाठी हनुमान गेले होते. हनुमानाने सीतेला अशोक वाटिकेतून आणले आणि श्रीरामाकडे सुपूर्द केले. यानंतर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, अंगद, बिभीषण इत्यादी पुष्पक विमानाने अयोध्येला गेले होते.