Home » Pakistan : जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीरामांचा जयघोष होतो….

Pakistan : जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीरामांचा जयघोष होतो….

by Team Gajawaja
0 comment
Pakistan | Top Stories
Share

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील वातावरण कसे आहे, हे सांगायची गरज नाही. पाकिस्तानमधील अतिरेक्यांमुळे भारताच्या सीमांवर कायम तणाव राहिला आहे. हाच तणाव या दोन देशांमधील राजकीय संबंधातही दिसून येतो. मात्र या सर्वातही या दोन देशांना बांधणारा एक सांस्कृतिक धागा आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात असाच एक प्रयोग झाला, जिथे धर्म, जात, देश या सर्व सीमा पुसल्या गेल्या. या कराची शहरातील एका सांस्कृतिक गटानं एक नाटक सादर केलं. हे नाटक चक्क हिंदू पौराणिक कथेवर आधारित होते. ही कथा रामायणातील होती. (Pakistan)

यासाठी ज्या कलाकारानं रामाचा अभिनय केला, तो धर्मानं मुस्लिम आहे. माता सीतेची भूमिका करणारी कलाकारही मुस्लिम आहे. रामायणावर आधारित नाटक सादर करणारे बहुतांशी कलाकार आणि उपस्थित सर्व प्रेक्षकही मुस्लिम आहेत. पण रामायणावरील हे नाट्य पाहतांना उपस्थित एवढे भारावून गेले की, जय श्रीराम या घोषणांनी नाट्यसभागृह निनादून गेले. या नाटकाचे दिग्दर्शन योहेश्वर करेरा यांनी केले आहे. या नाटकाचे पाकिस्तानमधील नाट्य समीक्षकांनीही भरभरुन कौतुक केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादाच्या रोज बातम्या येतात. भारताच्या सीमेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अस्थिर वातावरण निर्माण करीत असतात. पहलगाममधील घटनेनंतर तर तमाम भारतीयांनी पाकिस्तानचा निषेध केला आहे. अशा परिस्थितही या दोन देशांमध्ये एक सांस्कृतिक धागा कायम असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. (International News)

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची शहरात ‘मौज’ या पाकिस्तानी नाट्यरसिक मंडळानं चक्क रामायणामधील कथेवर एक नाट्क सादर केले. या नाट्यगटाने कराची कला परिषदेत हे नाटक सादर केले. हे महाकाव्य प्रत्यक्षात आणण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचाही त्यांनी वापर केला. या नाटकातील सर्वच कलाकार हे मुस्लिम होते. माता सीतेचे भूमिका राणा काझमी यांनी केली. तर प्रभू श्रीरामांची भूमिका अश्मन लालवानी यांनी केली. समहान गाजी रावणाच्या भूमिकेत आहेत. तर राजा दशरथांची भूमिका अमिर अली यांनी केली आहे. वकास अख्तर हे लक्ष्मण झाले आहेत. जिब्रान खान हनुमानाच्या भूमिकेत आहेत तर सना तोहा यांनी राणी कैकेयीची भूमिका केली आहे. अली शेर हे मंत्र्यांच्या भूमिकेत आहेत. हे नाटक बघण्यासाठी आलेले प्रेक्षकही मुस्लिम होते. मात्र् या नाटकामुळे हे सर्वच प्रेक्षक प्रभावित झाले. प्रेक्षकांनी प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयजयकारही केला. या सादरीकरणाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकली. यातून धार्मिक विविधतेमध्ये सुसंवादाचा संदेश दिला गेला. पाकिस्तानमध्ये या रामायण नाट्याची चर्चा आता रंगली आहे. (Pakistan)

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा कायम उपस्थित केला जातो. आता तर हे रामायण या धार्मिक ग्रंथावर असल्यामुळे ते सादर करण्याबाबत सुरुवातीला साशंकता व्यक्त करण्यात आली होती. त्यातील कलाकार आणि तंत्रज्ञही मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेतेबाबतही चिंता वाटत होती. शिवाय नाटकाला बघायला प्रेक्षक येतील का आणि समीक्षक याची कशी नोंद घेतील, याबाबतही दिग्दर्शक आणि निर्माते साशंक होते. मात्र नाटकाला मिळालेल्या भरभरुन प्रतिसादामुळे या सर्व शंका दूर झाल्या आहेत. रामायण या नाटकाचे दिग्दर्शक योशेवर करेरा आहेत. त्यांनी हा नाट्यप्रयोग झाल्यावर सांगितले की, रामायण रंगमंचावर जिवंत करणे हा एक अद्भुत दृश्य अनुभव आहे. पाकिस्तानी समाज आपल्या विचारांपेक्षा जास्त सहिष्णु असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कला आणि चित्रपट समीक्षक ओमैर अल्वी हे या नाट्यातील कथेची बांधणी, प्रकाशयोजना, संगीत, रंग आणि डिझाइनमुळे प्रभावित झाले. (International News)

=============

हे ही वाचा : Japan : संभाव्य अणुहल्ल्यापासून वाचण्यासाठी !

==========

रामायण हे एक महाकाव्य जगभरातील करोडो लोकांना कायम जोडत असल्याचे यातून सिद्ध झाल्याचे अल्वी यांनी सांगितले. यापूर्वीही हे रामायण नाटक कराची येथे सादर करण्यात आले होते. आता जवळपास आठ महिन्यांनी त्याचा पुन्हा शो झाला. त्यातील काही भाग हे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनंही सादर करण्यात आले. पाकिस्तानमधील नाट्य संस्कृती वैविध्यपूर्ण आहे. पाकिस्तानमध्ये पंजाबी, सिंधी, बलुच, पश्तून असे अनेक प्रमुख वांशिक गट आहेत आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या नाट्य परंपरा आहेत. पाकिस्तानी रंगभूमीवर उर्दू आणि इंग्रजी भाषेत नाटके सादर केली जातात. सामाजिक आणि राजकीय विषयांवर नाटके सादर करणारे अनेक नाट्यगट आहेत. अशाच एका नाट्यचळवळीमध्ये सादर झालेले रामायण आता अवघ्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. (Pakistan)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.