भारत – श्रीलंका या दोन देशातील दृढ संबंध अधिक दृढ करण्यासाठी राम सेतूप्रमाणेच भारत-श्रीलंकामध्ये पुन्हा पूल बांधण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या सरकारनं नुकतीच या महत्त्वकांक्षी योजनेची माहिती दिली. भारत आणि श्रीलंका या देशातील समान धागा म्हणजे रामसेतूचे नाव घेतले जाते. प्रभू श्रीरामानं लंकेला जाण्यासाठी बांधलेला रामसेतू समुद्राच्या तळाशी गेला आहे. हजारो वर्षापूर्वीच्या हा रामसेतू समुद्राच्या तळाशी गेला असला तरी त्याच्या अस्तित्वाच्या खुणा कायम आहेत. या दोन्हीही देशांनी त्या जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात प्रभू श्रीरामांप्रती असलेली भक्तीही आहे. (Ram Setu)
या दोन्ही देशांमध्ये व्यापार संबंध अधिक मजबूत होण्यासाठी अशाच रामसेतूची आजही गरज होती. ती गरज आता या नव्या रामसेतू योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. श्रीलंकेच्या सरकारनं रामसेतू योजनेची घोषणा केल्यावर त्याचे भारतानंही स्वागत केले आहे. तसेच भारतातील लाखो रामभक्तांनीही या योजनचे स्वागत केले आहे. हा पूल झाल्यावर श्रीलंकेला जाणे अधिक सुलभ होणार आहे. त्यातून या दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे.
भारताच्या आग्नेय भागातील रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या ईशान्येकडील मन्नार बेट यांच्यामध्ये उथळ चुनखडीच्या खडकांची साखळी आहे. त्याला राम सेतू म्हणून ओळखले जाते. जगात ॲडम्स ब्रिज म्हणून या खडकांची साखळी ओळखले जाते. या पुलाची लांबी सुमारे ३० मैल आहे. याच खडकांच्या पुलांमुळे मन्नारचे आखात आणि पोल्क सामुद्रधुनी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ही खडकांची रांग भारातील प्रभू श्रीरामभक्तांसाठी पूजनीय आहे. कारण इथेच प्रभू श्रीरामांनी रामसेतू बांधल्याची भावना आहे. (Ram Setu)
आता याच रामसेतूप्रमाणे भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांना जोडणा-या समुद्रावर पूल बांधण्यात येणार आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी या योजनेला हिरवा कंदील दिला आहे. मध्यंतरी जेव्हा श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती, तेव्हा भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदतीचा हात दिला होता. भारताची ही मदत श्रीलंकेला तारणारी ठरली. त्यामुळे आता या देशाचे आर्थिक नियोजन ताळ्यावर येत आहे. त्यात अधिक भर घालण्यासाठी व्यापार आणि पर्यटन वाढवण्यात येणार आहे. यामध्ये हा नवा पूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या नव्या रामसेतूसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्रस्तावित भूसंपादनचे काम लवकरच सुरु होणार आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी उत्तर-पूर्वेकडील मन्नार जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला आहे. या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती दिली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर २० जून रोजी कोलंबोला भेट देत आहेत. भारताकडून याचवेळी या नव्या रामसेतूबाबत औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंकेमधील हा नवा पूल या दोन्ही शेजारी देशांच्या मैत्रीचा पूल ठरणार आहे. (Ram Setu)
=============
हे देखील वाचा : मुल्तानी मातीत मिक्स करा ही 1 वस्तू, उजळेल त्वचा
=============
याशिवाय या दोन्ही देशांना रस्ते मार्गानं कसे जोडता येईल याचाही विचार सुरु झाला आहे. २०२३ पासून या दोन्ही देशांमध्ये रस्ते वाहतुकीनं अधिक जवळीक साधण्याच्या योजनांवर काम सुरु झाले आहे. त्यातील रामसेतू पूल हा महत्त्वकांक्षी आहे. याचा सर्वाधिक फायदा तामिळनाडू राज्याला होणार आहे. तामिळनाडूला श्रीलंकेपासून वेगळे करणारी पाल्क सामुद्रधुनी ही अरुंद पाण्याची पट्टी आहे. हा संपूर्ण पट्टा दोन्ही देशांतील मच्छिमारांसाठी समृद्ध मासेमारी क्षेत्र आहे. येथे, दोन्ही देशांतील मच्छिमारांना नकळतपणे एकमेकांच्या हद्दीत घुसल्याबद्दल अटक केली जाते. यात अनेकवेळा वाद निर्माण होतात. या दोन्ही देशांमधील जी राज्य या पुलामुळे जोडली जातात, त्यामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पुढे पूल झाल्यास याच व्यवसायाला अधिक बळकटी मिळणार आहे. तसेच दोन्ही देशामधील मासेमारीचे क्षेत्रही निश्चित करण्यास मदत होणार आहे. (Ram Setu)
रामसेतू पुलाबद्दल आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी हा पूल बांधला होता. त्यातून अवघी रामसेना लंकेमध्ये गेली आणि रावणाचा पराभव झाला. माता सीतेची सुटका झाली. इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे, काही इतिहासकारांच्या मते, हा पूल १४८० साली आलेल्या त्सुनामीमध्ये पूर्णपणे तुटला. याआधी लोक भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या या पुलाचा वापर करण्यात येत होता, असा दावाही करण्यात येतो. आता हा रामसेतू पुन्हा उभा रहाणार आहे. भारत आणि श्रीलंकेतील मैत्रीचे प्रतिक म्हणून त्याची ओळख होणार आहे.
सई बने